करार शेतीतून गवसली आर्थिक समृद्धीची वाट

सुधारित तंत्राने रूपेश उल्हे भाजीपाला पिकांची लागवड करतात. कारली लागवडीमध्ये केलेले प्लॅस्टिक आच्छादन.
सुधारित तंत्राने रूपेश उल्हे भाजीपाला पिकांची लागवड करतात. कारली लागवडीमध्ये केलेले प्लॅस्टिक आच्छादन.

परतवाडा (जि. अमरावती) येथील रूपेश उल्हे यांनी व्यवसायातील आर्थिक अडचणी लक्षात घेऊन व्यावसायिक शेतीचा पर्याय निवडला. घरची अवघी अडीच एकर इतकी शेती असताना करारावर शेती करीत त्यांनी भाजीपाला, फुलशेती आणि कलिंगडासारख्या पिकात सातत्य ठेवले. यातूनच त्यांचा आर्थिक पाया भक्‍कम होण्यास मदत झाली. आज रूपेश उल्हे तब्बल ३० एकर क्षेत्रावर कराराने शेती करीत आहेत.

रुपेश उल्हे यांची वडूरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथे वडिलोपार्जीत अडीच एकर शेती आहे. व्यवसायाच्या निमित्ताने परतवाड्यात ते स्थायिक झाले. तब्बल दहा वर्षे त्यांनी व्यवसाय केला. परंतु व्यवसायातील आर्थिक चढ उतारामुळे रूपेश उल्हे यांनी घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. त्यापूर्वी परिसरातील विविध पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने त्यांनी भाजीपाला आणि कलिंगड लागवडीस सुरवात केली.

करार शेतीच्या दिशेने  परतवाड्यापासून वडूरा हे ५० किलोमीटरवर असल्यामुळे चांगल्या पद्धतीने शेती करणे शक्‍य नाही, हे लक्षात आल्यावर रूपेश उल्हे यांनी चार वर्षांपूर्वी परतवाड्याच्या परिसरातील शेती टप्प्याटप्प्याने करारावर घेत ती कसण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात त्यांची करारशेती तीस एकरांवर पोचली आहे. वार्षिक १० ते १२ हजार रुपये प्रती एकर असा करार त्यांनी केला आहे. वडूरा, वडगाव, एकलासपूर, गौरखेडा शिवारात हे संपूर्ण क्षेत्र आहे. व्यावसायिक पिके घेण्यावर भर असल्याने पाण्याची सोय असलेली शेती करारावर घेतली जाते. रूपेश उल्हे यांच्याकडे दररोज २५ ते ३० मजूर शेतीमध्ये कार्यरत असतात. गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मजूर शेती कामासाठी नेले जातात. जमीन सुपिकतेसाठी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर होतो. कीड, रोग नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धती, सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. सर्व ठिकाणी ठिबक सिंचन, आच्छादन तंत्र, विद्राव्य खतांचा वापर केला जातो. रूपेश यांनी परिसरातील २०० शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे. गटामध्ये पीक व्यवस्थापनाची सातत्याने चर्चा होते. हंगामानुसार विविध पिकांची शिवारफेरी होते. शेतकऱ्यांच्यामध्ये अवजारांची देवाण घेवाण होते. शेतकरी गटामुळे पीक उत्पादनवाढीला चालना मिळाली आहे.

झेंडूची लागवड  गेल्यावर्षी रूपेश उल्हे यांनी शेवंती आणि झेंडूची पाच एकरावर लागवड केली होती. परंतु या फुलांची आवक बाजारात वाढल्याने दरात घसरण झाली होती. परंतु यंदाच्या वर्षी त्यांनी सणांचा अंदाज घेत पाच एकरांवरील तुरीमध्ये झेंडूचे आंतरपीक घेतले आहे. तुरीच्या दोन ओळीत आठ फूट अंतर ठेवत मधल्या पट्ट्यात झेंडूची एक ओळ घेतली. यावर्षी झेंडू फुलांना मागणी आणि दर चांगला राहील, अशी त्यांना अपेक्षा आहे.

