गोधडीला मिळाली परदेशातही ओळख

गोधडी शिवताना अर्चना जगताप आणि गटातील सदस्या
गोधडी शिवताना अर्चना जगताप आणि गटातील सदस्या

पुणे शहराच्या कोंढवा बुद्रुक परिसरातील अर्चना अमित जगताप यांनी पारंपरिक गोधडी शिवणाऱ्या महिलांना एकत्र करून गट तयार केला. हाताने शिवलेल्या गोधडीची देश- विदेशात स्वतंत्र ओळख होण्यासाठी ‘क्विल्ट कल्चर' हा ब्रॅंड पुढे आणला. गेल्या तीन वर्षांत गोधडीच्या बरोबरीने पर्स, लॅपटॉप बॅग, सोफा कुशन, पडदे आणि लहान मुलांचे जाकीट असे गोधडीच्या रंगसंगतीतील प्रकार बाजारपेठेत आणले आहेत.

ग्रामीण भागात आजही हात शिलाई केलेली गोधडी लोकप्रिय आहे. याचबरोबरीने शहरी भागातही विविध रंगसंगती असलेल्या गोधडीस चांगली मागणी आहे. गोधडी शिवण्याची पारंपरिक कला टिकावी तसेच महिलांना रोजगाराचे साधन तयार होण्यासाठी पुणे शहरातील कोंढवा बुद्रुक येथील अर्चना अमित जगताप यांनी पाच वर्षांपूर्वी महिलांचा गट तयार केला. अर्चनाताई पुण्यातील आलोचना सामाजिक संस्थेच्या संवादिनी मंच उपक्रमात कार्यरत आहेत. महिलांना येणाऱ्या अडचणी सोडवणे, रोजगारनिर्मितीसाठी मदत, बचत गट उभारणीचे काम संवादिनी मंचातर्फे केले जाते. यातून महिलांचे गट तयार झाले. याबाबत अर्चनाताई म्हणाल्या, की कोंढवा परिसरात राज्य तसेच परराज्यातील ग्रामीण भागातून रोजगारासाठी आलेल्या कुटुंबांची मोठी संख्या आहे. या महिलांशी संवाद साधताना असे लक्षात आले, की त्यांना घर बसल्या रोजगार हवा आहे. चर्चेतूनच गोधडी (क्विल्ट) निर्मितीचा विषय पुढे आला. या संकल्पनेला पुण्यातील फाइन आर्टिस्ट रूचा कुलकर्णी यांची साथ मिळाली. आम्ही पहिल्यांदा बाजारपेठेचा अभ्यास केला. पुणे, मुंबई तसेच ग्रामीण भागातील लोकांशी चर्चा केली. फॅशन डिझाइन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. यातून असे लक्षात आले, की गोधडी निर्मितीसाठी अत्याधुनिक शिवण यंत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे डिझाइन असलेल्या गोधडीची निर्मिती होते. परंतु, अजूनही बाजारपेठेत हाताने टाके शिवलेल्या गोधडीला चांगली मागणी आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार कापड, रंगसंगतीची गोधडी कशी शिवायची याचे प्रशिक्षण महिलांना देणे गरजेचे आहे.  बाजारपेठेचा अभ्यास करून प्रायोगिक तत्त्वावर आम्ही २०१४ मध्ये गोधडी शिवणकामाची आवड असणाऱ्या तीस महिलांना एकत्र केले. चांगल्या दर्जाचे सुती कापड, एकसारखे टाके तसेच आकर्षक रंगसंगतीचे डिझाइन पारंपरिक टाके पद्धतीने कसे शिवायचे याचे प्रशिक्षण दिले. पहिल्यांदा नऊवारी साड्यांचे डिझाइन असलेल्या पंधरा गोधड्यांची निर्मिती केली. पुणे शहरातील कोरेगाव पार्क तसेच मुंबईमधील काही प्रसिद्ध दुकानांमध्ये गोधडी विक्रीस सुरवात केली. काही दिवसांतच दुकानदारांनी ग्राहकांचा कल सांगितला. त्यानुसार पुढील टप्प्यात गोधडीमध्ये कापडाची रंगसंगती आणि हात शिलाईकामामध्ये बदल केले. यासाठी शिवण काम तसेच फॅशन डिझायनिंग विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. गोधडी शिवण्याची चांगली कला असणाऱ्या वीस महिलांना रूचा कुलकर्णी यांनी नव्याने प्रशिक्षण दिले. पुन्हा एकदा नवीन रंगसंगतीच्या डिझाइनमध्ये नऊवारी साडीपासून गोधडीनिर्मितीस सुरवात झाली. या गोधडीस पुणे, मुंबई शहरातील ग्राहकांची चांगली पसंती मिळाली आणि ‘क्विल्ट कल्चर' ब्रॅन्ड ची ओळख तयार झाली.

