शेळी,कुक्कुटपालनाने दिली नवी ओळख

हनुमंतखेडा (जि. जळगाव) येथीलयोगेश तोयाराम महाजन यांनी आपल्या तीन एकर शेतीला शेळी व कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. अल्प गुंतवणुकीतून या व्यवसायातून बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती होत आहे.
poultry and goat farming of mr, yogesh mahajan
poultry and goat farming of mr, yogesh mahajan

हनुमंतखेडा (जि. जळगाव) येथील योगेश तोयाराम महाजन यांनी आपल्या तीन एकर शेतीला शेळी व कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. अल्प गुंतवणुकीतून या व्यवसायातून बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती होत आहे. शेतीसह पूरक व्यवसायामध्ये संपूर्ण कुटुंब स्वतः राबत असल्याने खर्च मर्यादित राहून नफा वाढण्यास मदत होत आहे. हनुमंतखेडा (ता. पारोळा, जि.जळगाव) परिसरात योगेश महाजन यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. गेल्या १० वर्षांपासून योगेश भाजीपाला व कापूस अशी पिके घेतात. बारमाही भाजीपाल्यात मिरची, वांगी, काकडी ही पिके असतात. तर एक एकर कापूस असतो. सर्व पिकांसाठी ठिबकची व्यवस्था केली आहे.   शेळीपालनाला सुरुवात... शेतीसोबतच अन्य काही मार्गाने उत्पन्नामध्ये वाढ करण्याची योगेश यांची धडपड चालू होती. दरम्यान ॲग्रोवन मध्ये मालखेडा (ता. चोपडा, जि.जळगाव) यांची शेळीपालनाची यशोगाथा वाचनात आली. शेळीपालक लीलाधर पाटील यांची संपर्क साधत अधिक माहिती घेतली. त्यातील बारकावे, गुंतवणूक वगैरे माहिती जाणून घेतली. तीन वर्षांपूर्वी गावातून दोन शेळ्यांची खरेदी करत सुरुवात केली. त्यासाठी १२ हजार २०० रुपये खर्च आला. या शेळ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. सद्यःस्थितीत बोकड व शेळ्यांची संख्या ३७ वर पोचली आहे. गेल्या दोन वर्षात १५ बोकडांची जागेवरच विक्री केली. एक बोकड आठ ते १० हजारात विकले जाते. शेळीपालनातून गेले दोन वर्षे उत्पन्न होत आहे. साधारणपणे प्रति वर्ष ७५ ते ८० हजार रुपये हाती आले. या वर्षी कोरोना, लॉकडाऊन यामुळे जनावरांचे बाजार बंद असल्याने बोकडांचे दर कमी राहिले. तशीच मागणी फारशी नव्हती. आवश्यकतेनुसार फक्त काही शेळ्यांची विक्री केली. कमी दरामध्ये बोकडांची विक्री करणे टाळले.  माळरानाचा चराईला उपयोग शेळ्यांची नोव्हेंबरपासून माळरानात चराई सुरू होते. परिसरात खडकाळ, मुरमाड भाग असल्याने काटेरी झुडपे व इतर वनस्पती अधिक आहेत. त्यांचा शेळ्यांना चारा म्हणून चांगला उपयोग होत असतो. शेळ्या रोज दोनदा म्हणजेच सकाळी व सायंकाळी चराईसाठी सोडल्या जातात. योगेश किंवा वडील तोयाराम हे शेळ्या चराईसाठी नेतात. शेळ्यांच्या संख्या वाढत चालल्यानंतर दीड वर्षापूर्वी शेतातच शेड तयार केले आहे. त्याचे उद्‌घाटन योगेश यांनी पशुपालक लीलाधर पाटील यांच्या हस्ते करून घेतले. फक्त पावसाळ्यात शेळ्या शेडमध्ये बंदिस्त असतात. या काळात चारा उपलब्ध व्हावा, यासाठी कपाशीनंतर मक्याची लागवड केली जाते. मका, भुईमुगाचा पाला, दादर ज्वारीची कुट्टी यापासून मुरघास तयार करून ठेवतात. चराई आणि लागवड नियोजनामुळे खाद्यावरील खर्चात बचत होण्यास मदत होते.  कुक्कुटपालनातही कमी गुंतवणूक

