नवले यांनी जोपासलेली सेंद्रिय चिकूबागेचा गोडवा

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील इंदोरी येथील पांडुरंग नवले हे सुमारे ६५ व्या वर्षीही न थकता मोठ्या उत्साहाने आपल्या १२ एकरांत विविध पिकांची प्रयोगशील शेती करीत आहेत. ऊस, बांधावर विविध फळबाग, दुग्धव्यवसाय यांच्या बरोबरीने त्यांनी एक एकरांत सेंद्रिय पद्धतीने चिकूची बाग अनेक वर्षांपासून जतन केली आहे. त्याचा गोडवा काही औरच असल्याने पंचक्रोशीत त्यांनी आपल्या चिकूफळांची वेगळी ओळख तयार केली आहे.
Mr. Navale's sapota orchard
Mr. Navale's sapota orchard

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील इंदोरी येथील पांडुरंग नवले हे सुमारे ६५ व्या वर्षीही न थकता मोठ्या उत्साहाने आपल्या १२ एकरांत विविध पिकांची प्रयोगशील शेती करीत आहेत. ऊस, बांधावर विविध फळबाग, दुग्धव्यवसाय यांच्या बरोबरीने त्यांनी एक एकरांत सेंद्रिय पद्धतीने चिकूची बाग अनेक वर्षांपासून जतन केली आहे. त्याचा गोडवा काही औरच असल्याने पंचक्रोशीत त्यांनी आपल्या चिकूफळांची वेगळी ओळख तयार केली आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा निसर्गाचे वरदान लाभलेला तालुका आहे. येथील अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. याच तालुक्यातील इंदोरी येथील पांडुरंग व ताराबाई हे नवले दांपत्य अत्यंत निष्ठेने उतार वयातही प्रयोगशील शेती करते आहे हे विशेष आहे. त्यांचा मुलगा ताराचंद आता मुख्यत्वे शेतीची जबाबदारी सांभाळतो. मात्र पांडूरंगतात्यांचा शेतीतील उत्साह वयाच्या ६५ व्या वर्षीही टिकून आहे. अनेक वर्षांच्या अनुभवातून, शेतीच्या अभ्यासातून त्यांनी शेतीची जोपासना केली आहे. चिकूची जोपासलेली बाग नवले यांच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एक एकरांवर जोपासलेली चिकूची बाग. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी ही बाग उभी केली आहे. सन १९९७ मध्ये शासनाच्या फळबाग योजनेतून क्रिकेट बॉल या वाणाची त्यांनी लागवड केली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कलने आणली. शेताजवळून प्रवरा नदी वाहते. लागवडीसाठी नदीजवळचे क्षेत्र निवडले. शास्त्रीय पद्धतीने आखणी, लागवड अंतर ठेवले. घेतलेल्या खड्ड्यांमध्ये मेच्या अखेरीस आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेणखत, पालापाचोळा व पोयटा माती यांचे मिश्रण भरले. बागेची नियमित काळजी घेतली. आजूबाजूला सर्वत्र उसाचे मळे फुलत असताना नवले मात्र आपल्या चिकूबागेकडे अधिक लक्ष देत होते. सेंद्रिय पध्दतीच्या चिकूचा गोडवा पांडूरंगतात्यांनी सेंद्रिय व शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. नावाप्रमाणेच आपले विचार आणि तत्त्व जपणारे तात्या लोकांना विषमुक्त आणि सात्त्विक आहार मिळावा या विचारांशी एकनिष्ठ आहेत. पांडुरंगाचे भक्त असणारे तात्या आपल्या शेती आणि मातीशी एकरूप झाले आहेत. गांडूळखत, शेणखत व जैविक खते यांच्यावर बाग पोसली जाते. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी बागेतील तण काढण्यात येते. रिंगण पद्धतीने भरपूर प्रमाणात शेणखत आणि बागेतील पानगळ गोळा करून हे अवशेष चरात भरण्यात येतात. मातीने झाकून टाकत पुढे पाऊस पडला की बागेला या जैविक वस्तुमानाचा म्हणजेच बायोमासचा पुरेपूर वापर होतो. दरवर्षी फेब्रुवारी ते मे याकाळात फळ विक्रीस यावे यादृष्टीने बहार नियोजन असते. नवले यांचा एक मुलगा बायफ या संस्थेत कार्यरत आहे. त्याचेही मार्गदर्शन मिळते. यंदाही जागेवर खपला चिकू एकरी दरवर्षी तीन ते साडेतीन टन उत्पादन त्यांना मिळते. आठवडे बाजारात ताराबाई चिक्कूची विक्री करतात. या चिकूची गोडी तमाम अकोलेकरांच्या जिभेवर सदैव रेंगाळत असते.त्याचबरोबर आकारही चांगला असतो. बाजारात ताराकाकूंना पाहिले की काही तासांतच सर्व चिक्कूंची विक्री होऊन जाते. तिथे किलोला ४० ते ५० रुपये दर मिळतो. सध्या सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. अर्थात आठवडी बाजारही बंद आहे. नवले यांच्या बागेत त्याचवेळी काढणी हंगाम सुरू होता. तरीही त्यांनी संकटातून मार्ग शोधलाच. यंदा एकरी चार टन उत्पादन मिळाले. बहुतांशी चिकूची विक्री घरूनच झाली. व्हॉटस ॲपचाही आधार झाला. छोट्या व्यावसायिकांनी कुणी पाच किलो, वीस किलो, ५० किलो या प्रमाणात चिकू खरेदी केले. ग्राहकांमध्येही या चिकूची लोकप्रियता असल्याने त्यांनीही जागेवरून माल नेला. किलोला ३० रुपये दर मिळाला. यंदाच्या संकटातही अशी विक्री झाल्याने पांडूरंगतात्या समाधानी आहेत. दरवर्षी वर्षाकाठी सुमारे त्यांना खर्च वजा जाता सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अकोले परिसरातील अनेक शेतकऱ्यांना नवले मार्गदर्शन करतात. बांधावर फळझाडे व अन्य शेती नवले यांनी बांधावर विविध फळबागांची सुमारे १०० झाडे लावली आहेत. त्यात आंबा, सीताफळ, जांभूळ, रामफळ आदींचा समावेश आहे. आंब्याचा बहार यंदा आला नाही. तरीही दरवर्षी हे पीक ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देते. सीताफळाचीही काही प्रमाणात विक्री होते. कोकण बहाडोली जांभळाचे उत्पादन आता सुरू व्हायचे आहे. सोयाबीन, चारा पिके यांच्यासह सुमारे सहा ते सात एकरांत ऊसही असतो. मागील वर्षी एकरी १०५ टन उत्पादन घेण्यात नवले यशस्वी झाले आहेत. दरवर्षी त्यांना ७० ते ८० टनांपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. नदी व्यतिरिक्त विहिरीचा स्रोत असल्याने पाण्याची कमतरता भासत नाही. यंदा आले पीक घेण्याचा विचार आहे. जोडीला दुग्धव्यवसाय शेतीसोबत संकरित गायचे पालन करून त्यातून आर्थिक नफा वाढवण्याचा प्रयत्न नवले यांनी केला आहे. त्यांच्याकडे सुमारे १० ते १२ गायी आहेत. त्यांचे शेण शेतीसाठी उपलब्ध होते. दररोजचे २५ ते २० लीटर दूध संकलित होते. गावातीलच स्थानिक डेअरीला ते दिले जाते. नवले यांनी शेतीचा व्यासंग वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. ॲग्रोवनचे ते नियमित वाचक आहेत. त्यातील अनेक कात्रणांचा संग्रह देखील त्यांनी केला आहे. संपर्क- पांडुरंग नवले-९४०४६९६४०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com