फळबागेतून शेती केली किफायतशीर

कडक उन्हापासून संरक्षणासाठी डाळिंब झाडावर केलेले आच्छादन.
कडक उन्हापासून संरक्षणासाठी डाळिंब झाडावर केलेले आच्छादन.

कनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात संजय दत्तात्रेय अजगर यांनी वडिलोपार्जित दहा एकर शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. शिक्षकी पेशात कार्यरत असल्याने शेती व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांनी डाळिंब, पेरू, सीताफळ आणि आंबा लागवड केली. ठिबक सिंचन, सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे. फळबागेतून आर्थिक नफा वाढविण्याचा संजय अजगर यांचा प्रयत्न असतो. 

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असणारे संजय दत्तात्रेय अजगर यांनी कनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलढाणा) शिवारात वडिलोपार्जित दहा एकर शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली. या शेतीमध्ये त्यांची पारंपरिक पिकांच्या एवजी डाळिंब, आंबा, पेरू, सीताफळ लागवडीवर भर दिला. प्रामुख्याने मिश्र फळबागांमधून ते अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. सोयाबीन, तूर तसेच फळबागेमध्ये फारसा रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापरावर त्यांचा भर आहे.  शेतीचे नियोजन  पीक व्यवस्थापनाबाबत संजय अजगर म्हणाले, की मी शाळेत शिक्षक असल्याने शेती व्यवस्थापनाला सोपे जाण्यासाठी मी फळबागेवर लक्ष केंद्रित केले. माझी दहा एकर शेती आहे. यातील अडीच एकरावर डाळिंब, वीस गुंठे आंबा आणि वीस गुंठे क्षेत्रात पेरू, सीताफळ मिश्र फळबाग आहे. पाच एकरांवर सोयाबीन, तूर लागवड असते. यंदाच्या वर्षी या क्षेत्रातही पेरू लागवड केली आहे. माझ्याकडे दोन कूपनलिका आणि एक विहीर आहे. संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. मला साधारणपणे आठ महिने पाणी पुरते. त्यानंतर मी फळबागेच्या गरजेनुसार माझ्या शेजारील विठ्ठल खराटे यांच्या कुपनलिकेवरून पाणी घेतो. पाच एकर क्षेत्रामध्ये कृषी विभागाच्या योजनेतून एक शेततळे घेतले आहे. माझ्या शेतीचे व्यवस्थापन विठ्ठल खराटे आणि त्यांच्या पत्नी शारदा खराटे सांभाळतात. त्यांना महिन्याला ठरावीक रक्कम दिली जाते. माझे वडील हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, ते देखील शेतीच्या व्यवस्थापनात लक्ष देतात. मी गरजेनुसार शेतावर जाऊन नियोजन करत असतो. मी दरवर्षी पाच एकरात सोयाबीन आणि तुरीची लागवड करतो. मला सोयाबीनचे एकरी आठ क्विंटल आणि तुरीचे चार क्विंटल उत्पादन मिळते. मी २०११ साली डाळिंबाच्या भगवा जातीची अडीच एकरावर  १५  बाय १० फूट अंतराने लागवड केली. या बागेतच डाळिंबाच्या ओळीत एक सीताफळ आणि दोन रांगात पेरूची लागवड केली. चार वर्षांनंतर मी डाळिंब झाडे कमी करणार आहे. वीस गुंठे क्षेत्रात सीताफळ आणि पेरूची मिश्र फळबाग आहे. दोन वर्षांपूर्वी २० गुंठे क्षेत्रावर केशर आंबा लागवड केली आहे. या सर्व फळबागेला ठिबक सिंचन केले आहे. उन्हाळ्यात डाळिंब झाडांवर आच्छादन केले जाते. त्यामुळे झाडे आणि फळे चांगली राहतात. सध्या डाळिंब, पेरू, सीताफळाचे उत्पादन सुरू झाले आहे. डाळिंबाचे अडीच एकरात मला गेल्यावर्षी आठ टनाचे उत्पादन मिळाले आहे. फळांची प्रतवारी करूनच नाशिक, आळेफाटा, पंढरपूर व नागपूर येथे विक्री केले जाते. डाळिंबाने गेल्या दोन हंगामात चांगले पैसे मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी डाळिंबाचा खर्च वजा जाता तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. वीस गुंठ्यातील सीताफळ, पेरू बाग ही कळी अवस्थेत बागवानाला दिली जाते. त्यामुळे या बागेचे व्यवस्थापन बागवानाकडूनच केले जाते. दरवर्षी बहरानुसार बागेचे पैसे ठरतात. येत्या हंगामापासून केशर आंब्याचे उत्पादन काही प्रमाणात सुरू होईल. गेल्यावर्षी पेरूचे तीन टन आणि सीताफळाचे दोन टन उत्पादन मिळाले होते. फळांची प्रतवारी, पॅकिंगसाठी शेतामध्येच पॅक हाउस उभारलेले आहे.