  • योगेश यांनी वर्षभरापूर्वी देशी कोंबड्यांचे पालन सुरू केले. पारोळा येथील बाजार समितीच्या पशुधन बाजारातून पाच मादी व एक नर खरेदी केल्या. त्यासाठी एकूण १५०० रुपये खर्च आला. या अल्पशा गुंतवणुकीतून त्यांच्यांकडे सध्या ५५ लहान मोठ्या कोंबड्या व कोंबडे आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या अंड्यांची विक्री घरूनच होते. दररोज १५ ते २० अंडी याप्रमाणे विक्री होते. एक अंडे १० रुपये या दराने विकले जाते. मागणीनुसार पाच ते सहा नर कोंबड्यांची विक्री केली जाते. नर कोंबड्याची विक्री ७०० ते ७५० रुपये या दराने होते. 
  • शेतीमध्येच कोंबड्या व शेळ्या यांचे पालन केले जाते. शेत गावापासून दीड किलोमीटर आहे. मात्र, पशुधनाच्या राखणीकडे लक्ष द्यावे लागते. ही जबाबदारी योगेश व त्यांचे वडील सांभाळतात. वन्यप्राणी व अन्य समस्यांपासून संरक्षणासाठी तारेचे कुंपणांचे काम सुरू आहे. पावसाळ्यात शेळ्या व कोंबड्यांना आजार होऊ शकतात. ते टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण वेळीच केले जाते. त्याच प्रमाणे सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार करून घेतले जाते. 
  • शेतीसह पूरक व्यवसायाचा ताळेबंद मे अखेरीस लागवड करत असलेल्या बीटी कापूस पिकाची एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळवतात.   

    वर्ष क्षेत्र  उत्पादन दर
    २०१८ २ एकर १४ क्विंटल ४८०० रु.
    २०१९ १ एकर ९ क्विंटल ५२०० रु.
    २०२० १ एकर पीक सध्या सुरू --

    उर्वरित क्षेत्रामध्ये काकडी, मिरची, वांगी ही पिके असतात. त्यात वांगे साधारण एक एकर क्षेत्रामध्ये असते. हिरव्या काटेरी वांग्याची लागवड करण्यास योगेश यांची पसंती असते. या वांग्यांना बाजारात चांगला दर मिळतो. दरवर्षी वांगी रोपांची लागवड मे महिन्यात करतात. या वर्षी ३ जून रोजी वांगी लागवड केली आहे. काढणी जुलैमध्ये सुरू होते. पुढे फेब्रुवारी -मार्चपर्यंत काढणी सुरू असते. दर तीन दिवसाला वांग्याचा तोडा होतो. आत्तापर्यंत ११ तोडे झाले आहेत. प्रति तोडा साधारणपणे ७ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते. वांग्यांच्या दरामध्ये १० ते ५० रुपये प्रति किलोपर्यंत चढ उतार होत राहतात. सरासरी दर २५ रुपये इतका पडतो. चोपडा, अंमळनेर येथील बाजार समितीत भाजीपाल्याची विक्री करतात. गेले दोन वर्षे वांग्यांच्या दरामध्ये चढउतार होतात. मात्र, काढणी व इतर मजुरी खर्च कमी असल्याने हे पीक बऱ्यापैकी परवडत असल्याचे योगेश सांगतात. सोबत आठ ते १० गुंठ्यात मिरचीची लागवड केली जाते. पूरक व्यवसायातून उत्पन्न 

  • शेळीपालनातून-   ७५ ते ८० हजार रुपये प्रति वर्ष. 
  • कोंबडीपालनातून-  २४ ते ३० हजार रुपये प्रति वर्ष. 
  • पूरक उद्योग व शेतीतून खर्च वगळता दरवर्षी सुमारे अडीच लाख रुपये नफा मिळतो, असे योगेश सांगतात. 
  • मिरची, काकडी पिकातही हातखंडा

  • मिरची पिकाची दरवर्षी १० ते १५ गुंठ्यांत मे अखेरीस लागवड करतात. काढणी ऑगस्टमध्ये सुरू होते. दर पाच दिवसाआड काढणी केली जाते. चार ते पाच क्विंटल मिरची पाच दिवसात निघते. मिरचीची विक्री सुरत येथे बाजारात करतात. गावातील अन्य शेतकऱ्यांसोबत एकत्रित मिरची पाठवत असल्याने खर्चात बचत होते. तेथे दर चांगले मिळत असल्याने सुरतला मिरची पाठवण्याचे  प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी सरासरी २० रुपये किलो दर मिळाला. यंदा ३५ रुपये प्रति किलो दर आहे. मिरचीची काढणी मार्चपर्यंत सुरू राहते.  
  • काकडीची लागवडही मे महिन्यात सुमारे १० ते १२ गुंठ्यांत केली जाते. काकडीच्या उत्पादनाला जुलै महिन्यात सुरवात होते. दर दोन दिवसाआड काढणी केली जाते. प्रति तोडा चार ते पाच क्विंटल काकडी मिळते. तिची विक्रीदेखील सुरत बाजारात केली जाते. गेल्या वर्षी सरासरी १५ रुपये प्रति किलो दर मिळाला होता. यंदा प्रतिकिलो १० रुपयेपर्यंत दर मिळाला आहे.
  • संपर्क- योगेश महाजन, ७६२०७ ६०९००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com