प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे मूल्यवर्धन

soyabean process
soyabean process

शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील रेखा सुनील मुळे यांनी सोयाबीन प्रक्रियेवर भर दिला. पारंपरिक पदार्थ करण्यापेक्षा भाजलेले (रोस्टेड) सोयाबीन, त्याचबरोबरीने चॉकलेट, आंबा, अननस, मधाचे आवरण असलेल्या सोयाबीनची निर्मिती त्या करतात. पुणे, मुंबई आणि गोवा राज्यातदेखील त्यांच्या उत्पादनांना वाढती मागणी आहे.

मुळे कुटुंबीयांची जवळगाव (जि. बीड) या ठिकाणी शेती आहे. परंतू नोकरीच्या निमित्ताने सुनील मुळे हे कुटुंबासह पिंपरी-चिंचवड परिसरात राहतात. त्यांच्या पत्नी रेखा मुळे यांना प्रक्रियेची आवड असल्याने बाजारपेठेची मागणी आणि स्वतःच्या शेतात उत्पादित होणारे सोयाबीन लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योगाचे नियोजन केले. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोयाबीनवर प्रक्रिया करून दूध, पनीर, टोफो, तेल निर्मिती केली जाते. परंतू रेखा मुळे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सोयाबीन प्रक्रियेमध्ये वेगळेपण जपले आहे.

सोयाबीन प्रक्रियेला सुरवात  मुळे यांच्या मुलीची तब्येत सुधारण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता होती. डॉक्टरांनी तिला सोयाबीनचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला. पहिल्यांदा मुळे यांनी सोयाबीन घरच्या घरी भाजून मुलीला खायला दिले, ते आवडले. मात्र त्यात थोडासा कडवटपणा राहात होता. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील मुळे यांनी सोयाबीन चांगले भाजण्यासाठी छोटे उपकरण तयार केले. त्यात सोयाबीन चांगले भाजले गेले. हे भाजलेले सोयाबीन मुले आवडीने खाऊ लागली. शेजाऱ्यांच्या मुलांकडूनही भाजलेल्या सोयाबीनची मागणी होऊ लागली. त्यामुळे रेखा मुळे यांनी सोयाबीनपासून अजून काही बनवता येईल का, याचा शोध घेतला. त्यानुसार मुळे यांनी नारायणगाव (जि.पुणे) येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये सोयाबीन प्रक्रियेबाबत प्रशिक्षणदेखील घेतले. 

बनविले सोयाबीन भाजणी यंत्र  रेखा मुळे यांचे बंधू सतीश सुतार हे कृषी पदवीधर आहेत. भाजण्यासाठी कोणत्या प्रतवारीचे सोयाबीन वापरावे याची माहिती सुतार यांनी रेखाताईंना दिली. सोयबीनमध्ये आर्द्रता कमी आणि तेलाचे प्रमाण अधिक असल्याने त्याची सहजपणे लाही बनत नाही. हे लक्षात घेऊन सुनील मुळे यांनी सोयाबीन भाजणी यंत्रासाठी संशोधन सुरू केले. सोयाबीन जास्त भाजले तर जळत होते, हे लक्षात घेऊन त्यांनी विविध तापमानात सोयाबीन भाजले. त्याची चव आणि गुणवत्तेच्या चाचण्या घेतल्या. सोयाबीनला कुरकुरीतपणा येण्यासाठी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या उष्णतेचे चक्र निश्चित केले. या प्रयोगातून सुनील मुळे यांनी एक लाख ८० हजार रुपये खर्चून अर्धा किलो सोयाबीन भाजता येईल असे यंत्र तयार झाले. त्यात सुधारणा करत जर्मन तंत्रज्ञान वापरून सध्याचे प्रति तास दहा किलो क्षमतेचे यंत्र विकसित केले. या यंत्रातील सोयाबीन भाजण्याचा प्रोग्रॅम आणि प्रक्रियेची वेळ ठरविण्यात आली. या यंत्रणेचे त्यांनी पेटंट घेतले आहे. 

