कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णता

बचत गटातून महिलांनी सुरू केलेले कुक्कुटपालन.
बचत गटातून महिलांनी सुरू केलेले कुक्कुटपालन.

परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके (जि. रत्नागिरी) गावातील मानाई स्वयंसहाय्यता महिला गटाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. एकत्रितपणे कोंबड्यांचे नियोजन आणि स्वतंत्रपणे विक्री अशा पद्धतीने हा समूह कार्यरत आहे. भातशेतीला महिला गटाने कुक्कुटपालनाची चांगली आर्थिक जोड दिली आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या पालीपासून वळके हे गाव चार किलोमीटर अंतरावर आहे. येथील कुणबीवाडीतील महिलांनी एकत्र येऊन २००८ मध्ये मानाई स्वयंसहाय्यता महिला गटाची स्थापना केली. गटाने शासनाच्या अनुदान योजनेतून काजू प्रक्रिया करणारे यंत्रणा खरेदी केले. त्यासाठी एक लाख रुपये खर्च आला. हा गट वर्षाला एक टन काजू बी वर प्रक्रिया करत होता. यासाठी गटातर्फे गावपरिसरातील शेतकऱ्यांकडून काजू बी खरेदी केली जायची. त्यानंतर प्रक्रिया करून विक्रीचे गणित या महलांनी बसविले. त्यातून चांगला आर्थिक फायदा मिळत होता, परंतु प्रक्रिया उद्योगाचा व्याप मोठा होता. मधल्या टप्प्यात काजू प्रक्रिया यंत्रणा बंद पडल्यामुळे प्रक्रिया उद्योग थांबला. त्यामुळे २०१५ नंतर पुन्हा बचत गटातील महिलांपुढे रोजगाराचा प्रश्‍न तयार झाला. त्यावर मार्ग शोधण्यास गटातील सदस्यांनी सुरवात केली. कुक्कुटपालनाला सुरवात  शासनाच्या उमेद अभियानांतर्गत बचत गट चळवळीला चालना देण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात मार्गदर्शन शिबिरांचे विविध गावामध्ये आयोजन सुरू झाले होते. या गटातील सदस्या पूजा भुवड यांचा संपर्क उमेद अभियानाच्या तालुका समन्वयक अर्चना भंडारी यांच्याशी आला. त्यांनी कुक्कुटपालनाची माहिती दिली. त्यानुसार २०१६ मध्ये मानाई गटातील सदस्यांनी घरच्या घरी कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पाली येथील कुक्कुटपालन व्यावसायिक गौतम सावंत यांचे मार्गदर्शन मिळाले. सध्या मानाई स्वयंसहाय्यता महिला गटाच्या अध्यक्षा रजनी रेवाळे आहेत. या गटामध्ये राखी गावडे, पूजा भुवड, सुरेखा तांदळे, वैशाली भुवड, सुरेखा भुवड, वैशाली ताम्हणकर, शोभा गावडे, श्वेता घुम्हे, रेश्मा गावडे, माधुरी सावंत यांचा समावेश आहे. कुक्कुटपालनाबाबत गटातील सदस्या आणि उमेद अभियानाच्या समूह संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत असणाऱ्या पूजा भुवड म्हणाल्या की, पहिल्यांदा गटातील प्रत्येक महिलेने दहा पिल्ले खरेदी करायचे नियोजन केले. त्यानुसार एकत्रितपणे ११० पिल्ले कोल्हापूरमधून विकत आणली. गटाला एक दिवसाचे एक पिल्लू २३ रुपयांना मिळाले. प्रशिक्षणातील माहितीनुसार महिलांनी पिल्लांचे व्यवस्थापन सुरू केले. यामध्ये पिल्लांना खाद्य, पाणी व्यवस्थापन, लसीकरणाची काळजी घेण्यात आली. साधारणपणे दोन ते अडीच महिन्यांत कोंबडी विक्री सुरू झाली. गावामध्येच बहुतांश कोंबड्यांची विक्री झाली. यातून अपेक्षित नफा महिलांना मिळू लागला. त्यामुळे गटातील महिलांनी पुन्हा प्रत्येकी ५० कोंबडी पिल्ले आणली. पुढे हा व्यवसाय चांगलाच वाढला. पंचायत समितीच्या १०० टक्के अनुदानाचा लाभ गटातील महिलांना मिळाला. यातून प्रत्येक महिलेला १०० पिल्ले मिळाली. सुरवातीला गटातील सहा महिलांनी आठ हजार रुपये गुंतवले. अनुदान जमा झाल्यावर या महिलांनी रक्कम वाटून घेतली.  कोंबड्यांचे योग्य व्यवस्थापन  

