आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी या गावातील शेतकरी जी.
यशोगाथा
दर्जेदार दोडका उत्पादन हेच पवार बंधूंचे ध्येय
येळवी (ता. जत ,जि. सांगली) येथील पवार बंधूंनी गेली नऊ वर्षे बाजारपेठेनुसार दोडका पिकाचे योग्य गुणवत्तेचे उत्पादन घेत वेगळी ओळख तयार केली आहे. याचबरोबरीने बाजारपेठेचा अंदाज घेत मिरची, मोगरा, शेवगा पिकांतून आर्थिक बाजू सक्षम केली आहे.
येळवी (ता. जत ,जि. सांगली) येथील पवार बंधूंनी गेली नऊ वर्षे बाजारपेठेनुसार दोडका पिकाचे योग्य गुणवत्तेचे उत्पादन घेत वेगळी ओळख तयार केली आहे. याचबरोबरीने बाजारपेठेचा अंदाज घेत मिरची, मोगरा, शेवगा पिकांतून आर्थिक बाजू सक्षम केली आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुका म्हटलं, की डोळ्यांसमोर पाणीटंचाईचे चित्र उभे राहते. परंतु या भागातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी कष्ट आणि सुधारित तंत्राचा वापर करत द्राक्ष, डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या. या भागात आजही पाण्याची कमतरता असल्यामुळे शेतकरी भाजीपाला पिकांची फारशी लागवड करत नाहीत. परंतु गेल्या दोन वर्षांत उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचल्याने भाजीपाला लागवडीकडे शेतकरी वळू लागले आहेत.
जत शहरापासून पंधरा किलोमीटरवर वसलेलं येळवी गाव. या गावात पूर्वीपासून शेती आणि पिण्याच्या पाण्याची सुरू असलेली भटकंती आज कुठंतरी थांबली आहे. त्याचं कारण म्हणजे २०१८ मध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी येळवी गावात आले. काही प्रमाणात शिवार हिरवेगार दिसू लागले. याच गावातील सूरज पवार हे युवा प्रयोगशील शेतकरी. त्यांच्या कुटुंबाची येळवी गावशिवारात सत्तेचाळीस एकर शेती आहे. ही शेती म्हणजे संपूर्ण माळरान. पवार कुटुंबीय पूर्वी पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करायचे. सूरज पवार यांचे वडील वसंत हे सैन्यदलामध्ये नोकरीला होते. निवृत्तीनंतर त्यांनी शेती विकासाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. त्यांचे बंधू रामचंद्र पवार हे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक. ते सांगोला (जि. सोलापूर) येथे कार्यरत आहेत. रामचंद्र पवार यांनी सगळ्यांना एकत्र कुटुंबाचे महत्त्व पटवून दिले. त्याच बरोबर घरातील युवा पिढी शिक्षित झाली पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता. त्यामुळे कुटुंबातील नवीन पिढी शिक्षित झाली आहे. रविकिरण हे बी.एस्सी (उद्यानविद्या), विक्रांत हे एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री, सूरज पवार हे बीए आणि ओंकार पवार हे इंजिनिअर आहेत.
शेती झाली बागायती
शेतीमध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पवार बंधूंनी शेतीमध्ये पीक बदलास सुरुवात केली. शाश्वत सिंचनासाठी दोन विहिरी घेतल्या.यातून पुरेशा पाण्याची उपलब्धता झाली. त्यामुळे भाजीपाला पिकांच्या लागवडीला पवार बंधूंनी सुरुवात केली.
पीक लागवडीबाबत सूरज पवार म्हणाले, की पाणीटंचाई असल्याने आम्ही खरिपामध्ये पावसाच्या पाण्यावर पिकांची लागवड करत होते. थोडी पाण्याची उपलब्धता झाल्यावर द्राक्ष शेतीला सुरुवात केली. योग्य व्यवस्थापनामुळे द्राक्षाचे चांगले उत्पादन मिळायचे. परंतु पाण्याची टंचाई आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता यामुळे द्राक्ष शेतीला मर्यादा होत्या. २०१२-१३ मध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये द्राक्ष बाग काढावी लागली. त्यामुळे पर्यायी पीक लागवडीचा आम्ही विचार केला. या पिकांची निवड करत असताना कमी कालावधी, मर्यादित खर्च आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांचा आम्ही विचार केला. शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी आमच्याकडे पावणेदोन कोटी लिटर क्षमतेचे एक शेततळे आणि दोन विहिरी आहेत. सध्या आमच्याकडे पाच एकर दोडका, एक एकर मिरची, पाच एकर मोगरा, पाच एकर शेवगा, दहा एकर ऊस आणि बाकीच्या क्षेत्रावर मका, ज्वारी, बाजरी ही हंगामी पिके असतात.
दोडका लागवडीस सुरवात
- जत तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. हे लक्षात घेऊन पवार बंधूंनी भाजीपाला लागवड करताना पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, सांगली आणि कोल्हापुरातील बाजारपेठेतील भाजीपाला आवक आणि दर यांचा अभ्यास केला. त्या अभ्यासानुसार त्यांनी दोडका लागवडीचा निर्णय घेतला.
