नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी केला दुग्ध व्यवसाय

शंतनू पाटील यांचे दूध प्रक्रिया केंद्र.
शंतनू पाटील यांचे दूध प्रक्रिया केंद्र.

लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील यांनी बाजारपेठेचा अभ्यास करत डेअरी उद्योगाचे वेगळे मॉडेल उभे केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेत त्यांनी दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत स्वमालकीची यंत्रणा उभी केली. यामुळे दूध तसेच प्रक्रिया उत्पादनांची गुणवत्ता वाढली, त्याच बरोबरीने पशुपालकांच्या आर्थिक नफ्यात वाढ झाली आहे. 

लासलगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील हे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीला होते. मात्र, ग्रामीण भागात स्वतःचा शेती आधारित उद्योग उभारण्याच्यादृष्टीने त्यांनी नोकरी सोडली. परिसरातील शेतकरी आणि व्यावसायिकांशी चर्चा करत पाटील यांनी डेअरी उद्योगाची निवड केली. पारंपरिक पद्धतीने व्यवसायाचे नियोजन न करता माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत आधुनिकता आणली. या माध्यमातून ४० तरुणांना प्रत्यक्ष आणि २००० दूध उत्पादकांना अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. शंतनू पाटील हे दोन वर्ष बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत नोकरी करत होते. पगारही चांगला होता; परंतु मनात ग्रामीण भागाची ओढ होती. घरची वीस एकर शेती असल्याने गावामध्येच शेती पूरक उद्योग उभारण्याचा ध्यास त्यांनी घेतला. साधारणपणे २०१५ मध्ये कंपनीमधील नोकरी सोडून फलोत्पादन, संरक्षित शेती आणि दुग्ध व्यवसायाबाबत त्यांनी तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. सर्वेक्षण करून सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. त्यानुसार येथे डेअरी उद्योगाची निवड केली. डेअरी उद्योगाची सुरवात  शंतनू पाटील यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये लासलगावमध्ये ‘कान्हा डेअरी इंडस्ट्री’ या नावाने व्यवसायाला सुरवात झाली. पहिल्या दिवशी दोन लिटर दुधाचे संकलन करून कामकाजाला सुरवात झाली. त्यांनी परिसरातील पशुपालकांच्या गरज लक्षात घेतल्या. अजूनही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने डेअरीचे कामकाज होत असल्याने पशुपालकांना मिळणारा मोबदला आणि व्यवहारात पारदर्शकता कुठेच नाही. यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यापासूनच बदल केला. यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव उपयोगी पडला. दूध संकलन प्रक्रियेतून पशुपालकांना योग्य दर आणि ग्राहकांना योग्य गुणवत्तेचे दूध उपलब्ध होण्यासाठी स्वयंचलित दूध संकलन यंत्रणा कार्यान्वित केली. यामुळे कामाकाजात गती आली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर  लासलगाव हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. पाटील यांच्या डेअरीची निफाड, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तेरा दूध संकलन केंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातून दोन हजार पशुपालक जोडले गेले आहेत. येत्या काळात नवीन गावांमध्ये संकलन केंद्रांच्या उभारणीचे नियोजन सुरू आहे. योग्य नियोजनामुळे तीन तालुक्यांमध्ये दुधदरामध्ये स्पर्धा निर्माण झाली.

