रेशीम चॉकी व्यवसाय ठरला किफायतशीर

रेशीम कीटक संगोपनात रमलेले सिद्धेश्‍वर बिचेवार.
रेशीम कीटक संगोपनात रमलेले सिद्धेश्‍वर बिचेवार.

यशस्वी लोक पारंपरिक व्यवसाय वेगळ्या पद्धतीने करतात, म्हणूनच ते यशस्वी होतात. विडूळ (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील सिद्धेश्‍वर रामचंद्र बिचेवार यांनीदेखील असा वेगळा विचार केला. अल्पभूधारक असलेल्या सिद्धेश्‍वर बिचेवार यांनी रेशीम कोष उत्पादनाऐवजी अंडीपुंजापासून चॉकीनिर्मिती आणि विक्रीवर भर दिला. हाच व्यवसाय त्यांच्यासाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत ठरला आहे. 

उमरखेड तालुक्‍यातील ढाणकी शिवारात २०१३ मध्ये काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला सुरवात केली होती. त्या ठिकाणी रेशीम संचालनालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भागात नवा प्रयोग असल्याने उत्सुकतेपोटी सिद्धेश्‍वर बिचेवार कार्यशाळेमध्ये सहभागी झाले. अकोली येथील विठ्ठल वाघमारे, ढाणकी येथील दत्ता सुरोशे यांच्या तुती लागवड क्षेत्राला भेट दिली. त्यांच्याकडून रेशीम शेतीमधील बारकावे जाणून घेतले. पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा रेशीम शेतीचा पर्याय फायदेशीर असल्याचे लक्षात आल्यानंतर जून २०१४ मध्ये तुती लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्याच वर्षी धाडस करीत बिचेवार यांनी स्वतःच्या अडीच एकरांवर तुती लागवड केली. त्याचवर्षी वडिलांकडील तीन एकर आणि त्यानंतर २०१५ मध्ये लहान भाऊ रामेश्वर यांच्या अडीच एकरांतदेखील तुती लागवड केली. अशा पद्धतीने बिचेवार यांनी आठ एकर क्षेत्र तुती लागवडीखाली आणले.  कोष विक्रीला सुरवात    रेशीम शेतीबाबत सिद्धेश्‍वर बिचेवार म्हणाले, की उमरखेड तालुक्‍यातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच माझा कोष विक्रीवर सुरवातीला भर होता. शंभर अंडीपुंजापासून ८० ते ८५ किलो कोष उत्पादन व्हायचे. उत्पादित कोषांची विक्री रामनगर (कर्नाटक), सिकंदराबाद (तेलंगण) येथील बाजारात इतर शेतकऱ्यांसोबत मी करायचो. शंभर अंडीपुंजावर सरासरी संपूर्ण व्यवस्थापन आणि विक्रीपर्यंत वाहतूक खर्चासह सात हजार रुपये खर्च व्हायचा. आम्हाला कोषाला सरासरी प्रतिकिलो ३२५ रुपये दर मिळायचा. साधारणपणे २६ हजार रुपयांचे उत्पन्न कोष विक्रीतून मिळायचे. त्यातून सात हजार रुपयांचा खर्च वजा जाता १९ हजार रुपयांचा निव्वळ नफा होत होता. मी एकाचवेळी ५०० अंडीपुंजांचे व्यवस्थापन करीत होतो, त्यामुळे रेशीम शेती मला फायदेशीर ठरू लागली.    चॉकी व्यवस्थापनाबाबत सिद्धेश्‍वर बिचेवार म्हणाले, की शंभर अंडीपुंजांपासून ६० हजार रेशीम अळ्या मिळतात. यातील सरासरी पाच ते दहा टक्‍के बाद झाल्यास ५० ते ५५ हजार अळ्या मिळतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. संगोपन तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्यास १०० अंडीपुंजांपासून ८० ते ८५ किलो कोष उत्पादन होते. पूर्वी अंड्यांपासून अळ्या मिळविण्याचे तांत्रिक काम शेतकऱ्यांद्वारे केले जात होते. ट्रे मध्ये अंडी टाकून त्यांना काळे कापड किंवा विशिष्ट काळ्या रंगाच्या कागदात गुंडाळून ४८ तास ठेवावे लागत होते. त्यानंतर ट्रेच्या वरील भागात हॅचिंग जाळी बांधली जाते. त्यावर तुतीचा पाला बारीक करून टाकल्यानंतर तो खाण्यासाठी अळ्या वरील भागात येतात. त्यामुळे फुटलेली अंड्यांची टरफले खालील बाजूस राहतात. जाळी उचलून ती दुसऱ्या ट्रेमध्ये ठेवली जाते. आठ ते नऊ दिवस चॉकीरूमच्या ट्रेमध्ये अळ्यांना ठेवले जाते. ही प्रक्रिया अत्यंत क्‍लिष्ट आणि तांत्रिक असल्याने यासाठी प्रशिक्षित व्यक्‍तीची गरज राहते. या तांत्रिक आणि क्‍लिष्ट प्रक्रियेला शेतकरी कंटाळतात आणि रेशीम शेतीपासून फारकत घेतात किंवा अर्ध्यावर हा व्यवसाय सोडतात.  निवडली वेगळी वाट  सिद्धेश्‍वर बिचेवार यांच्याकडून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अंड्यांतून अळ्या काढून त्यांचे नऊ दिवस संगोपन करून थेट पुरवठा केला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचू लागला. बॅच काढल्यानंतर आठ ते नऊ दिवसांचा अतिरिक्‍त वेळ थेट अळ्यांच्या पुरवठ्यामुळे मिळाल्याने शेतकरी या काळात शेड स्वच्छता व निर्जंतुकीकरण करतात.  याबाबत बिचेवार म्हणाले, की अंडीपुंजांच्या पुरवठ्याकरिता बेंगळुरू येथील केंद्रीय रेशीम बोर्ड हा एकमेव पर्याय महाराष्ट्रातील रेशीम शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. अंड्यांचे संगोपन नियंत्रित वातावरणात होते. बेंगळुरूवरून अंडीपुंजांचा पुरवठा करताना वाहतुकीमध्ये तापमानात मोठे बदल होत असल्याने अंडी खराब होण्याचे प्रमाण अधिक राहते, त्यामुळे मी यवतमाळ येथील जिल्हा रेशीम कार्यालयात अंडीपुंज खरेदीसाठी नोंदणी करतो. त्याच ठिकाणी ठरलेल्या रकमेचा भरणा केला जातो. नंतर बेंगळुरू येथून थेट अंडीपुंज खरेदी करून स्वतःसाठी आणि रेशीम कार्यालयामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आणतो. शंभर अंडीपुंज ७०० रुपयांना मिळतात. बेंगळुरू ते गावापर्यंत वाहतुकीसाठी तीन हजार रुपयांचा खर्च होत असला तरी त्याची आकारणी शेतकऱ्यांकडून केली जात नाही. मी एकावेळी दहा हजार अंडीपुंज वातानुकूलित बसमधून आणतो. त्यानंतर नऊ दिवसांत चॉकी तयार केली जाते. या कामामध्ये माझी पत्नी देवयानी, मुलगा देवांश यांचे सहकार्य होते. अनुभवातून मला यामध्ये प्रावीण्य मिळाले आहे. 

