शेलगाव बाजारने मिळवला ‘स्मार्ट ग्राम’ चा किताब

बुलडाणा जिल्ह्यातील शेलगाव बाजार गावाने अलीकडील वर्षांत कमालीचा कायापालट केला आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम, आरोग्य विषयक, स्वच्छता, रोजगार निर्मिती आदी विषयांवर आदर्श कामे उभारली आहेत. ग्रामपंचायतीचा पुढाकार, त्याला मिळणारा लोकसहभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे गाव जिल्ह्यात अग्रेसर बनले आहे.
village sarpanch While accepting the award from the Collector
village sarpanch While accepting the award from the Collector

बुलडाणा जिल्ह्यातील शेलगाव बाजार गावाने अलीकडील वर्षांत कमालीचा कायापालट केला आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम, आरोग्य विषयक, स्वच्छता, रोजगार निर्मिती आदी विषयांवर आदर्श कामे उभारली आहेत. ग्रामपंचायतीचा पुढाकार, त्याला मिळणारा लोकसहभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे गाव जिल्ह्यात अग्रेसर बनले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मोताळा-पिंपळगाव देवी मार्गावर शेलगाव बाजार (ता. मोताळा) हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव असून दहा ते पंधरा खेड्यांचा व्यवहार येथून चालतो. आज या गावाने आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार केली आहे. सन १९३० साली गावात विद्यालय सुरू झाले. आज गावातील अनेक जण नोकरी, उद्योगासाठी अन्य ठिकाणी, काही परदेशांत तर काही जण सैन्यात आहेत. तालुक्यातील सुशिक्षितांचे पहिले गाव म्हणूनही शेलगावची ओळख आहे. शेतीत शेलगाव बाजार शेतशिवार सुमारे ५० टक्क्यांवर हंगामी ओलिताखाली आहे. कापूस, सोयाबीन, मका ही प्रमुख पिके आहेत. सिंचनासाठी ठिबकचा अधिक वापर होतो. बचत गटातील महिलांना सामूहिक शेतीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्यांना अळिंबी प्रकल्प उभारणीसह सहकार्य करण्यात येते. पंधरा ते २० शेततळी आहेत. शिवारात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला दरवर्षी ‘गेट’ बसविण्यासाठी नागरिक स्वयंफुर्तीने खर्च करतात. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करीत चार ठिकाणी नाल्यांवर बंधारे बांधले आहेत. त्यातून पाणी पातळीत वाढ झाली आहे. शेलगाव ते दाभाडी या दोन किलोमीटर रस्त्याचे खडीकरण झाले आहे. शेलगाव ते जहॉंगीरपूर रस्त्याचे डांबरीकरण झाले. अजून दोन पांदण रस्त्यांचे काम लवकरच होणार आहे. सक्षम दूग्ध व्यवसाय गावाने दुग्ध हा देखील सक्षम व्यवसाय म्हणून जोपासला आहे. दररोज शेकडो लीटर दूध गावाबाहेर जाते. घरोघरी जर्सी गायी व म्हशी पाळल्या आहेत. बचत गटातील काही शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून म्हशींचे वितरण करण्यात आले. तीन डेअरी दूध संकलनाचे काम करतात. जनावरांसाठी आयएसओ प्रमाणपत्र धारक पशुवैद्यक दवाखाना आहे. अझोला युनिटही तयार करण्यात आले आहे. रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून ग्रामपंचायतीने व्यापारी गाळे उभारले आहेत. गावातील वैशिष्ट्यपूर्ण कामे

