पापडनिर्मिती व्यवसायातून रोजगारासह कमावला आत्मविश्वास

प्रक्रिया व्यवसायाने मला घरच्या घरी रोजगार मिळाला, पण त्यातून पैशापेक्षाही सर्वाधिक आत्मविश्वास मिळाला. कोणताही व्यवसाय छोटा-मोठा नसतो, आपण तो कसा करतो, यावर ते अवलंबून आहे. यापुढे मला पापड उद्योगाचा स्वतःचा ब्रॅण्ड तयार करायचा आहे. - सौ. रुक्मिणी गवळी
process products
process products

ज्वारी, तांदळाच्या पापडासह गव्हाची भुसावडी तयार करण्याच्या लघुउद्योगातून वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील सौ. रुक्मिणी बापूसाहेब गवळी यांनी आपल्या संसाराला हातभार लावला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार त्या पापडांची निर्मिती करतात. उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी विविध प्रदर्शनात सहभाग घेत उत्पादने विक्रीवर त्यांचा अधिक भर असतो. या लघुउद्योगातून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे, त्यामुळे आज यशस्वी महिला उद्योजक म्हणून त्यांचा लौकिक वाढला आहे. 

सोलापूर-बार्शी महामार्गावरील वैरागमधील दत्तनगरमध्ये सौ. रुक्मिणी गवळी यांनी घरच्या घरी पापड, सांडगे आणि गव्हाची भुसावडी तयार करण्याचा लघुउद्योग सुरू केला आहे. त्यांचे पती बापूसाहेब एका खासगी शिक्षण संस्थेत काम करतात. धीरज आणि भगवती अशी दोन मुले त्यांना आहेत. ते दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. गावामध्येच त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. त्यात सोयाबीन, ज्वारी अशी हंगामी पिके घेतली जातात. पण शेतीचे सगळे गणित पावसावरच अवलंबून आहे. त्यात पतींच्या एकट्याच्या उत्पन्नावर सगळा भार पेलणे अवघड होते. त्यामुळे आपल्या संसाराला पतीबरोबर आपलाही हातभार लागावा, अशी रुक्मिणीताईंची इच्छा होती. यातून त्यांनी पापडनिर्मिती व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.   पापडनिर्मिती व्यवसायाला सुरुवात  रुक्मिणीताई दहावीपर्यंत शिकल्या आहेत. २०१७ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) उपक्रमाची माहिती त्यांना मिळाली. उमेद अभियानांतर्गतच त्यांच्या भागात त्या वेळी स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यामध्ये घरच्या घरी करता येऊ शकेल, असे अनेक उद्योग होते. त्यातून त्यांनी आपण गुंतवू शकणारे भांडवल, आपल्याला जमेल, असा उद्योग म्हणून पापड उद्योग निवडला. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. पापड तयार केल्यानंतर त्याची विक्री कुठे करायची, पापड ग्राहकांच्या पसंतीला पडतील का?, हे आणि यासारखे अनेक प्रश्न त्यांना पडले. पण आता माघार नाही, या निर्धाराने त्या या व्यवसायात उतरल्या. उमेद अभियानाच्या कविता चव्हाण, शुभांगी बोडके, नरेंद्र साखरे, रामगुडे, सुवर्णा काळे, वैशालीताई आवारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला.   कुरकुरीत पापड, चवदार सांडगे  रुक्मिणीताई ज्वारीचे पापड, तांदळाचे पापड, कोंडा पापड, बाजरीचे सांडगे, विविध डाळींच्या मिश्रणाचे सांडगे आणि गव्हाची भुसावडी यासारखी उत्पादने तयार करतात. हे पापड तयार करताना त्यांच्यातील कुरकुरीतपणा आणि चवदारपणा टिकावा, यासाठी तेल-मीठासह जिरे-धनेपूड यासारख्या मसाल्याच्या योग्य प्रमाणामुळे पापडांना विशिष्ट प्रकाराची चव मिळते. त्यामुळेच ग्राहकांची त्यांच्या उत्पादनाला अधिक पसंती मिळते.    पापडांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व  उन्हाळी कामात पूर्वी घरोघरी विविध धान्यांपासून पापड तयार केले जात, पण आज त्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. पण आज ग्राहकांकडून या पापडांना सर्वाधिक मागणी आणि पसंती आहे. गव्हाच्या भुसावडीमुळे पोट साफ होते, गॅस समस्या कमी होते, ज्वारीच्या पापडीतून चांगल्या पद्धतीचे जीवनसत्व मिळते, तर कोंड्याच्या पापड्या मधूमेहीग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात, असा रुक्मिणीताईंचा दावा आहे.   विविध प्रदर्शनातून थेट ग्राहकांना विक्री  सध्या त्यांनी तयार केलेल्या पापडांना घरबसल्या मागणी असते. अनेक ग्राहक आॅर्डर देऊन त्याप्रमाणे पापड तयार करून घेतात. पण त्यापेक्षा विविध प्रदर्शनातून एकाचवेळी उत्पादनांची सर्वाधिक विक्री आणि थेट ग्राहकापर्यंत पोचणे, त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यामुळे विविध शहरांतील प्रदर्शनातून त्या उत्पादने विक्रीसाठी प्राधान्य देतात. त्यानुसार आतापर्यंत सोलापूर, हैदराबाद, मुंबई, उस्मानाबाद आणि पुणे येथील महिला बचत गट, हिरकणी, सरस यासारख्या प्रदर्शनातून त्यांनी स्टॅाल लावून पापडांची विक्री केली. त्यासाठी प्रत्येकी ५० किलोची उत्पादने त्यांनी तयार केली. त्यातून जवळपास ४० हजारांची उलाढाल झाली. त्यातून खर्च वजा जाता ३० हजार रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा त्यांना मिळाला.  समान दराने पापडांची विक्री  ज्वारी, तांदूळ, कोंडा पापडी किंवा गव्हाची भुसावडी तयार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. रुक्मिणीताई उन्हाळ्यात या पापडांची निर्मिती करतात. सुरुवातीला त्या या कामात पती आणि मुलांची मदत घेत होत्या. नंतर मागणी वाढल्यानंतर चार महिलांची रोजगार देऊन मदत घेऊ लागल्या. सर्वच पापड, सांडग्याचा दर प्रतिकिलो २५० रुपये असा एकसारखा ठेवला आहे. खाण्याची वस्तू आहे आणि शहरी भागातच त्याला अधिक मागणी आहे, त्यामुळे खर्च वजा जाता, थोडा फार नफा मिळाला तरी चालेल, अशी त्यांची भूमिका आहे.

गव्हाच्या भुसावडीची वैशिष्ट्ये  ज्वारी, तांदूळ, बाजरीचे पापड रुक्मिणीताई करतातच, पण त्यांच्याकडील उत्पादनाचे वैशिष्ट्य म्हणजे गव्हाची भुसावडी. गव्हाच्या कुरडया करताना गहू भिजवून त्याचा चीक घेतला जातो, त्यातून खाली राहिलेल्या चोथ्यापासूनच गव्हाच्या भुसावड्या तयार केल्या जातात. हा चोथा सहसा फेकून दिला जातो. परंतु, हा चोथा अधिक पौष्टिक असतो. रुक्मिणीताईंनी हा चोथा फेकून न देता त्यापासून पौष्टिक अशी भुसावडी तयार केली. या भुसावडीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहेच; शिवाय विशिष्ट अशी चव असल्यामुळे ग्राहकांची मागणीही वाढू लागली. सहसा कोणत्याही बाजारात ही भुसावडी मिळत नाही. त्यामुळे त्याला ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे. 

- सौ. रुक्मिणी गवळी, ९५०३२२१३६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com