पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘संवेदना’चा जागर

वनविभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना संस्थेचे सदस्य.
वनविभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना संस्थेचे सदस्य.

अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस गावांच्यामध्ये संवेदना समाज विकास या संस्थेने लोक सहभागातून गवत संरक्षण, वनसंरक्षणाच्या कामाला गती दिली आहे. याचबरोबरीने संस्थेतर्फे जलसंधारण, पशुपालन, दुग्धविकास, दुष्काळ निर्मूलन असे उपक्रम राबविले जातात. याचा चांगला फायदा ग्राम आणि पर्यावरण विकासामध्ये होत आहे. 

विदर्भामध्ये कार्यरत असणाऱ्या संवेदना समाज विकास या संस्थेची सुरुवात जैविक पद्धतीने झाली. जशी एखाद्या जिवाची सुरुवात एका पेशीपासून होऊन त्याचे एक शरीर तयार होते तसा संवेदना संस्थेचा प्रवास आहे. कौस्तुभ पांढरीपांडे यांच्या पक्षिनिरीक्षणाच्या छंदातून संस्थेच्या कामाचे बीज रोवले गेले. पक्षी बघत रानोमाळ हिंडण्याच्या छंदाला अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाची जोड मिळत गेली. पक्षिनिरीक्षणापासून फासेपारधी समुदायातील तरुणांसोबत संस्थेच्या विविध उपक्रमांना गती मिळाली. कौस्तुभ पांढरीपांडे यांना १९९८ साली विदर्भ नेचर ॲन्ड ह्युमन सायन्स सेंटर या संस्थेच्या ‘विदर्भातील दुर्मीळ पक्ष्यांच्या अभ्यास’ प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली. विदर्भात पूर्वी तणमोर आणि माळढोक पक्षी विपुल प्रमाणात दिसत असल्याचे पुरावे होते, मात्र नजीकच्या काळात त्यांचे दर्शन दुर्लभ झाले. या कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांनी फासेपारधी लोकांच्या वस्त्यांवर भेटी देण्यास सुरुवात केली. या भेटीतून अकोला जवळच शिसा मासा गावात राहण्याऱ्या हिंमतराव पवार यांची ओळख झाली. या परिसरात पवार यांनी तणमोर मादीचे अस्तित्व शोधून काढले. यानंतरच्या अभ्यासासाठी हिंमतराव पवार यांच्या सोबत पश्चिम विदर्भातील बऱ्याच फासेपारधी समूहांच्या गावात भेटी, चर्चा आणि मुक्काम करण्याची संधी मिळाली. या प्रवासातून फासेपारधी, गवताळ भाग यावर बरीच चर्चा सुरू झाली. उपक्रमांना सुरुवात  भटक्या-विमुक्त जमातींच्या सामाजिक प्रश्नांची तीव्रता, गरज लक्षात आल्यानंतर कौस्तुभ पांढरीपांडे यांनी २००१ साली संवेदना समाज विकास  संस्थेची स्थापना केली.  व्यवस्थित माहिती संकलन, निरीक्षण, वाचन, विचारमंथन व्हावे म्हणून सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये प्रकल्पांपेक्षा शिष्यवृत्ती घेऊन संस्थेच्या कामकाजाला सुरुवात झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र हे ग्रामीण भाग असल्याने नागपूर सोडून कारंजा (लाड) या तालुक्याच्या गावी कौस्तुभ पांढरीपांडे कुटुंबासह स्थायिक झाले. युवा संस्थेव्दारे पहिली, स्माईल संस्थेव्दारे दुसरी, सृती-दिल्ली व्दारे तिसरी आणि अशोका फाउंडेशनची चौथी शिष्यवृत्ती पांढरीपांडे यांना मिळाली.  या पाच वर्षांदरम्यान संस्थेने पहिला बचतगट तयार केला. यातून भटकी जमात आणि आदिवासींचे प्रश्‍न सोडवण्यास संस्थेतर्फे सुरुवात झाली.  संस्थेच्या उपक्रमांना दत्ता सावळे, बाळकृष्ण रेणके, शरद कुळकर्णी, डॉ. माधव गाडगीळ, डॉ. कैलास मल्होत्रा, मोहन हिराबाई हिरालाल, शुभदा देशमुख, डॉ. सतीश गोगुलवार यांची मदत मिळाली. सामान्यपणे भटक्या-विमुक्त जमातींच्या समस्या आणि त्यावरील उत्तरांचे पर्याय शोधण्याचे काम संवेदना संस्था करते. यासाठी संस्थेतर्फे शोधयात्रेचे आयोजन केले जाते. स्वतःच्या समस्या सोडविण्यासाठी समुदायाने स्वतःच पुढाकार घ्यायला हवा असे धोरण  संस्थेने राबविले आहे. यामुळेच ’संवेदना’च्या कार्यक्षेत्रात फासेपारधी समुदायातील विशेषत्वाने युवक व स्त्रियांमधली स्वयंप्रेरणा जागताना ठळकपणे लक्षात येते. 

