मसालेनिर्मितीतून संस्कृती गट झाला स्वावलंबी

स्टॉलवर मसाला पाऊच विक्री करताना गटातील सदस्या
स्टॉलवर मसाला पाऊच विक्री करताना गटातील सदस्या

ओझर्डे (ता. वाई, जि. सातारा) येथील संस्कृती महिला बचत गटातील महिलांनी विविध चवीचे दर्जेदार मसाले तयार केले आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गटाने दहा प्रकारचे मसाले तयार केले. प्रदर्शनाबरोबर दुकानदारांनादेखील मसाल्याची विक्री केली जाते. गुणवत्ता आणि चवीमुळे ग्राहकांच्याकडून दरवर्षी मसाल्यांची मागणी वाढत आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुका दर्जेदार हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हळदीच्याबरोबरीने ऊसदेखील महत्त्वाचे पीक. वाई तालुक्यातील ओझर्डे हे सुमारे सात हजार लोकसंख्येचे गाव. या गावात हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. या गावामध्ये सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तनिष्का महिला गटाची सुरवात झाली. तनिष्का गटामध्ये सुनंदा फरांदे, उमाताई निकम, मीना फरांदे, अंजली सुतार, गौरी पिसाळ, निरुपमा पिसाळ, सुनंदा अण्णासाहेब फरांदे, सुरेखा पिसाळ या सदस्या कार्यरत आहेत. गटाच्या माध्यमातून गावातील उपक्रमशील महिला एकत्र येऊ लागल्या. तनिष्का गटाच्या माध्यमातून ग्राम विकासासाठी एकत्र येत असताना उमाताई निकम यांनी महिला बचत गट सुरू करण्याचा विचार मांडला. हा विचार गटातील सर्व सदस्यांना मान्य झाल्याने संस्कृती महिला बचत गटाची सुरवात झाली. गटाच्या अध्यक्षपदी मीना फरांदे, उपाध्यक्षपदी गौरी पिसाळ तर सचिवपदी अंजली सुतार यांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आर्थिक बचत हाच गटाचा मुख्य उद्देश होता. या काळात उमाताई निकम गावच्या सरपंच होत्या. त्यांनी गावामध्ये चौदाव्या वित्त आयोगातून मसालानिर्मिती, कागदी पिशव्यानिर्मिती आणि सोयाबीनपासून पदार्थनिर्मितीबाबत प्रशिक्षणांचे आयोजन केले होते. नुसती आर्थिक बचत करण्यापेक्षा मसालेनिर्मिती करूया असा विचार गटामधून पुढे आला. हा विचार सर्वांनाच पटल्याने गटाच्या माध्यमातून मसालेनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.  मसालेनिर्मितीला सुरवात    महिला गटातील सर्व सदस्यांची आर्थिक परिस्थिती जरी चांगली असली तरीदेखील काहीतरी वेगळं करून दाखविण्याची जिद्द त्यांच्यात होती. गटाची उपक्रमशीलता पाहून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरविंद राजकर यांनी गटाला प्रक्रिया उद्योगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून गटातील सदस्यांनी मसालानिर्मितीचे नियोजन केले. गटातील सदस्यांनी सुरवातीला प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करत चौवीस हजार रुपयांचे भांडवल तयार केले. या भांडवलातून मसालानिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि मसाला ग्राईंडर खरेदी केला. बाजारपेठेत गटाच्या उत्पादनाची ओळख होण्यासाठी ‘मानिनी’ हा ब्रॅंड तयार केला. सुरवातीच्या काळात गटातील सदस्या आपापल्या घरी मसाले तयार करीत. तयार झालेले मसाले एकत्र करून पंचक्रोशीत विक्री केली जायची. सुरवातीला मटण, चिकन, बिर्याणी, पावभाजी असे मसाले गटातील सदस्यांनी तयार केले. गटातील सदस्या सातत्याने विविध चवीचे मसाले तयार करण्याच्या प्रयत्नात असतात. नवनवीन मसालेनिर्मितीची माहिती यू ट्यूबवरून घेतात. त्या पद्धतीनुसार नवीन चवीचे मसाले तयार करून पाहतात. सध्या गटातर्फे कोकणी मसाला, मिसळ मसाला, सांबर मसाला, चाट मसाला, दूध मसाला, गोडा मसाला, काळा मसाला, कांदा-लसूण मसाला, कढई मसाला असे विविध दहा प्रकारचे मसाले आकर्षक पाऊच पॅकिंगकरून विक्री केले जातात. गेल्या वर्षभरात ओळखीचे लोक, पाहुणे मंडळी तसेच परिसरातील दुकानदारांच्या माध्यमातून मसाल्याची प्रसिद्धी होत गेली. संक्रांतीचे वाण म्हणूनही गावातील महिला मसाल्याची पाकिटे वाटतात. विविध मसाल्यांना गावातील महिला तसेच पंचक्रोशीतील दुकानदारांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने सदस्यांचा आत्मविश्‍वास वाढला.  गटाला मिळाले मार्गदर्शन  महिला गटाला मसालेनिर्मिती आणि विक्रीसाठी अनेकांची मदत झाली. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरविंद राजकर, तनिष्का व्यासपीठाचे संजय शिंदे, लक्ष्मण चव्हाण तसेच सर्वांच्या कुटुंबातील सदस्यांनी पाठबळ दिल्याने गटाच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ तयार झाली आहे. गटातील सदस्यांना मसाला उत्पादनामध्ये वाढ करायची असल्याने बँकेचे कर्ज काढले. या कर्जातून आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यात येणार आहे. गटाच्या मसालानिर्मिती प्रकल्पाला टाटा ट्रस्ट, गुगल तसेच परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. प्रक्रिया उद्योगाच्या बरोबरीने गटातील महिलांचा ग्राम विकासामध्ये चांगला सहभाग आहे.  व्यवसायाचा विस्तार  गटाने तयार केलेल्या विविध मसाल्यांची चव ग्राहकांना आवडल्याचे हळूहळू मागणीत वाढ होत गेली. त्यामुळे मसालानिर्मिती उद्योग वाढविण्यासाठी गटाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून कर्ज घेतले. आर्थिक उपलब्धता झाल्याने गटाने पुण्यातून मसालानिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खरेदी केला. त्याचबरोबरीने आधुनिक वजनकाटा, मिक्‍सर खरेदी केला. कच्चा माल आणणे, निवडणे, धने भाजणे, मिरची आणि धने दळूण आणणे अशी सर्व कामे गटातील सदस्या स्वतः करतात.  विविध प्रकारचे मसाले पंचक्रोशीतील ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. वर्षाकाठी पाचशे किलोपर्यंत मसाल्यांची विक्री होते. मसालेनिर्मिती व्यवसायातून गटाची वार्षिक उलाढाल सुमारे अडीच लाखांवर गेली आहे. यातून गटाला साधारणपणे २० ते २५ टक्के नफा शिल्लक रहातो.