चॉकीतून गाठला सक्षमतेचा पल्ला   सिद्धेश्‍वर बिचेवार हे शंभर अंडीपुंजांच्या माध्यमातून चॉकी करण्यासाठी १३०० रुपये शेतकऱ्यांकडून घेतात.  शेतकऱ्यांना अनुदानातून अंडीपुंज मिळतात. गेल्यावर्षी बिचेवार यांनी जुलै २०१८ ते मार्च २०१९ कालावधीत ९२ हजार अंडीपुंजांपासून चॉकी तयार करून विक्री केली. या प्रक्रियेत १०० अंडीपुंजांपासून चॉकी तयार करण्यासाठी सरासरी ७०० रुपये खर्च होतो. या प्रक्रियेसाठी साधारणतः २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० ते ९० टक्‍के आर्द्रतेची गरज असते. यासाठी बिचेवार यांनी वातानुकूलित यंत्रणा बसविलेली आहे. यासाठी ह्युमिडीटी फायर एसीची गरज असते.   या वर्षी अडीच लाख चॉकीचा पल्ला  सिद्धेश्‍वर बिचेवार यांनी एप्रिल २०१९ ते ऑगस्ट १९ या कालावधीत ६२ हजार अंडीपुंजांच्या चॉकीचे वितरण केले. यापुढील काळात १ लाख ९० हजारच्या अंडीपुंजांच्या चॉकीच्या वितरणाचे त्यांचे नियोजन आहे. त्यांच्या चॉकी सेंटरला जुलै २०१८ मध्ये बेंगळुरू येथील केंद्रीय रेशीम बोर्ड तसेच रेशीम संचालनालयाने मान्यता दिली, त्यामुळे येत्या काळात चॉकी सेंटरच्या आधुनिकीकरणासाठी अनुदान मिळण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. या अनुदानातून नव्याने चॉकी सेंटरसाठी इमारत आणि हायटेक तंत्रज्ञानातून चॉकी उत्पादनाचे नियोजन केले आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत हा पर्याय फायदेशीर ठरला असल्याने यापुढील काळात रेशीम शेतीमधील नवीन तंत्रज्ञानावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. 

रेशीम शेतीसाठी गौरव   रेशीम क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्रीय रेशीम बोर्डाकडून सिद्धेश्‍वर बिचेवार यांना मार्च २०१५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. याचबरोबरीने ईश्‍वर प्रतिष्ठान, दिग्रस (यवतमाळ), ढाणकी येथील एका संस्थेने त्यांचा सन्मान केला आहे. अमरावती येथे रेशीम संचालनालयाच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षणातही त्यांचा गौरव करण्यात आला. या वाटचालीत साहाय्यक संचालक महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी पंडित चौगुले, वरिष्ठ तांत्रिक साहाय्यक मुकुंद नरवाडे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते.   

- सिद्धेश्‍वर बिचेवार, ७५१७४९१४९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com