सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे पॅटर्न'

निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती आणि पूरक व्यवसायातून दरडोई उत्पन्नात चांगली वाढ केली आहे.भातशेतीसोबत भाजीपाला, बांबू लागवड, दुग्ध व्यवसाय आणि घरोघरी कुक्कटपालनातून गावातील कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.
Paddy cultivation by SRI method
Paddy cultivation by SRI method

निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती आणि पूरक व्यवसायातून  दरडोई उत्पन्नात चांगली वाढ केली आहे.भातशेतीसोबत भाजीपाला, बांबू लागवड, दुग्ध व्यवसाय आणि घरोघरी कुक्कटपालनातून गावातील कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील निवजे हे तेराशे लोकसंख्या असलेले निसर्गरम्य छोटेसे गाव. गावशिवारातील शेत जमीन हलक्या ते मध्यम प्रतीची आहे. गावामध्ये पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जात होती, परंतु शेतकऱ्यांच्या सामुहिक प्रयत्नातून शेतीमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. चार वर्षापूर्वी भगीरथ प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेने गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली.याला गावकऱ्यांची चांगली साथ मिळाली आहे. निवजे गावात तीनशे हेक्टरहून अधिक क्षेत्र भात लागवडीखाली आहे. पारंपरिक पद्धतीने भात शेती असल्याने पुरेसे उत्पादन मिळत नव्हते. त्यामुळे भगीरथ संस्थेने शेतकऱ्यांना भात उत्पादन वाढीसाठी ‘एसआरआय'' पद्धतीने लागवडीचे प्रशिक्षण दिले. कृषी विभागाने गावामध्ये शेतीशाळेला सुरवात केली. गावातील अधिकाधिक भात क्षेत्र ‘एसआरआय' पद्धतीखाली येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले.  वर्षभरात १० कार्यशाळा  कृषी विभागाने गावामध्ये ‘एसआरआय' पद्धतीने भात लागवड, भाजीपाला लागवड, यांत्रिकीकरणाचे फायदे याचबरोबरीने काजू ,बांबू, मिरी, कलिंगड, हळद लागवडीविषयी कार्यशाळा घेतल्या. यामध्ये विविध तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेती आणि पूरक उद्योगाबाबत चर्चा होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली. नेमके काय करायला पाहिजे याची दिशा मिळाली. कृषी विभागाचे पर्यवेक्षक निलेश उगवेकर यांनी वर्षभरात शेतकऱ्यांसाठी दहा प्रशिक्षणे घेतली. गेल्या वर्षी भात शेती शाळा पीक स्पर्धेमध्ये निवजे गावातील शेती शाळेचा तालुका,जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम क्रमांक आला. भातशेतीला बांबू लागवडीची जोड  निवजेतील प्रत्येक शेतकऱ्याने भातशेतीसोबत बांबू लागवडीवर भर दिला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने वीसपासून ते शंभर,दीडशे,दोनशे इतक्या बांबू बेटांची लागवड केली आहे. बांबू देखभालीचा फारसा खर्च येत नाही. गावातील प्रत्येक शेतकरी बांबू लागवडीतून दरवर्षी ३० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवितो.  गावकऱ्यांना दरवर्षी बांबू विक्रीतून सुमारे ४५ लाख रुपये उत्पन्न मिळते.   दृष्टीक्षेपात निवजे गाव

