देशी कोंबडी, अंडी विक्रीतून मिळवले आर्थिक स्थैर्य

कोंबड्यांना खाद्य देताना सौ. विजयश्री शिंदे.
कोंबड्यांना खाद्य देताना सौ. विजयश्री शिंदे.

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील तडवळे (यावली) येथील सौ. विजयश्री तुकाराम शिंदे यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून देशी कोंबडीपालन आणि शेळीपालन सुरू केले आहे. सध्या त्यांच्याकडे २५० कोंबड्या आहेत. पूरक व्यवसायच्या बरोबरीने महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या विविध उपक्रम राबवितात.

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात असणाऱ्या तडवळे (यावली) गावामध्ये सौ. विजयश्री शिंदे यांची पावणेदोन एकर शेती आहे. त्यांच्या शेती परिसरात भोगावती नदी आहे, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळामुळे ती कोरडीच आहे. त्यांच्याकडे पाण्याचा कायमस्वरुपी खात्रीचा स्त्रोत नाही. पडणारा पाऊस आणि नदीच्या पाण्यावरच त्यांची शेती होते. सोयाबीन, मका पिकांची त्या लागवड करतात. त्यांचे पती तुकाराम शिंदे हे शेती पाहतात. विजयश्रीताईंचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. जेमतेम शेतीमुळे कुटुंबाला काहीतरी आर्थिक हातभार लावावा, असे त्यांना वाटत होते. उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेल्या बचत गटात त्या पूर्वीपासून कार्यरत होत्या. त्यामुळे लघुउद्योगाचा विचार पहिल्यापासूनच त्यांच्या डोक्यात येत होता. त्यातूनच वर्षभरापूर्वी त्यांना देशी कुक्कुटपालन व्यवसाय सुचला आणि आज तो चांगलाच नावारुपालाही आला आहे. या सगळ्या कामात त्यांना त्यांचे सासू, सासरे, पती सर्वजण मदत करतात. उमेद अभियनासाठी गावातील सूर्योदय ग्रामसंघात त्या कृषिसखी म्हणून जबाबदारी सांभाळतात. या सगळ्या कामात त्यांना उमेदचे क्लस्टर कॅार्डिनेटर उमेश जाधव, तालुका व्यवस्थापक सौ. कविता चव्हाण, सौ. उर्मिला गराडे आणि सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ज्ञ सौ. अनिता सराटे-शेळके, सौ. वैशाली आवारे यांचे मार्गदर्शन मिळते.  पन्नास कोंबड्यांपासून सुरवात   कुक्कुटपालन व्यवसाय ठरल्यावर विजयश्री शिंदे यांनी माहिती घेण्यासाठी काही कुक्कुटपालन केंद्रांना भेटी दिल्या. तज्ज्ञांशी चर्चा केली. शेतातील वस्ती आणि कुक्कुटपालनाचे मार्केटिंग या सगळ्याचा विचार करून विजयश्री यांनी केवळ देशी कोंबड्या पाळायचे ठरवले. सुरवातीला ५० देशी कोंबड्या त्यांनी खरेदी केल्या. पहिल्या दोन महिन्यांतच त्यांना अंडी विक्रीतून चांगले पैसे मिळू लागले. त्यांचा उत्साह वाढला. गतवर्षी उमेद अभियानाकडूनच त्यांना उपयोगिता निधीतून दहा हजारांचे कर्ज मिळाले. त्यातून पुढे त्यांनी २५० कोंबड्या खरेदी केल्या. सध्या त्यांच्याकडे ११० कोंबड्या आणि ५० कोंबडे आहेत. बाजारपेठेतील मागणीचा विचार करून त्यांनी नव्याने १०० गिरिराज, वनराज जातीच्या पिल्लांची खरेदी केली आहे.  मुक्तसंचार पद्धतीने कुक्कुटपालन  विजयश्री शिंदे यांनी कुक्कुटपालनासाठी अर्धा एकर क्षेत्रावर दोन शेड उभारल्या आहेत. यामध्ये किमान एक हजार कोंबड्यांचे संगोपन शक्य आहे. सध्या त्यांच्याकडे २५० कोंबड्या आहेत. परंतु कोंबड्या शेडमध्ये जास्त वेळ न ठेवता मुक्त संचार पद्धतीने सोडल्या जातात. कोंबड्यांच्या संरक्षणासाठी संपूर्ण क्षेत्राला जाळी लावलेली आहे. त्यामुळे कोणतीही कोंबडी कुंपणाच्याबाहेर जाऊ शकत नाही. दिवसभर या कोंबड्या मुक्तपणे खाद्य खाणे, पाणी पिणे यासाठी संरक्षित क्षेत्रात फिरत असतात. रात्री कोंबड्यांना शेडमध्ये ठेवले जाते. दिवसभरातून दोन-तीन वेळा कोंबड्यांच्या खाद्य वेळा ठरलेल्या आहेत. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये गहू, मका, तांदूळ यांचा वापर केला जातो.

