दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची भरारी

वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात येणाऱ्या अडचणींमध्ये पशुधन कामी आले. नांदेड जिल्ह्यातील इजळी (ता. मुदखेड) येथील रुस्तुमा मुंगल यांची अभिमन्यू, आनंदा आणि अविनाश या मुलांनी गुलाब शेतीसह दुग्ध व्यवसायाची कास धरली.
milch buffalo and Jafarabadi male buffalo
milch buffalo and Jafarabadi male buffalo

वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात येणाऱ्या अडचणींमध्ये पशुधन कामी आले. नांदेड जिल्ह्यातील इजळी (ता. मुदखेड) येथील रुस्तुमा मुंगल यांची अभिमन्यू, आनंदा आणि अविनाश या मुलांनी गुलाब शेतीसह दुग्ध व्यवसायाची कास धरली. त्यातून घरामध्ये समृद्धी नांदू लागली. नांदेडपासून वीस कि.मी. अंतरावर इजळी (ता. मुदखेड) हे सिंचनाची बारमाही व्यवस्था असलेले गाव. येथील रुस्तुमा मुंगल यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना कसरत होत असे. अशावेळी शेतीला पूरक म्हणून रुस्तुमा यांचा दुसरा मुलगा आनंद याने दुधाच्या व्यवसाय वाढवण्याचे निश्‍चित केले. आधीपासून असलेल्या तीन म्हशींमध्ये आणखी पाच जाफराबादी म्हशींची भर घातली. थोरला मुलगा अभिमन्यू यांनी दीड एकर क्षेत्रात गुलाब लागवड केली. सध्या आई-वडिलांसह तिघांचे कुटुंब शेतीसह व्यवसायात मदत करत आहेत. दुग्ध व्यवसायात भावंडांचा शिरकाव रुस्तुमा मुंगल यांना अभिमन्यू, आनंदा व अविनाश अशी तीन मुले तर एक मुलगी. मुले मोठी झाल्यावर पाच एकर शेतीमध्ये गुजराण कशी होणार, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. घरी तीन दुभती जनावरे असली, तरी त्यात व्यावसायिकता नव्हती. या दुधाची गावातच विक्री होत असे. मात्र गावाजवळच मुदखेड येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाचे प्रशिक्षण (सीआरपीएफ) केंद्र असल्याने दर्जेदार दुधाला चांगली मागणी होती. त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते, या विचारातून आनंद यांनी दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला.

  • २०११ मध्ये नांदेड व परभणी बाजारातून पाच जाफराबादी म्हशी खरेदी केल्या. त्या काळी दिवसाकाठी पन्नास लिटर दूध निघे. त्याची घरगुती विक्री मुदखेड येथे केली जाई. यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एका स्थानिक खासगी डेअरीला व आंध्र प्रदेशातील खासगी डेअरी प्रकल्पाच्या संकलन केंद्रावर दूध देणे सुरू केले. या दूध संकलन केंद्राचा म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ५० रुपये, तर गाईच्या दुधाला ३० रुपये लिटर असा बांधीव दर होता.
  • सध्या आनंद मुंगल यांच्याकडे २९ जनावरे आहेत. यात दुधाच्या जाफराबादी सहा म्हशी, तर दुधाच्या चार संकरित गाई आहेत. इतरही तीन म्हशी व एक गाय आहे. या सोबतच पाच कारवाडी पाच वगारीचे संगोपनही त्यांनी केले आहे.
  • दुग्ध व्यवसायाचा ताळेबंद 

