agriculture news in Marathi, success story of Ramesh Borkar,Nandhana,Dist.Washim | Agrowon

पीक बदलातून दिली नवी दिशा
गोपाल हागे
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

शिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश किसन बोरकर यांनी नंधाना (ता. रिसोड) येथील वडिलोपार्जित शेतीला नवी दिशा देण्याचे काम सुरू केले आहे. सोयाबीन, तूर पिकांच्या बरोबरीने त्यांनी संत्रा फळबाग आणि शतावरी लागवड केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पीक बदल आणि उत्पादन वाढीला चालना दिली आहे.

शिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश किसन बोरकर यांनी नंधाना (ता. रिसोड) येथील वडिलोपार्जित शेतीला नवी दिशा देण्याचे काम सुरू केले आहे. सोयाबीन, तूर पिकांच्या बरोबरीने त्यांनी संत्रा फळबाग आणि शतावरी लागवड केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पीक बदल आणि उत्पादन वाढीला चालना दिली आहे.

नंधाना (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील सज्जन आणि रमेश बोरकर बंधूंची वडिलोपार्जित शेती आहे. रमेश हे शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथे कला व विज्ञान महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून नोकरी करतात. ते कुटुंबासह शिरपूर जैन येथे राहतात. दर रविवारी सुटीच्या दिवशी गावी येऊन वडिलोपार्जित शेतीच्या नियोजनात सहभागी होतात. रमेश यांचे मोठे बंधू सज्जन यांच्या मदतीने पारंपरिक शेतीकडून फळबाग आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीकडे त्यांचा प्रवास सुरू झाला.

 शेती बदलाला सुरवात  
बोरकर कुटंबाची शेती तीन ठिकाणी आहे. नंधाना शिवारात २४ एकर आणि साक्रापूर गावाजवळ ११ एकर  शेती आहे. हा भाग अतिशय दुर्गम व दुर्लक्षित असल्याने तेथे रस्ता व विजेची समस्या होती. साक्रापूर शिवारात त्यांनी २००९ मध्ये विहीर खोदली. सिंचनाची सोय झाल्याने खरीप, रब्बी हंगामातील पीक उत्पादन वाढले. बोरकर यांनी नाल्यांचे खोलीकरण करून त्यातून निघालेला गाळ शेतात पसरून सपाटीकरण केले. २०१० मध्ये बोरकर यांचा कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन योजनांची माहिती घेतली. कृषी सहायक डी. के. रणवीर यांनी त्यांना गांडूळ खतनिर्मिती आणि शेड उभारणीबाबत माहिती दिली. सध्या बोरकर २० एकरांत सोयाबीन लागवड करतात. त्यांना एकरी ८ ते १० क्विंटलचे उत्पादन मिळते. तसेच १० एकर कोरडवाहू क्षेत्रावर तुरीची लागवड असते. यातून एकरी सरासरी ५ क्विंटल उत्पादन मिळते. रोजगार हमी योजनेअंतर्गत बोरकर यांनी २००९ साली अडीच एकरात १८ फूट बाय २० फूट अंतरावर संत्रा लागवड केली. यासाठी शासनाकडून ४५ हजार रुपये अनुदान मिळाले. त्यानंतर २०११ मध्ये पुन्हा अडीच एकरावर संत्रा लागवड केली. पहिले पाच वर्ष या बागेत सोयाबीनचे आंतर पीक घेतले. त्यानंतर आता हिरवळीच्या खतासाठी धैंचा लागवड केली जाते. संत्राबागेला दरवर्षी शेणखत, गांडूळ खत दिले जाते. माती परीक्षण अहवालानुसार ठिबक सिंचनातून वाढीच्या टप्प्यानुसार विद्राव्य खतांचा वापर केला जातो.
      संत्राबागेत प्रत्येक झाडाशेजारी झेंडू रोपांची लागवड केली आहे. एकात्मिक पद्धतीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीड, रोगाचे नियंत्रण केले जाते.पहिल्या टप्प्यातील बागेतून गेल्या तीन वर्षांपासून मृग बहराचे उत्पादन सुरू झाले आहे. मजूर समस्या आणि बाजारपेठेतील विक्रीतील अडचण लक्षात घेऊन बोरकर व्यापाऱ्याला बाग देतात. या बागेतून गेल्यावर्षी त्यांना खर्च वजा जाता एक लाखाचा नफा मिळाला. पुढील वर्षात बोरकर यांनी एक एकर क्षेत्रात पेरू लागवडीचे नियोजन केले आहे.

 शतावरीची करार शेती 
 संत्रा बागेसोबत बोरकर यांनी गेल्यावर्षी एक एकरात शतावरीची केली आहे. लागवडीचे अंतर सहा फूट बाय अडीच फूट ठेवले आहे. पुण्यातील एका कंपनीसोबत लागवड ते काढणी अशा प्रकारचा करार करण्यात आला. कंपनीने रोपे पुरविली आहेत. मुळ्यांची खरेदी कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. तयार होणारा माल खरेदीचा करार केला आहे. शतावरीमध्ये आंतरपीक म्हणून खरिपात सोयाबीन आणि रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड केली जाते. त्यातूनही अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा बोरकर यांचा प्रयत्न असतो.  