अॅझोल्याचा वापर कोंबड्याच्या खाद्यासाठी गहू, तांदूळ, मका या पारंपरिक खाद्याचा वापर केला जातो. याचबरोबरीने शिंदे यांनी कोंबडी खाद्यासाठी ॲझोला उत्पादन सुरू केले आहे. त्यासाठी वाफा तयार केला आहे. ॲझोल्याचा वापर कोंबडी खाद्यामध्ये केला जातो. कोंबड्या अॅझोला आवडीने खातात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. अॅझोलामुळे कोंबड्यांचे वजन वाढते, शिवाय आकारही मोठा होतो. साहजिकच अंडी उत्पादन आणि कोंबड्यांचे वजनही चांगले वाढते. त्याचा आर्थिक उत्पन्न वाढीसाठी चांगला फायदा होतो.

गावामध्येच अंडी, कोंबड्यांना वाढती मागणी    ग्रामीण तसेच शहरी भागात देशी कोंबड्या आणि अंड्यांना चांगली मागणी आहे. शिंदे कोंबड्या आणि अंड्यांची विक्री गावामध्ये तसेच परिसरातल्या गावामध्ये करतात. आता तर त्यांना कोंबडी किंवा अंडी विक्रीसाठी कुठेही जायची गरज भासत नाही, ग्राहकच थेट त्यांच्या घरापर्यंत येतो. बाजारपेठेत प्रति अंड्याला सात रुपये, प्रति कोंबडीला २५० रुपये आणि कोंबड्याला ३०० रुपये दर जागेवरच मिळतो. बाजारपेठेनुसार दर बदलतात. दर आठवड्याला कोंबड्यांपासून ३०० अंडी मिळतात. मागणीनुसार दरमहा पाच कोंबड्यांची विक्री होते. कोंबडी खाद्य, देखभाल खर्च वजा जाता कोंबडी आणि अंडी विक्रीतून दर महा सरासरी पाच हजारांचा निव्वळ नफा त्यांना मिळतो. 

परसबागेचा प्रयोग, गांडूळखताचे उत्पादन शिंदे या उमेद अभियानाशी जोडलेल्या आहेत. कृषिसखी म्हणूनही त्या अन्य महिलांना मार्गदर्शन करतात, त्यातून बचत गटासाठी परसबाग संकल्पना राबवली जात आहे. शिंदे यांनी स्वतःच्या शेतामध्ये १५ बाय १५ फूट जागेत परसबाग केली आहे. त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, दोडका, गवार, भेंडी, घेवडा, चवळी या पिकांची लागवड केली जाते. परसबागेत लागवडीसाठी त्या देशी जातींचा वापर करतात.  परसबागेतील सर्व पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली आहेत. परसबागेतील पिकांसाठी त्यांनी गांडूळ खत निर्मिती सुरू केली. याचबरोबरीने शिंदे जीवामृत, दशपर्णी अर्काचा वापर करतात. यंदाच्यावर्षी सोयाबीन पिकासाठी गांडूळखत आणि जीवामृताचा वापर केला. त्याचा चांगला फायदा दिसून आला आहे. 

शेळीपालनाची दिली जोड  शिंदे यांनी देशी कोंबड्यांच्या बरोबरीने चार गावरान जातीच्या शेळ्याही सांभाळल्या आहेत. शेळ्यांना दिवसभर शेतातच चरायला सोडले जाते. शेळ्यांसाठी फारसे व्यवस्थापन करावे लागत नाही. गेल्या वर्षी शिंदे यांनी तीन करडे विकली, त्यातून २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदाही त्यांना जवळपास ३० ते ४० हजारांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

- सौ. विजयश्री शिंदे, ९६८९६२४६०५  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com