विविध उपक्रम 

  • संस्थेच्या माध्यमातून सुमारे १७ बचतगटांची स्थापना. या माध्यमातून एक लाख रुपयांची बचत. हे गट बॅँक कर्ज लोभाने नव्हे, तर आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून चालतात. हप्त्याची रक्कम कमी-जास्त करता येते. सदस्यांना एकदम हप्ता भरता येतो. 
  • हिंमत पवार या फासेपारधी मित्राकडे असलेल्या परंपरागत ज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्रात सुमारे शंभर वर्षांनंतर तणमोर या अति दुर्मीळ पक्षाच्या विणीचा पुरावा मिळाला. पक्ष्यांच्या संरक्षणातही या जमातीचा चांगला सहभाग मिळू लागला आहे. 
  •  वडाळा गावातील रचनात्मक कामामुळे फासेपारधी समाजाची वेगळी ओळख आणि कामाची पद्धत लोकांच्या दृष्टिपथास येऊ लागली. 
  • जात पंचायतीचे विधायक नवे रूप म्हणून तांडा-पंचायत, तांडा-शाळा याचबरोबरीने शेळीपालनाला सुरुवात झाली. 
  •  संस्थेच्या माध्यमातून चारा प्रजातींचे बीज संकलन, विविध वनस्पतींची रोपवाटिका आणि लागवड, वन जमिनीवरील गवताचे संरक्षण,  गोवऱ्या बनविणाऱ्या मुलांचा बचत गट, अशा  उपक्रमांचे आयोजन.
  • चारा विकून जनावरे घेणारे गाव संवेदना संस्थेच्या प्रयत्नातून आणि वडाळा गावातील कुलदीप राठोड, सेवा पवार, शेषराव जाधव, संतोष जाधव या युवकांच्या सहभागाने सुरू झालेले गवत संवर्धन आणि संरक्षणाचे काम वडाळा गावापुरते मर्यादित न रहाता अकोला जिल्ह्यातील पाराभवानी, पिंपळगाव चांभारे, कानशिवणी अशा अनेक गावात पसरले आहे.  आपल्या गाव शिवारात लोक सहभागातून गवत संरक्षणास सुरुवात झाली आहे. सध्या सुमारे ६०० हेक्टर प्रदेशावर हे काम सुरू आहे. यामुळे सुमारे १५००  जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला. आज महाराष्ट्रात चारा टंचाई असल्याने पशुपालकांसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत, मात्र संवेदना संस्थेचे प्रयत्न आणि लोक सहभागातून गवत संरक्षण झाल्यामुळे चारा विकून जनावरे खरेदी करणारे गाव अशी वडाळा गावाची ओळख झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमामुळे हे शक्य झाले.  

    लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन संस्था प्रामुख्याने फासेपारधी जमातीचे परंपरागत ज्ञान व कौशल्य वापरून दुर्मीळ तणमोर पक्षाचा अभ्यास, गवताळ जैवविविधता संरक्षणाबाबत काम करते.  

  •   महाराष्ट्रात २००७ साली सुमारे शंभर वर्षांनंतर तणमोराचे घरटे शोधण्यात यश आले, त्यानंतर नियमितपणे २००८, २००९, २०११ मध्ये घरट्यांचा शोध, संरक्षण करण्यात संस्थेला यश आले आहे. यामुळे तणमोरांच्या संख्येत सहा पक्षांनी वाढ झाली. राज्यात फक्त अकोला, वाशीम जिल्ह्यात सुमारे २० ते २५ तणमोर दिसतात. 
  •   सन २००८ पासून फासेपारधी जमातीच्या तांडा पंचायत या व्यवस्थेची स्थापना झाली. यामुळे पूर्वीच्या जात पंचायती व्यवस्थेमध्ये शक्य नसलेले महिलांचे स्थान, लोकशाही पद्धतीने सदस्यांची निवड यासारख्या सुधारणा झाल्या. तांडा पंचायत, युवक मंडळ हे गाव समाजाच्या समस्यांचा अभ्यास आणि सोडवणूक करतात. यासाठी संवेदना मदत करते.  
  •   फासेपारधी जमातीच्या वडाळा या गावाने तांडा पंचायतीच्या माध्यमातून तणमोर पक्षाच्या शिकारीवर पूर्णतः बंदी घातली आहे. वडाळा गाव लोकसहभागातून २०० हेक्टर वनजमिनीवर २०१० पासून चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, शिकारबंदीच्या माध्यमातून परंपरागत गवत जातींचे संरक्षण करत आहे. या कामासाठी हैदराबाद येथे आयोजित जागतिक जैवविविधता परिषदेत यु.एन.डी.पी. आणि केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाव्दारे तांडा पंचायतीचा सन्मान करण्यात आला. 
  •  भटक्या-विमुक्त जमातीमधील युवकांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास करून बचतगट, युवक युवतीगट, तांडाशाळा, तांडा संपर्क अभियान अशा उपक्रमातून स्वावलंबन, सक्षमीकरण सोबतच न्याय हक्क आधारीत लोकशाही बळकटीकरणाचे काम संवेदना करत आहे.
  •  अकोला, वाशीम जिल्ह्यातील ३० गावातील सुमारे १५,००० व्यक्तींच्या सहभागातून गवत संरक्षण, वनसंरक्षण, सोपे जलसंधारण, पशुपालन, दुग्धविकास, दुष्काळ निर्मूलन व दारिद्रय निवारण अशा दिशेने संवेदना संस्था कार्यरत आहे.
  • -  कौस्तुभ पांढरीपांडे, ९१६८६०६९६०

    ( लेखक संवेदना समाज विकास संस्थेचे संस्थापक सचिव आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com