अभिप्रायातून ठरविली ‘चव’  प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पदार्थांची निर्मिती करण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात विविध प्रक्रिया करून रेखाताईंनी भाजलेले सोयाबीन मित्र परिवारातील सदस्यांना दिले. त्यांच्याकडून चव आणि गुणवत्तेबाबत अभिप्राय जाणून घेतले. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या स्वादाचे कोटिंग केलेले सोयाबीन देण्यात आले. यामध्ये रेखाताईंनी क्लासिक सॉल्टेड, टॅंगी टोमॅटो, क्रंची मसाला, लेमन ॲण्ड मिंट अशा विविध चवींची निवड केली. लहान मुलांचा विचार करून भाजलेल्या सोयाबीनला चॉकलेटचे कोटिंगदेखील केले. कोटिंगसाठी पुण्यातील एका चॉकलेट उत्पादक कंपनीची मदत घेण्यात आली. भाजलेल्या सोयाबीनवर अननस, डार्क चॉकलेट, आंबा, मध कोटिंग करण्यात येते, मात्र आकार सोयाबीन सारखाच ठेवण्यात आला आहे. या दोन्ही उत्पादनांचे पेटंट रेखाताईंनी घेतले आहे.        उत्पादनांना बाजारपेठेत वेगळी ओळख मिळण्यासाठी ‘गोल्डन बीन्स’ हा ब्रॅंड तयार केला. या उत्पादनांची पुणे, मुंबईतील मोठ्या मॉल्समध्ये विक्री होते. सोयाबीनमध्ये असलेल्या प्रथिनांच्या प्रमाणामुळे शाकाहारी आहार घेणाऱ्यांकडून सोयाबीन पदार्थांना चांगली मागणी आहे.

प्रक्रिया उद्योगाला मिळाली गती  सोयाबीन प्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणा तयार झाल्यानंतर मुळे दांपत्याने ‘एस आर फुड्स’ या नावाने गृह उद्योग सुरू केला. या प्रक्रिया उद्योगाची सर्व जबाबदारी रेखाताईंनी स्वीकारली. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी जागा, मनुष्यबळ, पॅकेजिंग यंत्रणा, ब्रॅंडिंग, विक्री व्यवस्था उभारण्यासाठी १५ ते २० लाख भांडवलाची आवश्यकता होती. रेखाताईंना पंतप्रधान रोजगार योजनेतून महिला सक्षमीकरणासाठीचे २५ टक्के भांडवल मिळाले. सोयाबीन प्रक्रिया तंत्र शिकण्यासाठी रेखा मुळे यांनी तळेगाव दाभाडे येथे दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. सध्या उद्योगात आठ महिला कामगार आणि एक पुरुष कामगार काम करतो. दरमहा ५०० किलो सोयाबीन प्रक्रियेचा टप्पा त्यांनी गाठला आहे. 

ग्राहकांच्या मागणीनुसार पॅकिंग  सर्वसामान्यांना खिशाला परवडेल असे पॅकिंग करण्यावर रेखाताईंचा भर आहे. भाजलेल्या सोयाबीनचे १५ ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅमचे पॅकिंग केले जाते. तर चॉकलेट सोयाबीनचे ६५ ग्रॅम, १३० ग्रॅम, २०० ग्रॅमचे पॅकिंग केले जाते. बाजारपेठेत वेगळी ओळख तयार करण्यासाठी रेखाताईंनी आकर्षक पॅकिंग केले आहे. प्रक्रिया उद्योगातील सर्व खर्चाचा विचार करून रेखाताई भाजलेल्या सोयाबीनची ६०० रुपये किलो तर सोयाबीन चॉकलेटची ८०० रुपये किलो दराने विक्री करतात. वातावरणातील आर्द्रतेचा उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी भाजलेले सोयाबीन हवाबंद डब्यात ठेवले जाते. तसेच झीप पाऊच पॅकिंगचा वापर केला जातो.    उत्पादनांचे विपणन आणि विक्रीची जबाबदारी राज मंत्री यांच्याकडे आहे. पुणे, मुंबई तसेच गोवा राज्यातील माहिती तंत्रज्ञान कंपनी परिसर, बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन तसेच मॉलमध्येही रेखाताईंची उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. निर्यातीच्या दृष्टीने रेखाताईंनी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगामध्ये दरमहा एक लाख रुपयांची उलाढाल होते.

प्रदर्शनात सादरीकरण रेखा मुळे यांना सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प सुरू करताना लागणारी माहिती नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राकडून मिळाली. या केंद्रातील अन्न प्रक्रिया विभागातील तज्ज्ञ निवेदिता डावखर-शेटे यांचे मार्गदर्शन रेखाताईंना मिळाले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रदर्शनात रेखाताईंनी सोयाबीन उत्पादनाचे सादरीकरण केले होते.

-  रेखा मुळे, ९९२२४३४८२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com