प्रदर्शनातून वाढविली विक्री 

  • दरवर्षी नायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंतीदिनी आयोजित प्रदर्शनात गटातर्फे मसाला विक्री.
  • सातारा शहरातील मानिनी जत्रा, वाई व लोणंदमधील कृषी प्रदर्शन, पुणे शहरातील भिमथडी जत्रेमध्ये गटातील महिला मसाल्याची विक्री करतात. 
  • उमेदच्या माध्यमातून नेरूळ येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात गटाच्या मसाल्यांना चांगली मागणी होती. या गटाची पहिल्या दहा गटात निवड झाल्याने दिल्ली येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात मसाला विक्री करण्याची संधी मिळाली. याठिकाणी गटाने मसाला विक्रीतून एक लाखांची उलाढाल केली. या प्रदर्शनात गटाला प्रथक क्रमांकाने गौरविण्यात आले. प्रदर्शनामुळे मानिनी ब्रॅन्डचे मसाले दिल्ली बाजारपेठेत पोचले आहेत. 
  • गटाची वैशिष्ट्ये 

  • दहा प्रकारच्या मसाल्यांच्या निर्मिती.
  • सर्व सदस्यांचा मसालानिर्मितीमध्ये सहभाग. 
  • ग्राहकांच्या मागणीनुसार दहा ग्रॅम ते १०० ग्रॅमपर्यंत मसाल्याचे पॅकिंग. 
  • दहा ग्रॅम मसाला १० रुपये, २५ ग्रॅम २० रुपये,५० ग्रॅम ४० रुपये आणि १०० ग्रॅम ८० रुपये या दराने विक्री.
  • ग्राहकांच्या मागणीनुसार विविध चवीच्या मसाल्यांची निर्मिती.
  • पर्यावरणपूरक कागदी पाऊचमध्ये पॅकिंग.
  • वर्षाकाठी ५०० किलोपर्यंत मसाल्यांची विक्री.
  • एकत्रित विचारातून उद्योगाची वाटचाल

      गटाच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योग सुरू करावा, असे सदस्यांच्या मनात होते. मात्र, कोणाकडे पुरेसे भांडवल नव्हते. सर्व महिलांनी विचार करून कुठलेही कर्ज न घेता उद्योग सुरू करावा, असा विचार मांडला. याला कुटुंबातील सदस्यांनी चांगली साथ दिली. आर्थिक मदत देखील केल्याने मसालानिर्मिती उद्योगाने गती घेतली आहे. येत्या काळात हळद पावडरनिर्मिती आणि सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादनावर गटाचा भर असणार आहे.

    - मीना फरांदे, ९६५७८१७६३३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com