  • शुध्द पाणी पुरवठा, स्वच्छतेवर भर
  • पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लॅंट. त्यासाठी एटीएम कार्डचा वापर
  • महिलांसाठी सॅनिटरी पॅड यंत्राची सुविधा
  • गप्पी मासे पैदास केंद्र
  • ग्रामपंचायतीकडून धुरळणी यंत्राचा वापर. त्यामुळे गावात कोणत्याही साथीच्या आजाराची लागण पाच ते सात वर्षांत नोंदवलेली नाही.
  • नियमित साफसफाई. चौकाचौकांत कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या घंटागाडीद्वारे नियमित कचरा संकलन व विल्हेवाट.
  • सार्वजनिक ठिकाणी शौचालय व मुतारी व्यवस्था
  • आठवडी बाजार भरत असल्याने बाजारात दुकाने उभारण्यासाठी व्यवस्थित टीनशेड व सिमेंट ओट्यांची व्यवस्था
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे. त्यातून गावातील हालचाली व प्रशासनास देखरेख ठेवण्यास मदत
  • ग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भव्य जागा. वीज, पाणी यांच्यासह सभामंडपाचेही व्यवस्थित बांधकाम करून जनतेच्या सोयीसाठी ते उपलब्ध
  • गावविकासाचा मार्ग सध्या लोकनियुक्त सरपंच सरला अमित खर्चे अडीच वर्षांपासून चालवत आहेत.
  • नियोजित कामे

  • घनकचरा व्यवस्थापन
  • सिमेंट कॉंक्रीटीकरण
  • शासकीय इमारतीवर सौर पॅनल उभारणी
  • व्यवसाय प्रशिक्षण, गाव परिसर सुशोभीकरण
  • ऑक्सिजन पार्क निर्मिती
  • विद्यार्थ्यांसाठी सुविधा शाळा ई-लर्निंग अभ्यासक्रम व डिजिटल सेवा प्राप्त आहे. त्यामुळे मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे. अंगणवाडीत मुलांना १४ व्या वित्त आयोगातून खेळणी साहित्य देण्यात आले आहे. दोन एकरांत मोठे क्रीडांगण तयार केले आहे. गावातील सुसज्ज वाचनालयाचाही विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतो. कोरोनाच्या काळात जागरूकता कोरोनाच्या संकटात शेलगाव ग्रामपंचायत आणि गावकरी अधिक सतर्क आहेत. घरोघरी जनजागृती करताना ग्रामपंचायतीद्वारे साबण, सॅनिटायझर, मास्क देण्यात आले. नियमितपणे निर्जंतुकीकरण तसेच बॅंक परिसरात खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने दोन वेळा फवारणी होते. दुकानदारांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याबाबत अंमलबजावणी केली जाते. अपंगांना एक महिन्याचे मोफत रेशन वाटप केले आहे. पुरस्कारांचा वर्षाव

  • जिल्हा स्मार्ट ग्रामसाठी ५० लाख व निर्मलग्राम, ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती अशी एकूण ६० लाखांवर रकमेची बक्षीसे
  • मोताळा पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतीला सातत्याने प्रोत्साहन
  • पारंपारिक ऊर्जा स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर म्हणून चौकात सौर पथदिवे बसविले आहेत. ग्रामस्थांना ‘बायोगॅस’चे महत्त्व पटवून देत १७ कुटुंबांना त्याचे युनीटस उपलब्ध केले आहेत. त्याद्वारे उत्कृष्ट शेणखताची निर्मितीही होत आहे. प्रतिक्रिया तालुक्यात शेलगाव ग्रामपंचायतीचे काम पथदर्शी आहे. युवकांसाठी व्यायामशाळा, वाचनालय, अभ्यासिका सुविधा आहेत. नागरिकांनी एकजुटीने गावाचा विकास साधला आहे. - दीपक माडीवाले, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, मोताळा

    गावकऱ्यांनी मला थेट निवडून सरपंचपदाचा मान दिला. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत विकासकामे सुरु ठेवली आहेत. गाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात झळकावे यासाठी आम्ही गावकरी प्रयत्नशील आहोत. - सौ. सरला अमित खर्चे, ८२७५२३३६३७ सरपंच, शेलगाव बाजार

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com