परदेशात पोचली गोधडी  स्पेनमधील एका विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींना हाताने बनविलेल्या कापडी कलाकुसरीबद्दल विशेष अभ्यास करायचा होता. या विद्यार्थिनींना अर्चना जगताप यांच्या ‘क्विल्ट कल्चर'ची माहिती मिळाली. या नव्या व्यावसायिक संधीबाबत अर्चनाताई म्हणाल्या, की आम्ही मुलींना पारंपरिक पद्धतीने गोधडी कशी शिवली जाते, त्याची रंगसंगती आणि शिवणकामाबाबत माहिती दिली. या मुलींनी देखील आम्हाला युरोपीय बाजारपेठेत कोणत्या गोधडीला (क्विल्ट) मागणी आहे, कापड कसे लागते, नवीन रंगसंगती आणि शिवणाचे टाके कसे असावेत याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार आम्ही दर्जेदार सुती कापड निवडून युरोपीय ग्राहकांना पसंत पडेल, अशी रंगसंगती असेलल्या गोधडीचे प्रकार शिवले. याचबरोबरीने पर्स, पाऊच, लॅपटॉप कव्हर, सोफा कुशन, पडदे शिवून या मुलींकडे पाठविले. आम्हाला पहिली मागणी दीड लाखांची मिळाली. गेल्या तीन वर्षांत युरोपातील ग्राहकांच्याकडून गोधडीची मागणी वाढत आहे. या मुलींच्या माध्यमातून आम्ही युरोपातील झोको ब्रॅंन्डशी जोडले गेलो. त्यामुळे युरोपातील ग्राहकांचा कल लक्षात घेऊन आम्ही क्विल्ट तयार करतो. गेल्या तीन वर्षांत ‘क्विल्ट कल्चर'कडे भारतातील बाजारपेठेच्या बरोबरीने युरोप, अमेरिका आणि न्यूझीलंडमधील भारतीय तसेच परदेशी ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. गोधड्यांमध्येही विविध प्रकार गोधडी शिवण कलेबाबत अर्चनाताई म्हणाल्या, की मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तर भारतात विविध रंग संगतीची गोधडी शिवण्याची कला टिकून आहे. याचाही अभ्यास करतोय. पश्चिम बंगालमध्ये गोधडीचे ‘कांथा वर्क' डिझाइन आहे. या गोधडीवर डिझाइनच्या माध्यमातून एक कथा सांगितली जाते. अशा प्रकारची गोधडी आम्ही शिकत आहोत. येत्या काळात विविध भागांतील गोधडी शिवणाऱ्या महिला गटांचे एकत्रिकरण करून हा व्यवसाय कसा वाढेल, देश, विदेशात ही कला कशी पोचविता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहे.

थेट ग्राहकांना विक्री

विक्रीबाबत अर्चनाताई म्हणाल्या, की अद्ययावत शिवण यंत्रांची उपलब्धता झाल्याने गोधडीमध्ये कलाकुसर आणि रंगसंगतीचे बरेच प्रकार आले असले तरी आम्ही हाताने शिवणकाम होणाऱ्या गोधडीनिर्मितीवर भर दिला. यातून गोधडी शिवणाऱ्या ग्रामीण महिलांना रोजगार मिळेल आणि दुसऱ्या बाजूला ही कला टिकून राहील,त्याचे संवर्धन होईल हा उद्देश आहे. काही महिला भारी किंमतीच्या साड्या देऊन आमच्याकडून खास गोधडी शिवून घेतात. देश-विदेशातील फॅशन डिझायनर, इंटेरिअर डिझायनर, आर्किटेक्ट तसेच मुंबई, पुण्यातील दुकानदारांना मागणीनुसार विविध रंगसंगतीची गोधडी आम्ही तयार करून देतो. आमच्या क्विल्ट कल्चरचे फेसबुक पेज आहे, त्यावर सातत्याने नवीन उत्पादनांची माहिती दिली जाते. त्यानुसार देश, विदेशातील ग्राहक त्यांना आवडणारी रंगसंगती आणि आकारानुसार गोधडी, पर्स, पडदे, सोफा सेट कुशन, जाकीट शिवून घेतात. त्यामुळे विक्रीसाठी आम्हाला कोठे जावे लागत नाही. दर महिन्याला गटाची सरासरी पन्नास हजारांची उलाढाल होते. सध्या माझ्या बरोबरीने दहा महिला कार्यरत आहेत. या महिला घरची कामे सांभाळून गोधडी, पर्स, बॅगनिर्मिती करतात. प्रकार, हात शिलाई, आकार आणि रंगसंगतीनुसार गोधडीची किंमत १,००० ते ५,००० रुपये, लॅपटॉप बॅग ५०० ते १,५००, पर्स ३०० ते ६०० रुपये, पाऊच ५० ते २५० रुपये, लहान मुलांचे जाकीट ९०० ते १२०० रुपये अशा किंमती आहेत. रंगसंगतीची एक गोधडी शिवण्यासाठी दहा दिवस लागतात. एका महिलेस कामानुसार दर महिना २,५०० ते ३,००० रूपये मिळतात.

- अर्चना जगताप ः ८८८८९२६८०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com