- लागवडीबाबत सूरज पवार म्हणाले की, आम्ही पहिल्यांदा दोडक्याच्या बाजारपेठेचा अभ्यास केला होता. त्यातून काही चांगल्या व्यापाऱ्यांशी संपर्क झाला. या पिकाची लागवड, हंगाम, जाती आणि व्यवस्थापनाबाबत माहिती घेऊन आम्ही २०११ मध्ये दोन एकरापासून लागवड सुरू केली केली. या पिकाला जरी पाणी कमी लागत असले तरी, वाढीच्या टप्यात गरजेनुसार पाणी देणे महत्त्वाचे असते. पाणी बचतीसाठी आम्ही आच्छादनावर लागवड करतो. पिकाला ठिबक सिंचन केलेले आहे. पीक व्यवस्थापन आणि विक्री नियोजनामध्ये माझे बंधू रविकिरण यांचे मार्गदर्शन मिळते.
दरवळला मोगऱ्याचा सुगंध
सूरज पवार यांचे बंधू रविकिरण हे कृषी विभागात कार्यरत असल्याने त्यांचा विविध पिकांचा अभ्यास आहे. परंतु आर्थिक प्रगतीसाठी नावीन्यपूर्ण पिकाची गरज लक्षात घेऊन पवार बंधूंनी २००११ मध्ये मोगरा लागवडीस सुरवात केली. सध्या पाच एकरांवर मोगरा लागवड आहे. फेब्रुवारी ते ऑक्टोबरपर्यंत मोगरा उत्पादन मिळते. बाजारपेठेत सरासरी ३०० ते ३५० रुपये किलो दर मिळतो. मुंबई, मिरज यांसह विविध बाजारपेठेत मोगरा फुलांची विक्री होते. अलीकडे या पट्ट्यात मोगरा लागवड वाढत आहे.
शेतकरी गटाची मिळाली साथ
गटशेतीबाबत सूरज पवार म्हणाले, की कृषी विभागातर्फे गट शेती प्रकल्पांतर्गत श्रीराज भाजीपाला आणि मोगरा उत्पादक गटाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून आम्ही २२ शेतकरी एकत्र आलो. गटशेतीमुळे आमचा भाजीपाला लागवड आणि विक्रीचा आत्मविश्वास वाढला. गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पॅक हाउस, सोलर पंप, विहीर, तसेच अवजारे बँक अशा योजनांचा लाभ मिळाला आहे. दोडका पॅकिंगसाठी पॅक हाउसचा चांगला उपयोग होते. कोरोना लॉकडाउनच्या काळात कृषी आणि आत्मा विभागाने शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार केली. त्यामुळे गटामार्फत भाजीपाला विक्री करणे शक्य झाले. उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी गटाला ‘विकेल ते पिकवा‘ या मोहिमेअंतर्गत शेतकरी ते ग्राहक मूल्यसाखळीतील स्मार्ट प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले आहे.त्याचाही गटाला येत्या काळात फायदा होणार आहे.
दोडका लागवडीचे नियोजन
- पहिला हंगाम : मे लागवड : दोन एकर
- दुसरा हंगाम : नोव्हेंबर लागवड : दोन एकर
लागवडीची पद्धत
- मांडव पद्धतीचा वापर केल्याने दर्जेदार उत्पादन.
- गादी वाफ्यावर लागवड. दोन ओळींतील अंतर सहा फूट. दोन ते अडीच फुटांवर बियाणे टोकण. त्यामुळे आंतरमशागत सोपी जाते. आच्छादनाचा वापर केल्याने पाणी बचत, गुणवत्तापूर्ण उत्पादन शक्य.
- गरजेनुसार कीडनाशकांची फवारणी. फळमाशी नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर.
- पीक वाढीच्या टप्प्यानुसार पाण्याचे नियोजन. आच्छादन आणि ठिबक सिंचनाचा वापर.
- लागवडीनंतर ४० दिवसांनी उत्पादनास सुरुवात. टप्प्याटप्प्याने उत्पादन वाढत जाते.
- मेमधील लागवडीचे पीक डिसेंबरपर्यंत चालते. नोव्हेंबर लागवडीचे पीक एप्रिलपर्यंत चालते.
- चाळीस दिवसांनंतर पुढे एक दिवसाआड काढणी. लहान आणि मोठा दोडका अशी प्रतवारी. बाजारपेठेनुसार पॅकिंग नियोजन. बॉक्स पॅकिंगला अधिक मागणी.
बाजारपेठ
- कोल्हापूर, बेळगाव, पुणे, गोवा, सोलापूर, मुंबई,आंध्र प्रदेश.
- सरासरी दर : ३० ते ४५ रुपये प्रति किलो
- उत्पादन : एकरी १७ टन. योग्य दर मिळाला तर खर्च वजा जाता एकरी दोन लाखांचा नफा.
- पूर्वी बाजारपेठेत जाऊन विक्री करावी लागत होती. आता व्यापारी बांधावर येऊन दोडका खरेदी करतात.
बॉक्स आणि कॅरी बॅग पॅकिंग
- कोल्हापूर मार्केट : २५ किलो बॉक्स
- गोवा मार्केट : ३५ किलो बॉक्स
- आंध्र प्रदेश मार्केट : १० किलो कॅरी बॅग
संपर्क ः सूरज पवार, ९८३४२७७६८६
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››