agriculture news in marathi success story of onion grower farmer from yevala taluka district nashik | Agrowon

शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची उत्पादकता

संतोष घोडेराव
गुरुवार, 4 जून 2020

अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक) शेतकऱ्यांना सातत्याने आपत्तींचा सामना करावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना अंदरसूल येथील प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी उज्वल जाधव यांनी कांदा शेती यशस्वी केली आहे. सुमारे २० एकर शेतीत तीन हंगामात कांदा हे मुख्य पीक घेताना मिनी स्प्रिंकलर, ठिबक, गादीवाफा, मल्चिंग व एकूणच व्यवस्थापनात सुधारणा करून एकरी उत्पादकता सातपासून ते १५ टनांपर्यंत कायम ठेवली आहे.
 

अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक) शेतकऱ्यांना सातत्याने आपत्तींचा सामना करावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना अंदरसूल येथील प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी उज्वल जाधव यांनी कांदा शेती यशस्वी केली आहे. सुमारे २० एकर शेतीत तीन हंगामात कांदा हे मुख्य पीक घेताना मिनी स्प्रिंकलर, ठिबक, गादीवाफा, मल्चिंग व एकूणच व्यवस्थापनात सुधारणा करून एकरी उत्पादकता सातपासून ते १५ टनांपर्यंत कायम ठेवली आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील पाढेगाव रोडलागत वास्तव्य असलेले उज्वल जाधव यांनी प्रगतिशील व अभ्यासू शेतकरी अशी ओळख मिळवली आहे. सन १९९८ मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर सहा महिने खाजगी कंपनीत काम केले. परंतु कंपनीत मन रमेना म्हणून घरची शेतीच करण्याचा संकल्प केला.

मिनी स्प्रिंकलरचा वापर

 • येवला तालुक्याची कमी पर्जन्यमान अशीच ओळख आहे. त्यामुळे नवे प्रयोग करणे म्हणजे जोखमीचेच असते. तरीही जाधव यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तालुक्यातील मुख्य पीक असलेले कांदा पीक यशस्वी करण्याचे ठरवले. वडील बाबूराव यांचे मोलाचे मार्गदर्शन व संपूर्ण कुटुंबाची खंबीर साथ लाभली. सन २००४ मध्ये शेतीला धरणातून पाणी पुरवठा नियमित होऊ लागला. त्यानंतर पाणी व्यवस्थापन सुकर झाले.
 • सन २००७-०८ मध्ये प्रथमच वीस एकर क्षेत्रापैकी तीन एकरांवर लाल कांद्याला पाणी देण्यासाठी मिनी स्प्रिंकलरचा (सूक्ष्म तुषार सिंचन) पर्याय निवडला. कृषी विषयातील शिक्षणाची बाजूही सबळ होती. व्यवस्थापन सुधारले. त्यातून पुढील वर्षी पाच एकर उन्हाळी कांद्यासाठी या स्प्रिंकलरचा वापर केला. त्यातून एकरी २१ टन उत्पादन मिळाले. कांद्याची पाच महिने चाळीत उत्तम प्रकारे साठवण केली.

सिंचनाचे अनुभव
सूक्ष्म तुषार सिंचनाबाबतीत अनेक शेतकऱ्यांत गैरसमज असल्याचे जाधव सांगतात. मात्र योग्य नियोजन केल्यास कमी पाणी असलेल्या शेतकऱ्यांना हे तंत्र वरदान ठरणार असल्याचे आपल्या अनुभवातून ते म्हणतात. मिनी स्प्रिंकलरचा वापर गहू, हरभरा, सोयाबीन तसेच २०१४ मध्ये कांदा बीजोत्पादनासाठी देखील केला. त्यापलीकडे जाऊन २०१५ मध्ये पाण्याचा तुटवडा होता. त्यामुळे बिजोत्पादन ठिबक व पॉली मल्चिंगवर घेण्याचा प्रयोग यशस्वी केला. पिकाला दररोज केवळ १० ते १५ मिनिटे पाणी चालत असल्याच्या स्थितीत मल्चिंग पेपरद्वारे बिजोत्पादन पूर्णतः यशस्वी केले. संरक्षित पाण्यासाठी सुमारे ३० गुंठ्यात शेततळे उभारले आहे.