  • लोकसंख्या-१,३००
  • भौगोलिक क्षेत्र-१,०४६ हेक्टर
  • गावातील बायोगॅस-१४०
  • भात लागवडीचे एकूण क्षेत्र -२७२ हेक्टर
  • एसआरआय पध्दतीने भात लागवड - १६० हेक्टर
  • काजू लागवड -५० हेक्टर
  • पॉवर टिलर- २६
  • गावात प्रत्येकाकडे विहीर
  • गांडूळ खत प्रकल्प-५
  • महिला बचत गट-१६
  • पुरूष शेती गट-२८
  • खुले गट-१३
  • आत्मा अंतर्गत कृषी गट ः ६
  • मुख्य पिके :  भात, वाल, चवळी, कुळीथ, मूग, मटकी, उडीद, कलिंगड आणि हंगामी भाजीपाला
  • १६० हेक्टरवर ‘एसआरआय' पद्धतीने भात लागवड  पूर्वी काही शेतकरी गावात ‘एसआरआय' पद्धतीने भात लागवड करीत होते. भगीरथ संस्था आणि कृषी विभागाच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने २०१६ पासून या सुधारित तंत्राला चालना मिळाली. या पद्धतीने भात उत्पादनात वाढ मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी स्वयंस्फूर्तीने ‘एसआरआय' पध्दतीचा अवलंब करू लागले. २०१९ मध्ये ३०० हेक्टरपैकी सुमारे १३० हेक्टर क्षेत्रावर ‘एसआरआय''पद्धतीने भात लागवड झाली होती. यावर्षी कोरोनामुळे शेती करताना अडचणी आल्या, तरीही १६० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. ‘एसआरआय'पद्धतीने भात लागवड केल्यामुळे निवजे गावातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात अडीच पटीने वाढ झाली. यापूर्वी हेक्टरी ३२ ते ३५ क्विंटल भात उत्पादन येथील शेतकऱ्यांना मिळायचे. सध्या जिल्ह्याचे सरासरी प्रति हेक्टरी उत्पादन ३३ क्विंटल आहे.परंतु निवजे गावातील शेतकरी आता प्रति हेक्टरी ६८ ते ७० क्विंटल भात उत्पादन मिळवितात. त्यामुळे वर्षभर स्वतःला पुरेल इतके भात घरात ठेऊन प्रत्येक शेतकरी उर्वरित भात विक्रीतून वीस हजार ते साठ हजार मिळकत करतो. सध्या प्रति क्विंटलला २,५१५ रुपये दर शेतकऱ्यांना मिळतो. भात विक्रीतून गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी वीस लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती कृषी विभागाचे पर्यवेक्षक निलेश उगवेकर यांनी दिली. भाताच्या ‘घाटी पंकज' जातीला प्राधान्य माणगाव खोरे हे भाताचे आगर म्हणून ओळखले जाते. निवजे गावामध्ये बहुतांश शेतकरी घाटी पंकज या गावठी भात जातीची लागवड करतात. ही जात वादळी वारे, जोराच्या पावसात कोलमडत नाही. बहुतांश शेतकरी सेंद्रिय पद्धतीनेच भात उत्पादन घेतात.  काहीशा लालसर रंगाच्या या तांदळाला प्रति किलो साठ ते सत्तर रुपये इतका दर मिळतो. गावात आहेत १४० बायोगॅस  गावात पशुपालन मोठ्या प्रमाणात असल्याने तब्बल १४० बायोगॅस बांधण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ते सर्व चालू स्थितीत आहेत. एखादा दुसरा अपवाद वगळला तर घरोघरी बायोगॅस असल्यामुळे कुटुंबाला इंधनासाठी सिलेंडरचा खर्च नाही. निवजे गावाला अभ्यासकांची भेट पर्यावरणाचा समतोल साधत शेती आणि पूरक व्यवसाय करणाऱ्या निवजे गावाला अनेक अभ्यासक,शास्त्रज्ञांनी भेट दिली आहे. ऑस्ट्रेलिया, झांबिया, केनिया, दक्षिण आफ्रिकेतील अभ्यासकांनी निवजे गावाचा अभ्यास दौरा केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३० सरपंचांनी या गावात येऊन ग्राम आणि शेती विकासाची संकल्पना समजून घेतली.याशिवाय विविध विषयातील अभ्यासक गावामध्ये येत असतात. पशुपालन आणि कोंबडीपालनाला चालना

  • निवजे गावात शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाला चालना देण्यात आली. सुरवातीला भगीरथ प्रतिष्ठान संस्थेने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये २ ते १६ पर्यंत म्हशी आहेत. गावामध्ये पासष्टहून अधिक शेतकरी दुग्ध व्यवसायात आहेत. दूध संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ९१ हजार लिटर दूध संकलन होते. याशिवाय काही शेतकरी खासगी दूध विक्री देखील करतात. 
  • दुग्ध व्यवसायाप्रमाणे घरोघरी कोंबडीपालन पाहायला मिळते. घराच्या बाजूला छोट्याशा शेडमध्ये गावरान किंवा कावेरी जातीच्या कोंबड्यांचे संगोपन केले जाते. प्रत्येकाकडे सरासरी ५० ते १०० कोंबड्या आहेत. बहुतांश महिलांकडे कोंबडीपालनाची जबाबदारी आहे. कोंबडीपालनातून कुटुंबाचा घरखर्च चालतो.याशिवाय गावातील सोळा जण पूर्ण क्षमतेने कोंबडीपालन करतात.
  • प्रतिक्रिया लोकसहभागातून गावाचा विकास गावामध्ये भगिरथ संस्था आणि कृषी विभागाने अतिशय चांगले काम केले आहे. भात लागवडीची एसआरआय पद्धत उत्पादनवाढीला फायदेशीर ठरली आहे.  कृषी विभागाने यांत्रिकीकरणावर देखील भर दिला आहे. गावाची  सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. — वैष्णवी पालव, सरपंच

    भगीरथ संस्था आणि कृषी विभागामुळे शेतीला योग्य दिशा मिळाली. दरवर्षी मी ३५ क्विंटल भात विक्री करतो.बांबू विक्रीतून २५ हजार मिळतात. दुग्धव्यवसायातून माझी चांगली मिळकत आहे. कुक्कटपालनातून घरखर्च चालण्याइतकी रक्कम मिळते. आम्हाला शेती विकासाची दिशा भगीरथ संस्थेचे डॉ.प्रसाद देवधर यांनी दिली. — दत्तात्रय सांवत, प्रयोगशील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून कृषी विभागाचे विविध उपक्रम निवजे गावात सुरू आहेत. एसआरआय पद्धतीमुळे भात उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली.सेंद्रिय पध्दतीचा वापर असल्यामुळे गावातील तांदळाला गोवा, बेळगाव, मुंबई, पुणे या शहरात चांगली मागणी आहे. भगीरथ प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून  पशुपालन, कुक्कटपालनाला चालना मिळाली. बहुतांश शेतकऱ्यांनी बायोगॅस उभारलेले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी पर्यटन गाव म्हणून निवजे नावारूपास येत आहे. यासाठी कृषी विभागाचे सह संचालक विकास पाटील,तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे आणि कृषी विभागाच्या टीमचे सहकार्य मिळाले आहे. — निलेश उगवेकर, ८९७५११७७८७ (कृषी पर्यवेक्षक,माणगाव)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com