  •  गावातील केंद्रावर स्वयंचलित दूध संकलन यंत्रणा. त्यामुळे पारंपरिक दूध संकलनात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा.
  • स्वयंचलित संकलन यंत्रणेमुळे दूध संकलन करणाऱ्या घटकांना कुठल्याही प्रकारची फेरफार करता येत नाही. त्यामुळे पशुपालकाला दुधाच्या गुणवत्तेनुसार योग्य दराची शाश्वती. सध्या फॅटनुसार गाईचे दूध प्रतिलिटर २६ ते ३० रुपये आणि म्हशीचे दूध ३७ ते ३८ रुपयांनी खरेदी.
  • स्वयंचलित यंत्रणेद्वारे दुधाचे नमुने अचूक तपासले जातात. यासह पशुपालकांना दैनंदिन दर, दुधाच्या नोंदी मोबाईलवर मिळतात. दुधविक्रीचे तपशील दिले जातात. त्यामुळे दूध उत्पादन व विक्रीबद्दल सर्वांना माहितीची उपलब्धता. 
  • संकलन प्रणाली पशुपालकांच्या बँक खात्याशी जोडल्याने दररोज डेअरीमध्ये जमा केलेले दूध, मिळालेल्या दराची थेट माहिती. 
  • पशुपालकाच्या बॅंक खात्यात दुधाचे पैसे जमा होतात. त्यामुळे आर्थिक सुसूत्रता.
  • डेअरीच्या माध्यमातून दररोज सात हजार लिटर दुधाचे संकलन. विविध ठिकाणी प्रतिलिटर होलसेल दर ३५ रुपये आणि रिटेलचा दर ४० रुपये, बाजारपेठेनुसार दरात बदल.
  • आर्थिक व्यवहाराची शिस्त  ग्रामीण भागातील पशुपालकांना मस्टर भरल्यानंतर दर आठवड्याला विकलेल्या दुधाप्रमाणे रोख स्वरूपात पैसे दिले जातात. मात्र, विकलेल्या पैशांची नोंद व त्याची पत निर्माण होईल अशी पद्धत नाही. पैशांचा वापर करताना आणि बिलापोटी स्वीकारताना त्यात आर्थिक शिस्त नसते. यासाठी शंतनू पाटील यांनी प्रत्येक दूध उत्पादकाला बँक खाते उघडणे अनिवार्य केले. यामुळे डेअरीमध्ये दिलेल्या दुधाचे पैसे मस्टर भरल्यानंतर त्याच दिवशी थेट बँक खात्यात जमा केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पैशांची सुरक्षितता वाढली. व्यवहारांच्या नोंदी होऊ लागल्याने पशुपालकांची पत तयार झाली आहे. शहरांमध्ये मिळविली बाजारपेठ  दररोज सात हजार लिटर दुधाचे संकलन करून त्यावर शीतकरण प्रक्रिया केली जाते. मागणीनुसार विक्री केली जाते. व्यवसायाचा विस्तार करताना शंतनू पाटील यांनी अधिक नफ्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन वर्षांच्या व्यावसायिक वाटचालीत त्यांनी विक्री व्यवस्था सक्षमपणे उभी केली. नाशिक, पुणे शहरांतील कंपन्यांच्या कॅंन्टीनसाठी दूध तसेच प्रक्रिया पदार्थांचा पुरवठा केला जातो.    कुशल मनुष्यबळाची साथ   पाटील यांच्या डेअरी उद्योगात दूध संकलन, दूध प्रक्रिया व विक्रीसाठी एकूण ४० जणांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये समूहातील सहकारी अमोल खैरनार यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. त्याच ताकदीवर संकलन, वाहतूक, शितकरण प्रक्रिया, दूधपुरवठा, हिशोब, दुग्धप्रक्रिया आणि विक्री ही सर्व कामे नियोजनपूर्वक होतात. दृष्टिकोन असेल तर वेगळेपणाने काम उभे राहू शकते हे शंतनू पाटील यांनी दाखवून दिले आहे. शंतनू पाटील पशुपालन आणि डेअरी व्यवसायामध्ये आणलेली आधुनिकता लक्षात घेऊन विविध संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्याचबरोबरीने पशुसंवर्धन विभागाने देखील त्यांना विशेष पुरस्काराने गौरविले आहे.

    दुग्धप्रक्रिया उद्योगाला सुरवात   परिसरातील संकलित होणारे दूध उत्तम दर्जाचे असल्याने २०१८ मध्ये  शंतनू पाटील यांनी दूध प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. प्रक्रिया उत्पादनांच्या विक्रीसाठी व्हाईट डिलाईट प्रा.लि ही संलग्न कंपनी स्थापन करून विक्री व्यवस्था उभी केली.  प्रक्रिया क्षमता 

  • पॅकिंग ः  ३००० लिटर दूध प्रतितास
  • प्रक्रिया ः १००० किलो प्रतिदिवस
  • प्रक्रियायुक्त उत्पादने : पॅकिंग दूध, पनीर, दही, ताक, तूप, लस्सी, बटर, क्रीम.
  • प्रस्तावित उत्पादने : श्रीखंड, आम्रखंड
  • असे आहे डेअरीचे नियोजन  

  •   दूध संकलनात पारदर्शकता. गुणवत्तापूर्ण दूध संकलन.
  •   दुधाच्या दर्जाप्रमाणे दर, त्यामुळे पशुपालकांना आर्थिक लाभ.
  •   माहिती तंत्रज्ञानाचा वापर, त्यामुळे व्यवसायाला आर्थिक शिस्त. 
  •   पशुपालकांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन.
  •   पशुपालकांची आर्थिक पत वाढली.
  •   प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीतून आर्थिक उलाढालवाढीचे नियोजन.
  • पशुपालकांसाठी उपक्रम 

       वर्षभर पशू व्यवस्थापन, खाद्य नियोजन, आरोग्य, दूध गुणवत्तेबाबत विविध तज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन.   दुग्ध व्यवसायातील यशस्वी पशुपालक तसेच प्रक्रिया उद्योगांच्या ठिकाणी अभ्यास दौऱ्याचे नियोजन.   जमलेल्या नफ्यातून होतकरू पशुपालकाला ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक पतपुरवठा.   डेअरीशी जोडलेल्या पशुपालकांच्या वर्षभर नियोजनाचा आढावा व दुधाची गुणवत्ता लक्षात घेऊन आदर्श दूध उत्पादकांचा गौरव.

    - शंतनू पाटील, ९८८१५१९८५१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com