अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय प्रगती

उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून केवळ दीड एकर शेतीतून आपला संसार, शेती व पूरक व्यवसाय उभे केले. प्रत्येक संकटाला धीराने तोंड देत पती व मुलगा यांच्या आधाराने उत्पन्नाचे स्रोत वाढवत शेती व कुटुंबाचे अर्थकारणही उंचावले आहे.
Vaishalitai engaged in poultry farming in the backyard
Vaishalitai engaged in poultry farming in the backyard

उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून केवळ दीड एकर शेतीतून आपला संसार, शेती व पूरक व्यवसाय उभे केले. प्रत्येक संकटाला धीराने तोंड देत पती व मुलगा यांच्या आधाराने उत्पन्नाचे स्रोत वाढवत शेती व कुटुंबाचे अर्थकारणही उंचावले आहे. पंचक्रोशीत त्यांनी आपल्या कामांतून स्वतःची ओळख तयार केली आहे. आजूबाजूची परिस्थिती अनुकूल असली की सगळं मनासारखं घडू शकतं. लढण्याची ऊर्मी बोथट होऊन जाते. पण प्रवाहाविरुद्ध पोहून, प्रतिकूल परिस्थितीशी चार हात करून अंगावर अन मनावर उठलेले वळ पाहून आतून पेटून उठल्यानंतरच नवं काही घडतं. स्वकष्टातून रचलेली एकेक वीट पुढे आयुष्यभर जगण्याला उभारी देते. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वैशाली घुगे यांची कहाणी अशीच आहे. लग्नापूर्वी पुणे- थेऊर परिसरात त्या चुलत्यांकडे राहायच्या. शेतीकामाचा कसलाच गंध नव्हता. अशातच बाळासाहेब घुगे यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या सासरी अणदूर येथे आल्या.

विभक्त कुटुंबात परवड पाहाता पाहता दीड वर्ष उलटले. घुगे दांपत्याला संयुक्त कुटुंबापासून विभक्त व्हावे लागले. वाट्याला आली केवळ दीड एकर शेती आणि एक म्हैस. शेतातच पत्रे उभारून संसार थाटला. म्हशीचे दूध व घराशेजारी घेतलेला भाजीपाला विकून चार पैसे येत होते. परिस्थितीमुळे डोक्यावर टोपली घेऊन अणदूरात, नळदूर्गात येऊन वैशालीताई भाजीपाला विक्री करीत. एके रात्री वादळात झोपडीवरचे पत्रे उडून गेले. बाळाला पोटाशी धरून भयभीत अवस्थेत, काळोखी रात्र घुगे दांपत्याने वळचणीला काढली. त्या प्रसंगाने खूप शहाणे केले. जगण्याची भीषणता समोर आली. संकटात तग धरून जगता आले पाहिजे. त्यासाठी खंबीर झाले पाहिजे असे मनोमन वाटले.

स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

  • एके दिवशी भाजीपाला विकण्यासाठी वैशालीताई गेल्या असता वनिता गायकवाड यांनी बचत गट स्थापनेविषयी मार्गदर्शन केले. त्यातून कृषी सखी महिला गट आकारास आला.
  • उत्पन्न व थोडे कर्ज असे करून दोन खोल्यांचे घर शेतात बांधले. दोन वर्षात हप्ते फेडले देखील. पुढे स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेची माहिती कळली. तिथे गोदावरी क्षीरसागर भेटल्या. महिला आरोग्य सखी म्हणून काम केल्यास महिना पंधराशे रुपयाचे मानधन मिळणार होते. उत्पन्नाचे अजून स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरूच होते. त्यातच २०१३ मध्ये मुक्त विद्यापीठाच्या नळदुर्ग उपकेंद्रात वैशालीताईंनी प्रवेश घेतला. शारीरिक, मानसिक हाल सोसून न डगमगता त्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करीत राहिल्या.
  • शेतीतील आर्थिक स्थिरता

  • टप्प्याटप्प्याने घुगे दांपत्याने शेती व पूरक व्यवसायावर अधिक भर दिला.
  • आज सुमारे १२ म्हशी व दोन गायी
  • गांडूळ खत बनवायला सुरुवात. त्याचा वापर घरच्या शेतीत. उर्वरित खताची विक्री
  • प्रति बॅचमध्ये १० टन गांडूळखत तयार होते. किलोला १० रुपये दराने विक्री
  • तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण. अझोला बेड, हायड्रोपोनिक चारा बनवायला सुरुवात.
  • दुधाची सोलापूरला ३२ रूपये प्रति लीटर दराने विक्री
  • कोंबडीपालन

