agriculture news in marathi success story of organic vegetables grower farmer from Nrusinhawadi village district kolhapur | Agrowon

सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे पॅटर्न'

राजकुमार चौगुले
मंगळवार, 26 मे 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील धैर्यशील जगदाळे गेल्या सहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीत गुंतले आहेत. फळभाज्या व पालेभाज्या मिळून सुमारे १५ प्रकारच्या शेतमालाचे उत्पादन त्यांच्या शेतात वर्षभर चक्राकार पद्धतीने सुरू असते. आपल्या भाज्यांना निश्‍चित दर व ग्राहकही तयार केला आहे. केवळ नफा या गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता आरोग्यदायी उत्पादनांची निर्मिती हे उद्दिष्ट ठेऊन त्यांची शेतीतील वाटचाल सुरू आहे.
 

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील धैर्यशील जगदाळे गेल्या सहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीत गुंतले आहेत. फळभाज्या व पालेभाज्या मिळून सुमारे १५ प्रकारच्या शेतमालाचे उत्पादन त्यांच्या शेतात वर्षभर चक्राकार पद्धतीने सुरू असते. आपल्या भाज्यांना निश्‍चित दर व ग्राहकही तयार केला आहे. केवळ नफा या गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता आरोग्यदायी उत्पादनांची निर्मिती हे उद्दिष्ट ठेऊन त्यांची शेतीतील वाटचाल सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथे धैर्यशील जगदाळे यांची अडीच एकर शेती आहे. या परिसरातील प्रगतिशील शेतकरी म्हणून ते ओळखले जातात. शेती थोडीच असली तरी त्यातही विविध पिकांचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन त्यांनी केले आहे. सुमारे सव्वा एकरांत भाजीपाला पिकांचा उत्तम मेळ साधला आहे.

सेंद्रिय शेतीची होते अशी जोपासना

 • प्रकृती बिघडून औषधांवर खर्च करीत राहण्यापेक्षा सकस व रासायनिक अंश मुक्त अन्न खाऊन आपले आरोग्य नेहमी चांगले ठेवले पाहिजे यावर जगदाळे यांचा कटाक्ष आहे. त्याच दृष्टीने सहा वर्षांपासून जगदाळे यांनी सेंद्रिय शेतीची जोपासना सुरू केली आहे.
 • वर्षभर विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन. यात सुमारे १५ प्रकार.
 • वांगी, दोडका, मिरची, भेंडी, कारली, दुधीभोपळा तर पालेभाज्यांत शेपू, अंबाडी, कोथिंबीर, पालक, चाकवत आदी प्रकार
 • कल्पकता वापरून लागवडीचे नियोजन
 • साधारणतः: प्रत्येकी पाच गुंठ्यामध्ये प्रत्येक भाजीपाला.
 • ते करताना दोन गुंठ्यात लागवड करून पुन्हा १० दिवसांनी त्याची लागवड. एकाची तोड होईपर्यंत दुसऱ्या सरीतील भाजीपाला फुलोऱ्यात येतो. म्हणजे त्या पिकाची उपलब्धता ग्राहकांच्या मागणीनुसार अखंड सुरू राहावी असा उद्देश.
 • त्याचा आणखी एक फायदा म्हणजे एकाचवेळी भरपूर काढणी व होता घरच्या मनुष्यबळाच्या आधारे थोडी थोडी काढणी करणे सोपे होते.

सेंद्रिय घटकांवर भर

 • पॉलील्चिंगचा वापर केला जातो. त्याचबरोबर पालापाचोळा, पीक अवशेष यांचाही वापर होतो.
 • सहा वर्षांत कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर केला नसल्याचे जगदाळे सांगतात.
 • शेणखतावर अधिक भर असतो. यात दरवर्षी एकरी २० ते २५ बैलगाड्या शेणखत उपलब्ध होईल असा प्रयत्न असतो. घरच्या ४ ते ५ देशी गायी आहेत. प्रसंगी खत बाहेरूनही खरेदी केले जाते.
 • जीवामृत, दशपर्णी अर्क, कडुनिंबाचा अर्क असलेले घटक व कंपन्यांची जैविक कीडनाशके
 • यांचा वापर केला जातो.
 • प्रतिकूल हवामानामुळे काहीवेळा किडी-रोगांमुळे शेताचे नुकसानही झाले आहे. मात्र रासायनिक कीडनाशकांचा वापर त्यावेळी न केल्याचे जगदाळे सांगतात.
 • शेती व्यवस्थापनात कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा असतो.