कपाशी आणि तूर लागवड रूपेश उल्हे यांनी तीन एकरांवर कपाशी आणि पाच एकरांवर तूर लागवड केली आहे. तूर लागवडीसाठी एक फूट उंचीचा गादीवाफा ट्रॅक्‍टरच्या मदतीने तयार केला. प्रत्येकी सहा इंचावर तूर बियाण्याची टोबणी करण्यात आली. यामुळे बियाणे बचत झाली. कपाशी आणि तूर ही दोन्ही पिके डिसेंबरपर्यंत काढणीस येतात. कापसाची फरदड न घेता पुढील काळात कलिंगड लागवडीचे नियोजन असते.

भाजीपाला पिकांवर भर  मध्य प्रदेश, अमरावती, चांदूरबाजार तसेच परिसरातील महत्त्वाच्या शहरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेत रूपेश उल्हे यांनी विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. याबाबत रूपेश उल्हे म्हणाले की, यंदाच्या वर्षी आठ एकर मिरची, अर्धा एकर ढोबळी मिरची, दोन एकर कारली, एक एकर काकडी, दोन एकर टोमॅटो, एक एकर भेंडी, एक एकर वांगी लागवड केली आहे. मिरची लागवड मे, जून आणि जुलै महिन्यात केली आहे. ढोबळी मिरची लागवड जूनमध्ये केली आहे, हे पीक नोव्हेंबरपर्यंत चालेल. कारली लागवड मे महिन्यात केली, सप्टेंबरपर्यंत हे पीक चालले. काकडीची पहिली एक एकर लागवड १५ मे ला केली. हे पीक आगस्टपर्यंत चालले. दुसरी लागवड सप्टेंबर महिन्यात केली आहे. भेंडी लागवड मे मध्ये केली, हे पीक सप्टेंबरपर्यंत चालले. वांगी लागवड सप्टेंबर महिन्यात केली आहे. परतवाडा, अमरावती बाजारपेठेत भाजीपाला पाठविला जातो. या बाजारपेठेत मिरची १४ ते २५ रुपये किलो, ढोबळी मिरची ३० रुपये किलो, काकडी १० ते २२ रुपये किलो, काकडी १८ ते ३० रुपये किलो, भेंडी २० ते ५० रुपये किलो, वांगी १० ते ४० रुपये किलो असा दर मिळतो. गुणवत्तेमुळे व्यापारी शेतावर येऊन देखील भाजीपाला खरेदी करतात.

२० ते २५ एकरावर कलिंगड लागवड कलिंगड लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याने रूपेश उल्हे हे गेल्या तीन वर्षांपासून कलिंगड लागवडीकडे वळले आहेत. पहिल्यावर्षी दोन एकर त्यानंतर २० एकर आणि यंदा २५ एकरावर लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे. तूर आणि कपाशीची काढणी डिसेंबरमध्ये होते. त्यानंतर कलिंगड लागवडीसाठी पाच फूट तसेच सात फूट अंतरावर गादीवाफे करून लागवड केली जाते. गादीवाफ्यावर प्लॅस्टिक आच्छादन तसेच ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. वाढीच्या टप्प्यानुसार खत व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रणावर भर देत त्यांनी दर्जेदार उत्पादनावर भर दिला आहे. एकरी २५ ते ३० टन उत्पादन त्यांना मिळते. फळांची प्रतवारी करून थेट शेतात व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. त्यामुळे सरासरी ७ ते ११ रुपये प्रति किलो दर त्यांना मिळाला आहे. परतवाडा परिसरात २०१७-१८ मध्ये पहिल्यांदा कलिंगड लागवड करण्यात आली. त्यावेळी चार शेतकऱ्यांनी ११ एकरांवर लागवड होती. २०१८-१९ मध्ये ५० शेतकऱ्यांनी १५० एकर क्षेत्रावर लागवड केली होती. यंदाच्यावर्षी कलिंगड लागवड क्षेत्र सुमारे ४५० एकरांवर पोचण्याचा अंदाज रूपेश उल्हे वर्तवितात. त्यामुळे या भागातील काही गावात कलिंगड हे महत्त्वाचे आर्थिक पीक झाले आहे.

-  रूपेश उल्हे, ९०४९४०५८५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com