‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा दर्जेदार ब्रॅंड

नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर सेंद्रिय शेती गटातील शेतकऱ्यांनी आपल्या भातशेतीला पूरक म्हणून हळदीची शेती यशस्वी केली. त्यावर प्रक्रिया करून हळद पावडरीची निर्मिती व त्यास बाजारपेठही तयार केली. त्यातून नफा वाढवला.
Organically grown turmeric is sold by Rayareshwar brand
Organically grown turmeric is sold by Rayareshwar brand

नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर सेंद्रिय शेती गटातील शेतकऱ्यांनी आपल्या भातशेतीला पूरक म्हणून हळदीची शेती यशस्वी केली. त्यावर प्रक्रिया करून हळद पावडरीची निर्मिती व त्यास बाजारपेठही तयार केली. त्यातून नफा वाढवला. आता सेंद्रिय पद्धतीने शेती करून ग्राहकांमध्ये सेंद्रिय हळदही लोकप्रिय केली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे. भाताबरोबरच नाचणी, भुईमूग, हरभरा ही पिकेही येथील शेतकरी घेतात. तालुक्यातील नाटंबी गावात श्री. रायरेश्वर शेतकरी गट २०१४-१५ मध्ये स्थापन करण्यात आला. त्यात वीस शेतकरी आहेत. पैकी सुमारे सात शेतकऱ्यांनी भातशेतीला पूरक म्हणून हळदीची शेती सुरू केली. यात नारायण धोंडीबा साळुंके, शिवाजी शंकर घाटे, रोहीद्दास खोपडे, त्यानंतर मनोज जेधे, रामचंद्र खोपडे, रणधीर जेधे, नथु मांढरे आदींचा समावेश होता. आत्मा विभागाने त्यांना तंत्रसाह्य दिले. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे अभ्यासदौराही आयोजित करण्यात आला. हळदीचा प्रयोग हळद पिकासाठी या भागातील वातावरण पोषक ठरले. शेतकरी एकरी चांगले उत्पादन घेऊ लागले. मात्र केवळ बाजार समितीत हळद विकण्यापेक्षा त्याची पावडर तयार केली तर नफ्यात वाढ होईल हे त्यांना उमगले. त्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजनास सुरुवात केली. नारायण धोंडिंबा साळुंके यांचे त्यात प्रातिनिधिक उदाहरण देता येते. त्यांची पाच ते सहा एकर शेती आहे. त्यात गरजेनुसार अर्ध्या एकरापासून ते एक एकरांपर्यंत ते हळद घेतात. दरवर्षी जेवढी हळद विकली जाते त्यानुसारच शेतीचे क्षेत्र ठेवायचे असे त्यांचे धोरण आहे. आता गटाची नोंदणी सेंद्रिय गटांतर्गतही झाली असून गटातील सदस्यांनी सेंद्रिय हळदीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. हळद शिजविण्याचा कुकर सुमारे ६० हजार रुपयांना स्थानिक स्तरावर बनवून घेतला आहे. हळदीवर अशी होते प्रक्रिया

  • साधारणपणे जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान हळदीची काढणी केली जाते. त्यानंतर फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रक्रिया केली जाते. साफ करून शिजवणे, त्यानंतर सुकवणे व यंत्राद्वारे पॉलिशिंग केले जाते.
  • सध्या पावडर तयार करण्यासाठी मात्र या शेतकऱ्यांना वाई येथे हळद न्यावी लागते.
  • येत्या काळात त्यासाठीचे यंत्र खरेदी केले जाणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले. स्थानिक भागात पावडर तयार करण्यासाठी किलोला २० ते ३० रुपये दर आहेत. हीच प्रक्रिया वाई येथे किलोला ९ ते १० रुपये दरात करून मिळते. एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांची हळद असल्याने ते आर्थिक दृष्ट्य़ा परवडते.
  • विक्री व्यवस्था

  • गटातील शेतकऱ्यांनी बहुतांशी बाजारपेठ स्थानिक स्तरावरच मिळवली आहे. यात गावाकडील रहिवासी, पुणे येथे नोकरी करणारे गावाकडील लोक, कृषी विभाग, पंचायत समिती, शिक्षक आदी ग्राहकांचा समावेश आहे. त्याशिवाय पुणे येथील धान्य महोत्सवातही या शेतकऱ्यांचा सहभाग राहतो. या हळदीत रासायनिक घटक नसल्याची तपासणी परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत मोफत करून देण्यात आली आहे. त्याचा फायदा विक्री करताना झाला. महोत्सवात खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक पुढे गटातील शेतकऱ्यांना संपर्क करून त्यांचे कायमस्वरूपी ग्राहक बनतात.
  • विक्री गटाच्याच नावाने केली जाते. साळुंखे यांनी आपल्या हळदीसाठी सुमारे ५०० ते ६०० ग्राहक जोडले आहेत. गटातील सर्वांची मिळून ग्राहकांची संख्या साडेतीनहजारांपर्यंत गेली आहे. गटाचे अध्यक्ष नथू नारायण मांढरे व साळुंखे यांचे गटातील अन्य सदस्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.
  • किफायतशीर उत्पन्न

  • हळद पिकांसाठी जमीन तयार करणे, बियाणे, मशागत, लागवड करणे, खते, कीडनाशके, काढणी, शिजवणे, पॉलिश, पावडर करणे आणि पॅकिंग इथपर्यंत एकरी किमान खर्च ६५ हजार रुपयांपर्यंत येतो. साधारणपणे एकरी २५ ते ३० क्विटंलपर्यंत सुकवलेल्या हळदीचे उत्पादन मिळते. त्यापासून सुमारे ५ ते ६ क्विंटल पावडर तयार होते. पुणे भागात त्याची विक्री प्रति किलो २०० रुपये दराने तर अन्य ठिकाणी २२० रुपये दराने होते.
  • साळुंके म्हणाले की बाजारात हळद विकल्यास आम्हांला किलोला ६० ते १०० रुपये असा दर मिळाला असता. त्याऐवजी मूल्यवर्धन केल्यास किलोला १०० रुपये दर अधिक मिळतो. आमच्या हळदीचा दर्जा उत्तम असल्याने व अत्यंत खात्रीचा माल असल्याने ग्राहकांकडून त्यास चांगली मागणी असते. सध्या पीजीएस पद्धतीने सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रिया केली आहे. सर्वांची मिळून वर्षाला सुमारे दोन टनांपर्यंत विक्री होत असल्याचे साळुंके यांनी सांगितले.
  • संपर्क- नारायण साळुंके, ९६२३८१७६०७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com