कांदा शेती

 • एकूण क्षेत्र - १५ ते २० एकर (दरवर्षी पाऊस, हवामानानुसार अवलंबून)
 • पैकी साडे १७ एकरांत मिनी स्प्रिंकलर
 • अडीच एकरांत ठिबक सिंचन
 • खरीप, रांगडा व उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड
 • वाण- स्थानिक

व्यवस्थापनातील बाबी

 • पिकास नत्रयुक्त खताचा मर्यादित वापर. १०- २६- २६ या रासायनिक खताचा वापर लागवडीवेळी ४ बॅग्ज (प्रति ५० किलो) असा वापर. यातही बदल सुरू आहे.
 • भूसुधारकाचा वापर ७ - ८ वर्षांपासून. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आहे.
 • पीक अवशेषांचाही खत म्हणून वापर
 • आपले बियाणे शुध्द व खात्रीशीर असावे यासाठी गरजेएवढे बिजोत्पादन.
 • बीजोत्पादनात काही वेळेस परागीकरणासाठी मधमाश्यांचा अभाव असतो. त्यासाठी मधमाश्यांचे पोळे रात्रीच्या वेळी अलगद काढून डोंगळ्याच्या शेतात ठेवण्यात येते. तरीही अडचण आल्यास हातात मऊ हातमोजे घालून हळुवारपणे डोंगळ्यांची हाताळणी होते.
 • लागवड गादीवाफ्यावरच केली जाते.
 • जाधव सांगतात की रोपवाटिकेत पारंपरिक पद्धतीने बियाणे वापर केल्यास ते एकसमान पद्धतीने उगवून येत नाही. वाया जाते. त्याऐवजी गादीवाफ्यावर हाताने खुरप्याच्या साहाय्याने गही करून टाकल्यास सुमारे ३० टक्क्यापर्यंत बियाणे बचत होते. बियाणे एकसमान पद्धतीने उगवून येते.
 • लागवडीपूर्वी रोपवाटिकेतच बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करण्यात येते.
 • लागवड ताज्या व निरोगी रोपांची केली जाते. शक्यतो २ ते ३ दिवस अगोदर उपटलेले रोप वापरू नये.
 • पूर्ण लागवड केल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर पाणी द्यावे असेही जाधव सांगतात.

मिनी स्प्रिंकलर तंत्राचे महत्त्व

 • जाधव म्हणतात की पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. पाण्याच्या दोन हप्त्यांतील अंतर तसेच पाण्याचा हप्ता निश्‍चित करून घ्यावा. वातावरणानुसार थोडा बदल करावा.
 • या तंत्रात पाण्याचा योग्य दाब फार महत्त्वाचा असतो.
 • हंगामातील शेवटचे पाणी हे या तंत्रात महत्त्वाचे असते. कांद्याची पात पडण्याआधी शेवटच्या पाण्याचे नियोजन केल्यास कांदा सडत नाही. या तंत्राद्वारे तीनही हंगामात कांदा घेता येतो.

या तंत्राचे झालेले फायदे

 • पाण्याची ३० टक्के बचत
 • कांद्याचे संपूर्ण शेत भिजवणे गरजेचे असल्याने ठिबकच्या तुलनेत हे तंत्र अधिक फायदेशीर असा अनुभव.
 • लागवड करत असताना जमीन अगोदर ओली करता येते. त्यामुळे रोपांची मर होत नाही.
 • जमिनीत ढेकळे नसल्यामुळे मजुरांना लागवड करणे सोपे होते.
 • यात गन टू गन १४ फूट अंतर (चारही बाजूंना) ठेवण्यात येते.
 • शेत कोरडे राहत नाही.
 • आठवड्यातून दोन वेळा (चार तास) सिंचन.
 • पाण्याची उपलब्धता कमी आल्यास १० ते १५ मिनिटे सुद्धा पाणी देता येते.
 • जमीन कायम भुसभुशीत असल्याने कांदा पोसण्यास मदत होते.
 • धुक्याच्या वातावरणातही पातीवरील धुके बाजूला काढण्यासाठी वापर
 • रात्रीच्या वेळेस पाणी देणे सोपे.

उत्पादन

 • खरीप कांद्याचे एकरी सात ते नऊ टनांपर्यंत व क्वचित प्रसंगी १२ टन उत्पादन येते. पावसाळा असल्याने तेवढे उत्पादन मिळत नाही. रांगडा कांद्याला थंडी मानवत असल्याने एकरी १० ते १७ टन उत्पादन मिळते.
 • उन्हाळी कांद्याचे किमान १५ टन उत्पादन मिळते. एकेवर्षी ते २३ ते २४ टनांपर्यंतही मिळाले आहे. कांद्याच्या जोडीला अन्य पिके असतात. यात खरिपात सोयाबीन तर परिस्थितीनुसार घरी खाण्यासाठी गहू व काही वेळा हरभरा देखील घेण्यात येतो.

सहकार्य
जाधव यांना आई, वडील, पत्नी यांची खंबीर साथ लाभते. मोठा मुलगा कृषी पदविकेचे शिक्षण घेत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीकामात सहकार्य करतो. तालुका कृषी अधिकारी, एनएचआरडीएफ संस्थेतील शास्त्रज्ञ व मित्रांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे.

संपर्क- उज्वल जाधव- ९८३४९०६७४०, ९८६०७२५४२१


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...
विदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत...संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची...
भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील...
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली...जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (...
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा...नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील...