शेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ मिळाले, की महिला देखील शेतीमध्ये वेगळेपण
महिला
रेशीम शेतीने दिली आर्थिक प्रगतीची दिशा
शेतमाल दरातील अस्थिरतेमुळे सातत्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही अस्थिरता दूर करण्यासाठी रेशीम शेती हा चांगला पर्याय शेतकऱ्यांच्या समोर आहे. साखरवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील प्रयोगशील महिला शेतकरी पद्मावती नंदकुमार भोसले यांनी भाजीपाला लागवडीला रेशीम शेतीची जोड दिली आहे. महिलांची उत्पादक कंपनी स्थापन करून भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे नियोजनही केले आहे.
शेतमाल दरातील अस्थिरतेमुळे सातत्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही अस्थिरता दूर करण्यासाठी रेशीम शेती हा चांगला पर्याय शेतकऱ्यांच्या समोर आहे. साखरवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील प्रयोगशील महिला शेतकरी पद्मावती नंदकुमार भोसले यांनी भाजीपाला लागवडीला रेशीम शेतीची जोड दिली आहे. महिलांची उत्पादक कंपनी स्थापन करून भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे नियोजनही केले आहे.
सातारा जिल्ह्यात २०१२ सालातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या रेशीम शेतीने गेल्या तीन वर्षापासून पुन्हा चांगले बाळसे धरले आहे. सातारा जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यासह पश्चिम भागातही रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. पिकांच्या दरातील अशाश्वतता आणि इतर पिकांच्यापेक्षा कमी खर्चात रेशीम शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत असल्याने तरुण शेतकरी तसेच महिला शेतकरी रेशीम शेतीमध्ये उतरत आहेत. फलटण तालुक्यातील साखरवाडी शिवारात पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने ऊस तसेच भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या गावातील प्रयोगशील महिला शेतकरी पद्मावती नंदकुमार भोसले यांनी पारंपरिक पिकांच्या जोडीला रेशीम शेतीची जोड दिली आहे.
भोसले कुटुंबाची आठ एकर शेती आहे. पद्मावतीताईंचे पती नंदकुमार आणि मुलगा हर्षवर्धन यांच्याकडे शेतीची जबाबदारी आहे. २००१ मध्ये नंदकुमार भोसले यांनी रेशीम शेतीला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी दोन एकरावर तुती लागवड केली होती. रेशीम कीटक संगोपनासाठी ६० बाय २२ फूट आकाराचे शेड उभारले होते. यामध्ये २०० अंडीपुजांची एक बॅच घेतली जायची. या काळात रेशीम कोष विक्रीसाठी जवळची बाजारपेठ नसल्याने वाई येथील रेशीम कार्यालयात कोषाची विक्री केली जात होती. रेशीम शेती आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने नंदकुमार भोसले यांनी गावातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा सल्ला दिला. यातून गावात चाळीसच्यावर शेतकऱ्यांनी ४० एकरावर तुती लागवड केली होती. चार ते पाच वर्षे रेशीम शेती चांगल्या प्रकारे विकसित झाली. शेतकऱ्यांना फायदादेखील झाला.परंतू दरम्यानच्या काळात उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने रेशीम शेती बंद झाली. भोसले कुटुंबीयांनीदेखील रेशीम शेती बंद करून ऊस, भाजीपाला लागवडीकडे लक्ष दिले. चार वर्षे भेंडीची निर्यातदेखील केली. याचदरम्यान २०१६ मध्ये भोसले पती-पत्नी बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी गेले होते. प्रशिक्षण वर्गात तज्ज्ञांच्या सल्ल्याने पद्मावती भोसले यांनी पुन्हा एकदा रेशीम शेती करण्याचे नियोजन केले. प्रशिक्षणामध्ये मनरेगामधून तुती लागवड आणि इतर गोष्टीसाठी अनुदानाची माहिती मिळाली. रेशीम शेतीत झालेले बदल तसेच बाजारपेठेची माहिती घेत पुन्हा एकदा पद्मावतीताई पुन्हा रेशीम शेतीकडे वळल्या.