  • कोकणातील हवामानाला पूरक आणि ग्राहकांना पसंत असलेल्या कावेरी, डीपी क्रॉस, वनराजा या सुधारित जातीच्या कोंबड्यांचे संगोपन गटाने सुरू केले. त्याचबराेबरीने काही प्रमाणात गावठी जातीच्या कोंबड्यांचे संगोपन केले जाते. 
  • पिल्ले आणताना शिमगा, आखाड, गौरी सण यांचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार दोन ते तीन महिने आधी पिल्ले आणली जातात. जेणेकरून मागणीच्या काळात कोंबड्यांची चांगली विक्री होते. दरही चांगला मिळतो. कोल्हापूरमधून पिल्ले आणताना बॉक्सचा उपयोग केला जातो. एक दिवसाची पिल्ले असल्यामुळे काहीवेळा ५० पिलांमागे ३ ते ४ मृत होतात. हे नुकसान सहन करावे लागते. 
  • वेळापत्रकानुसार खाद्य व्यवस्थापन आणि लसीकरण केले जाते. गटातील प्रत्येक महिलेने कोंबडी व्यवस्थापन आणि लसीकरणाचे प्रशिक्षण घेतले आहे. 
  • योग्य गुणवत्तेचे खाद्य कोंबड्यांना दिले जाते. पहिल्या दिवसापासून ते विक्रीपर्यंत ५० कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक महिलेला मजुरी धरून पंधरा हजार रुपये खर्च येतो.
  • कुक्कुटपालनातून स्वयंरोजगार   वळके-कुणबीवाडीतील बहुतांश कुटूंबांची भातशेती आहे. पुरुष मंडळी कामधंदा करून पैसे मिळवतात. त्याचबरोबरीने आता गेल्या अडीच वर्षांत महिलांनी गट स्थापनकरून कुक्कुटपालनातून आर्थिक स्वयंपूर्णता मिळविली आहे. दर महिन्याला खर्च वजा जाता प्रत्येक महिलेस किमान १५ ते २० हजार रुपये मिळतात. वर्षभरात कोंबड्यांच्या किमान पाच ते सहा बॅचेस होतात. गटातील एका महिला तर याच व्यवसायावर कुटूंब चालवते. येत्या काळात हा गट अंडी उबवणी यंत्र आणि खाद्य निर्मिती यंत्र खरेदी करणार आहे. यासाठी कोंबडी विक्रीतून रक्कम जमा करण्यात येत आहे. महिला गटाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी भेट देऊन कुक्कुटपालनाची सविस्तर माहिती घेतली आहे. ‘हिरकणी महाराष्ट्राची’ या स्पर्धेत मानाई गटाचा रत्नागिरी तालुक्यात आठवा क्रमांक आला आहे. याचबरोबरीने गटातील सदस्यांनी ‘सरस’ प्रदर्शनात नाचणी लाडू, चटणी, राजगिरा लाडू यासारख्या पदार्थांची विक्रीदेखील केली आहे. 

    थेट ग्राहकांना विक्री  कोंबडी विक्रीसाठी गटाने मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती असलेल्या पाली बाजारपेठेची निवड केली. दर बुधवारी पाली गावातील आठवडा बाजारात कोंबड्याची चांगली विक्री होते. उरलेल्या कोंबड्यांची विक्री गावामध्येच होते. वळके गावातील कुणबी वाडी, मराठ वाडी आणि आजूबाजूच्या परिसरात कोंबड्यांना चांगली मागणी आहे. दोन महिन्यांच्या कोंबडीला २५० ते ३०० रुपये तर, तीन महिन्यांच्या कोंबड्याला ४५० ते ५०० रुपये दर मिळतो. गावठी कोंबडीच्या अंड्याला बाजारात चांगली मागणी आहे. एक अंडे सरासरी १० रुपयांनी विकले जाते. मानाई गटातील महिलांनी अंड्यांसाठी गावठी कोंबड्या पाळल्या आहेत. प्रत्येक महिला दर महिन्याला २५ अंडी बाजारपेठेत विकते.

    नाचणी लागवडीचा प्रयोग गटातील महिलांनी यंदा प्रयोग म्हणून सेंद्रिय खतांचा वापर करून एक एकरावर नाचणी लागवड केली आहे. ही जमीन गावातील शेतकऱ्याकडून भाडेतत्त्वावर घेतली आहे. गांडूळखताबरोबर कोंबडी खताचा वापर महिलांनी केला आहे. संपुर्ण पीक व्यवस्थापन गटातर्फे करण्यात येत आहे. नाचणीची विक्री करून मिळणारे उत्पन्न गटामध्ये जमा करण्यात येणार आहे.

      - पूजा भुवड, ९४२११४३०१८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com