  • पहाटे चार ते सकाळी सहा या वेळेत आनंद व बंधू दूध काढतात. सध्या दुधाच्या असलेल्या सहा म्हशीपासून दोन वेळचे मिळून ६० लिटर दूध निघते. दुधाळ चार गाईपासून दोन वेळेचे मिळून ४० लिटर दूध निघते.
  • दररोज शंभर लिटर दुधाचे चार हजार दोनशे रुपये मिळतात. महिन्याला एक लाख २६ हजार रुपयांचे दूध, तर अडीच हजार रुपयांचे शेणखत असा एक लाख २८ हजार पाचशे रुपये उत्पन्न हाती येते.
  • या जनावरांसाठी दररोज तीस किलो सरकी पेंड व वीस किलो भरडलेला मका दिला जातो. तसेच मिनरल मिक्सर एक किलो, हिरवा व वाळलेला चारा दिवसांतून दोन वेळा देतात. असा एकंदरीत खर्च वजा जाता महिन्याकाठी साठ ते सत्तर हजार रुपये निव्वळ नफा राहतो, असे आनंद मुंगल सांगतात.
  • यासोबत जनावरांच्या वैद्यकीय खर्च असतो. जनावरांच्या आरोग्याची काळजी वेळोवेळी घेतली जाते. लसीकरण व आवश्यक औषधोपचारासाठी मुदखेड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. बी. बुचलवार, डॉ. राठोड तसेच डॉ. मंगेश हेमके यांची मदत घेतली जाते.
  • कमी खर्चातील गोठा दुधाळ जनावरांसाठी कमी खर्चामध्ये पंचवीस बाय साठ फूट व २१ बाय ५० फूट आकाराचे शेड बांधले आहे. जनावरांचे मलमूत्र जमा करण्यासाठी दहा बाय पंधरा फूट आकाराचा प्लॅस्टिक आच्छादित खड्डा केला आहे. त्यावर एक एचपीची मोटार बसवून पाण्यासोबत मिसळून शेतीला दिले जाते. यासोबतच दरवर्षी २५ ट्रॉली शेणखत या जनावरांपासून उपलब्ध होते. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली असल्याचे आनंद यांनी सांगितले. दीड एकरमध्ये चारा पीक हिरवा चाऱ्यासाठी दीड एकरमध्ये चारा पिकांचे नियोजन केले जाते. एक एकरमध्ये यशवंत गवताची टप्प्याटप्प्याने लागवड केली आहे. अर्धा एकरमध्ये न्यू नेपियर गवताची लागवड केली आहे. यासोबत सुक्या चाऱ्याचेही नियोजन केले जाते. यासाठी कडबा, गहू, सोयाबीन, हरभऱ्याचे काढे जमा केले जातात. जनावरांना वजनानुसार तीस टक्के सुका चारा तर सत्तर टक्के हिरवा चारा दिला जातो. अन्य पूरक बाबींपासून उत्पन्न

  • गोठ्यातच जातिवंत जनावरांच्या पैदाशीवर लक्ष दिले जाते. सध्या त्यांच्याकडे गाईच्या चार कालवडी व पाच जाफराबादी म्हशीच्या वगारी आहेत.
  • उत्तम दूध उत्पादनासाठी जातिवंत जाफराबादी रेडाही मुंगल यांनी जोपासला आहे. तसेच घरच्या म्हशीचा एक रेडाही त्यांच्याकडे आहे. या दोन्ही रेड्यांच्या माध्यमातून वर्षभरात सत्तर हजार रुपये मिळतात.
  • दुधाच्या उत्पन्नातून शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर घेतला आहे. घरच्या शेतीच्या कामांसह अन्य शेतकऱ्यांची आंतरमशागत करतात. यापासून वर्षाला सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न मिळते, असे आनंद मुंगल यांनी सांगितले.
  • गुलाब शेतीचा आधार अभिमन्यू मुंगल यांनी शेतीमध्ये बागायती पिकाऐवजी फुलशेतीला प्राधान्य दिले. २०१४ मध्ये दोन एकरावर शिर्डी गुलाबाची लागवड केली. जानेवारी २०१५ पासून गुलाबाचे उत्पादन सुरू झाले. हा गुलाब नांदेड येथील ठोक बाजारात विकला जातो. सुटी फुले आणि दांड्याचा गुलाब असे दोन प्रकार आहेत. सुटी फुले रोज वीस किलोपर्यंत निघतात. त्याला सरासरी पन्नास रुपये प्रति किलो असा दर मिळतो. यासोबतच दांड्याचा गुलाब रोज पाचशे नग निघतात. प्रति नग एक रुपया दर मिळतो. प्रति दिन गुलाबापासून दीड हजार रुपये उत्पन्न हाती येते. व्यवस्थापन, पॅकेजिंग व वाहतूक खर्च सात हजार रुपये वगळता गुलाबापासून ३८ हजार रुपयापर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते, असे अभिमन्यू मुंगल यांनी सांगितले. पक्क्या घराचे स्वप्न झाले पूर्ण रुस्तुमा मुंगल यांना पूर्वी पक्के घर नव्हते. मुलांनी शेतीसोबतच पूरक व्यवसायातून मागील वर्षी शेतात आलिशान दुमली घर बांधले. यात तीन मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्या असून, एक दुकानही काढले आहे. आयुष्यभर केलेल्या कष्टाला चांगली फळे आल्याने घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे रुस्तूमा मुंगल सांगतात. अभिमन्यू पदवीधर, आनंदा दहावी तर अविनाश बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. ते शेतातील नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी नियमीत ‘ॲग्रोवन’चे वाचन करतात. संपर्क ; आनंद रुस्तुमा मुंगल, ९५५२९१०९६२, ९५१८००४६४२.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com