महिला शेतकरी कंपनीची स्थापना
पद्मावती भोसले या मातोश्री महिला बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा आहेत. यामध्ये दोन हजार महिला सभासद आहेत. महिलांना पूरक व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. याचबरोबरीने वसुधंरा व आंनदी महिला बचत गट चालवितात. महिला शेतकऱ्यांसाठी पद्मावतीताईंनी फलटण तालुका वूमन फार्मर प्रोड्युसर कंपनीची सुरवात केली आहे. यामध्ये ५०० महिला सभासद आहेत. या कंपनीच्या माध्यमातून पुढील पंधरा दिवसात भेंडी चिप्स उत्पादनाला सुरवात होत आहे. पद्मावतीताईंचे पती नंदकुमार हे प्रगतिशील शेतकरी असून गेल्या आठ वर्षापासून भेंडी, भोपळा व मिरचीचे निर्यातक्षम उत्पादन घेतात. पद्मावतीताईंकडे या निर्यात होण्याऱ्या भाजीपाल्याची तोडणी आणि प्रतवारीची जबाबदारी आहे.
नव्याने रेशीम शेतीला सुरवात
प्रशिक्षणानंतर पद्मावतीताईंनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून २०१६ साली एक एकर तुती लागवडीचा निर्णय घेतला. दोन रोपातील अंतर दोन फूट तर दोन सरीतील अंतर तीन फूट आणि मध्ये पाच फुटांचा पट्टा ठेवून व्ही-१ तुती जातीची लागवड केली. वाई येथील रेशीम कार्यालयातून मिळालेल्या २०० अंडीपुजांची पहिली बॅच त्यांनी घेतली. यातून १५० किलो रेशीम कोष उत्पादन मिळाले. कर्नाटकातील रामनगर येथे रेशीम कोष विक्रीसाठी पाठवले. त्यावेळी त्यांना प्रति किलो ३०० रुपये दर मिळाल्याने खर्च वजा जाता तीस हजारांचे उत्पन्न मिळाले. कमी कालावधी, कमी खर्च आणि कमी वेळात अपेक्षित नफा रेशीम शेतीतून मिळाल्याने त्यांनी तुती व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपनावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे. आता दरवर्षी पाच ते सहा बॅच घेतल्या जातात. एका बॅचमध्ये रेशीम कोषांचे १३० ते १३५ किलो उत्पादन मिळते. रेशीम शेतीची सर्व जबाबदारी पद्मावतीताईंकडे आहे.
व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
- शेड पूर्व-पश्चिम, हवा खेळती राहावी अशा पद्धतीची रचना.
- तुतीच्या दर्जेदार पाला उत्पादनासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर.
- नियमितपणे शेड, चंद्रिका, ट्रे निर्जंतुकीकरण.
- खते, पाणी, खुरपणी याकडे काटेकोर लक्ष.
- प्रत्येक बॅच २०० अंडीपुंजांची, प्रति बॅच १३५ किलो कोष उत्पादन. दरवर्षी पाच ते सहा बॅच.
- बाळ अळी तसेच कोषाची शेवटच्या सात दिवसांत विशेष काळजी.
- शेडमध्ये थंडीच्या काळात उष्णता तर उन्हाळ्यात गारवा राहण्यासाठी नियोजन.
- रेशीम कीटकांना वेळेवर योग्य प्रमाणात पाला दिला जातो.
- सुरवातीच्या काळात रामनगर (कर्नाटक) तर सध्या बारामती येथे कोष विक्री.
किफायतशीर ठरली रेशीम शेती
रेशीम शेतीच्या व्यवस्थापनात पद्मावतीताई म्हणाल्या की, रेशीम शेती हा कमी भांडवलात सुरू होणारा व्यवसाय आहे. मनरेगांतर्गत एक एकर तुतीची लागवड केली आहे. रेशीम कार्यालयाकडून अनुदानही मिळाले. रेशीम शेती नियोजनात जिल्हा रेशीम कार्यालयाची चांगली मदत होते. मी वर्षाकाठी पाच ते सहा बॅच घेते. प्रत्येक बॅचपासून खर्च वजा जाता तीस हजार रुपये नफा मिळतो. हमखास पैसे येण्याची खात्री असल्यामुळे आर्थिक नियोजन होण्यास मदत होते. मला या रेशीम शेतीमध्ये पती नंदकुमार, मुलगा हर्षवर्धन यांची मदत होते. मोठा मुलगा शुंभराजे हा वकील असून वेळ काढून शेती नियोजनात मदत करतो.
- पद्मावती भोसले, ७७७५०००५०३, ९४२३८६३९६०
फोटो गॅलरी
- 1 of 14
- ››