विक्रीची पध्दत

 • नृसिंहवाडी हे श्री. दत्तात्रय यांचे धार्मिक स्थळ असल्याने राज्यभरातून येथे वर्षभर भाविक येत असतात. देवस्थानमार्गावरच जगदाळे यांचे शेत आहे. तिथेच त्यांनी शेतमालाचा कायमस्वरूपी स्टॉल थाटला आहे. तेथूनच ग्राहकांना थेट विक्री होते. दररोज ताजा व तेही सेंद्रिय भाजीपाला असल्याने ग्राहकांकडूनही त्यास नेहमी पसंती असते. अलीकडील वर्षांपासून अनेक ग्राहकांसोबत त्यांचे नाते तयार झाले आहे. शिवाय बाहेरून आलेले भाविक देखील जगदाळे यांच्या स्टॉलवरून भाजीपाला घेऊन जातात.
 • काहीवेळा आपल्या शेतातील भाजीपाला शेती देखील जगदाळे ग्राहकांना दाखवतात. याशिवाय सांगली व शेजारील अन्य बाजारापेठांतही भाजीपाला गरजेनुसार पाठविला जातो. आपल्याकडील दुधीभोपळा किंवा अन्य भाज्या घेण्यासाठी काही किलोमीटर अंतरवरूनही ग्राहक काहीवेळा येत असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

फळे व स्वीटकॉर्न
जगदाळे भाजीपाला पिकांबरोबर स्वीट कॉर्न, कलिंगड यांचीही शेतीही करतात. त्यांचीही विक्री स्टॉलद्वारे होते. स्वीट कॉर्नला नगाला १० ते १२ रुपये दर मिळतो. त्यांना तीन भाऊ आहेत. पैकी एक भाऊ झुणका- भाकर व्यवसाय चालवतो. त्याची विक्रीही स्टॉलद्वारे करण्यात येते.

सेंद्रिय शेतीतील फायदा
जगदाळे यांनी आपल्या फळभाज्यांचे दर किलोला ८० रुपये असे निश्‍चित ठेवले आहे. वर्षभर या दरांत फारसा फरक होत नाही. पालेभाज्यांची पेंडी प्रति नग वीस रुपये दराने विकली जाते. रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेती करणे आव्हानाचे असते. अनेकवेळा नुकसानीचा सामना करावा लागतो. तरीही या शेतीत सातत्य ठेवले आहे. वर्षभर सर्व विक्रीतून पंचवीस टक्क्यांपर्यंत नफा शिल्लक राहतो.

पिवळ्या कलिंगडाचा प्रयोग

 • जगदाळे यांनी अभ्यासूवृत्ती जपली आहे. सातत्याने विविध प्रदर्शनांना भेट देवून ते शेती तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी पुणे येथून पिवळ्या कलिंगडाचे बी आणले होते. मात्र त्याची लागवड यशस्वी झाली नव्हती. मागील वर्षीच्या पुरातून सावरल्यानंतर त्यांनी भाजीपाल्याबरोबर नेहमीच्या कलिंगडासोबत पिवळ्या कलिंगडाचाही प्रयोग यंदाच्या उन्हाळ्यात अर्धा एकर क्षेत्रात राबवला.
 • उत्पादन सुरु होण्यावेळीच कोरोना लॉकडाऊनचा काळ सुरू झाला. हवामानाचा परिणाम झाला. तरीही दोन ते तीन टन उत्पादन हाती आले. ८० रुपये प्रति नग या दराने त्याची विक्री केली. या थेट विक्रीतूनही संकटाच्या काळात उत्पन्नाचा हात मिळाला.

महापुरात नुकसान, पण खचलो नाही
जगदाळे यांचे मागील वर्षांच्या महापुरात मोठे नुकसान झाले. रामफळ, सीताफळ, केळी या झाडांचे नुकसान झाले. तरीही हिंम्मत एकवटून आता यंदा पुन्हा त्यांची नव्याने लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपर्क- धैर्यशील जगदाळे-९६२३९५५४२९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...