  • दोन वर्षांपूर्वी परसबागेतील गावरान कोंबडीपालन
  • सुमारे २५ हजार रुपयांचे भांडवल गुंतवून त्यातून ७५ हजार रुपयांचे उत्पन्न कमावले
  • १० रुपये प्रति नगाने अंड्यांची विक्री
  • कोंबडीखताच्या ४० रुपयांच्या बॅगेची २५० रुपये दराने सुमारे ५० बॅगांची विक्री.
  • कोंबड्यांची विक्री ४०० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत
  • या व्यवसायातून नगद उत्पन्न.
  • नर्सरीतून उत्पन्नस्त्रोत वाढला

  • शासकीय योजनेतून बायोगॅस युनिट. त्याआधारे स्वयंपाक. स्लरी पिकांना वापरली जाते.
  • गांडुळाचे बेड वाढवून नऊ-दहा केले. त्यातून मिळणाऱ्या व्हर्मीवॉशची द्राक्ष बागायतदारांकडून मागणी
  • गरज ओळखून फळझाडे व शोभेच्या झाडांची रोपवाटिका
  • कृषी विभागाचे अधिकारी, केव्हीकेचे तज्ज्ञ, शेतकरी भेटी देऊ लागले. आंबा, नारळ, चिकू, लिंबू आदींना वर्षभर मागणी असल्याने वर्षाला दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न
  • उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, पुणे येथे बचत गटाच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे स्टॉल
  • शेत झाले प्रशिक्षणवर्ग

  • अनेक ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलावणे
  • त्यातून ॲझोला, कलमे, व्हर्मीवॉश, गांडूळखत, देशी अंडी व कोंबड्यांची विक्री वाढली.
  • आता कृषी विभाग, पशुसंवर्धन, वनीकरण विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे यांच्या प्रशिक्षणासाठी ५० बाय २० फुटाचा प्रशस्त हॉल बांधला. शंभर प्रशिक्षणार्थी बसतील अशी व्यवस्था.
  • शेतीत स्वयंपूर्णता

  • घुगे दांपत्य आज विविध धान्ये, भाजीपाल्यांची शेती करते. घरच्यासाठी वर्षभराचं धान्य त्यातून उपलब्ध होते. बाहेरून खरेदी करण्याचा खर्च कमी झाला आहे.
  • मुरघास, कडबाकुट्टी, म्हशींना खुराक देण्यासाठी भरडा व पीठाचे यंत्र अशा विविध लघू उद्योगातून वर्षाला सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न
  • अनेकांनी वैशालीताईंची प्रेरणा घेऊन स्वत:ची घरे सावरली आहेत.
  • पंधरा-वीस वर्षांपूर्वी वादळात पत्रे उडाली. डोक्यावरचे छत गेले. कोणी चार आण्याचे उधार देत नव्हते. चूल पेटवण्याची भ्रांत होती. परिस्थितीला टक्कर देताना अनेकवेळा अवहेलना, उपास तापास झेलावे लागले. अशा परिस्थितीतून वैशालीताईंनी केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. सन २०१६ मध्ये त्या मुक्त विद्यापीठातून पदवीधर झाल्या. तो आनंदाचा क्षण आठवताना त्यांच्या डोळ्यात आसवं दाटून येतात. आता २१ वर्षे वयाच्या मुलगाही शिक्षण घेण्याबरोबर शेतीत मदत करतो.
  • ॲग्रोवनचा पुरस्कार

  • औरंगाबाद येथे २०१९ मध्ये झालेल्या ॲग्रोवन प्रदर्शनात युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित
  • अहिल्या गर्जना समाज भूषण, चतुरस्त्र नारी पुरस्कार, लातूर येथे कृषीरत्न कृतज्ञता, डोंबीवली येथे पर्यावरण दक्षता पुरस्कारांनी गौरव
  • बळीराजा चेतना अभियानातही आठ जिल्ह्यांतून प्रशिक्षणासाठी निवड
  • संपर्क- वैशाली घुगे- ७९७२८०६०५५ (लेखक सेवानिवृत्त कृषी अधिकारी आणि शेती- पर्यावरण विषयाचे अभ्यासक आहेत) रमेश चिल्ले, ९४२२६१०७७५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com