बांधावर विविध फळझाडे 
संत्राबागेच्या बांधावर बोरकर यांनी चिकू, सीताफळ, आंबा, जांभूळ, ॲपलबोर अशा विविध फळझाडांची लागवड केली आहे. यामुळे मोकळे बांध लागवडीखाली आले, वर्षभर कोणत्या तरी फळांची उपलब्धता होते. तसेच, बांधही सुरक्षित राहिले आहेत.

जमीन सुपीकतेवर भर 
 बोरकर यांनी जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापराला प्राधान्य दिले आहे. संत्रा बागेत रासायनिक खतांचा वापर कमीत कमी केला जातो. चांगल्या गुणवत्तेच्या शेणखताचा ते वापर करतात. बोरकर यांच्याकडे सहा जनावरे आहेत. त्यामुळे वर्षभरात संत्रा बागेला पुरेसे शेणखत उपलब्ध होते. या शिवाय शेतातील काडीकचरा, गवतापासूनही कंपोस्ट खत तयार केले जाते. 

ॲग्रोवनमधून मिळाले बळ 
बोरकर कुटुंबाकडे ३५ एकर शेती आहे. रमेश यांचे मोठे भाऊ सज्जन हे पारंपारिक पद्धतीनेच शेती करीत होते. नवनवीन बियाणे वापरून ते चांगले उत्पादन मिळवायचे. रमेश यांनी नोकरीला लागल्यानंतर काही वर्षांनी शेतीमध्ये पीक बदल आणि सुधारित तंत्रज्ञानाच्या अवलंबास सुरवात केली. त्यांना दैनिक ‘ॲग्रोवन’ वाचण्याची आवड सुरवातीपासूनच त्यांना होती. ॲग्रोवनमधील तांत्रिक लेख तसेच शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून आपणही  शेती पद्धतीमध्ये बदल करावा अशी जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण झाली. या प्रेरणेतून त्यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच राज्याच्या विविध भागांत भरणाऱ्या कृषी प्रदर्शनांना भेटी देऊन नवीन तंत्रज्ञान, पिकाच्या नवीन जाती, खते तसेच ठिबक सिंचन प्रणालीची माहिती घेतली. गरजेनुसार टप्याटप्याने स्वतःच्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला. येत्या काळात बोरकर यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या सहभागातून शेतकरी गट सुरू करण्याचे ठरविले आहे. 

शेततळ्याचा आधार 
संत्रा बागेला उन्हाळ्यात विहिरीचे पाणी कमी पडू लागले होते. या दरम्यान बोरकर यांना सन २०१५ मध्ये फळबागेसाठी सामूहिक शेततळे योजनेची माहिती मिळाली. या योजनेतून त्यांनी २४ बाय २४ बाय २ मीटर आकाराचे शेततळे घेतले. यामुळे पाण्याचा शाश्वत स्रोत तयार झाला. आता शेततळ्यातील पाणी तसेच विहीर अशा स्रोतांमधून फळबागेला तसेच शेतीला वर्षभर पाण्याची सोय झाली आहे. पावसाळ्यात विहिरीच्या पाण्याने शेततळे भरून घेतल्यानंतर त्याचा पिकाच्या गरजेच्यावेळी वापर केला जातो. 

सौरऊर्जेची साथ 
साक्रापूर हे दुर्गम भागातील गाव आहे. येथे पायाभूत सुविधांची कमतरता आहे. शेतीसाठी विजेच्या उपलब्धतेच्या अडचणी आहेत. यामुळे शेतीत सिंचनाचा मोठा प्रश्न तयार झाला. बोरकर यांनी यावर मात करण्यासाठी डिझेलवर चालणारे यंत्र खरेदी करून शेततळ्यावर बसविले. परंतु, हा खर्च अधिक होता. या दरम्यान त्यांना शासनाच्या सौरऊर्जा पंप योजनेची माहिती मिळाली. संबंधित विभागाशी संपर्क साधून बोरकर यांनी पाच अश्वशक्तीचा सौरपंप शेतातील विहिरीवर बसविला. ही सुविधा झाल्यापासून आता विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला तसेच पिकाला योग्य वेळी पुरेसे पाणी देणे शक्य होऊ लागले.  

एकत्रित कुटुंबाचा आधार 
बोरकर कुटुंबाच्या शेतीची सर्व कामे आता रमेश यांचा पुतण्या नितीन सांभाळतो. दुसरा पुतण्या आकाश हा कृषी डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. तो रविवारी काका रमेश यांच्यासह शेतीत राबतो. रविवारी रमेश यांच्या पत्नी सुषमा, वहिनी कलावती व संपूर्ण कुटुंब शेतीच्या नियोजनात मग्न असते. गरजेनुसार शेतमजूर कामासाठी सांगितले जातात. रमेश यांचा मोठा भाऊ सज्जन यांचे मार्गदर्शन कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे.

- रमेश बोरकर, ९९७५२५४५२४

 

 

 

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...