भविष्यातील नियोजन  बुलडाणा जिल्ह्यात पेरूला वातावरण अधिक पोषक आहे. खर्चाच्या बाबतीतही डाळिंबच्या तुलनेत पेरू हा चांगला पर्याय पुढे आला आहे. ही बाब लक्षात घेत संजय अजगर यांनी पारंपरिक पिकांच्यापेक्षा पाच एकरात २० बाय २० फूट अंतरावर पेरू लागवड केली आहे. पेरूचे चांगले उत्पादन घेण्याच्या दृष्टीने त्यांनी योग्य व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. सेंद्रिय खते आणि कीडनाशकांचा वापर करून दर्जेदार उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गाव शिवारातील शेतकरी अजगर यांच्या फळबागेचे नियोजन पहायला येतात. या चर्चेचा चांगला फायदा फळबाग व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी होत असतो.    

व्यवस्थापनाची सूत्रे

  •   पारंपरिक पिकांएेवजी डाळिंब, पेरू, आंबा, सीताफळ लागवड.
  •   सेंद्रिय खतातून जमीन सुपीकतेवर भर, सेंद्रिय कीडनाशकांचा वापर.
  •   संपूर्ण फळबागेला ठिबक सिंचन.
  •   डाळिंब, पेरू, सीताफळाची प्रतवारी करून विक्रीचे नियोजन.
  •   शेतामध्ये पॅक हाउस आणि शेततळे.
  •   शेतकऱ्यांशी चर्चा करून फळबाग व्यवस्थापन आणि उत्पादनात वाढीचा प्रयत्न.
  • शेती बांधावर विविध फळे आणि फुलझाडे  संजय अजगर यांनी शेती बांधावर विविध फळे आणि फुलझाडांची लागवड केली आहे. यामध्ये नारळ, अंजीर, चिकू, आंबा, हादगा, शेवगा, रामफळ, पपई, उंबर, जांभूळ, आवळा, चिंच, बहावा, गुंज, बांबू, पारिजातक, चाफा, बेल, बोर, लिंबू, गोडलिंब, कवठ, बदाम, गुलमोहराची लागवड केली आहे. त्यामुळे फळबागेच्या संरक्षणासाठी नैसर्गिक वनभिंत तयार झाली आहे. 

    सेंद्रिय खत वापरावर भर 

    जमिनीचा पोत आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी संजय अजगर फळबागेत शेणखत आणि कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर करतात. सोयाबीन कुटार, तूर कुटार, शेणखत,  डी कंपोस्टर वापरून कंपोस्ट खत तयार केले जाते. त्याचबरोबरीने निंबोळी पेंडीचा देखील ते वापर करतात.  फळबागांना दरवर्षी जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात सेंद्रिय खताची मात्रा दिली जाते. यामुळे झाडांची चांगली वाढ होते. जमीन भुसभुशीत राहते. ओलावा टिकून राहतो. कमी पाण्यात देखील फळझाडे चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आणि सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर अजगर यांचा भर आहे.  - संजय अजगर, ८००७०४७२५५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com