आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळख

उत्पादनांचे पॅकिंग करताना सुमन जाचक आणि महिला सहकारी.
उत्पादनांचे पॅकिंग करताना सुमन जाचक आणि महिला सहकारी.

जाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन कुशावर्त जाचक या वयाच्या ७६ व्या वर्षीही आवळा प्रक्रिया उद्योगात रमलेल्या आहेत. जाचक कुटुंबीयांनी घरच्या शेतीमध्ये आवळा लागवड लागवड केली. उत्पादन सुरू झाल्यावर घरगुती स्तरावर प्रक्रिया उद्योगही सुरू केला. बाजारपेठेत ओळख तयार करण्यासाठी ‘धन्वंतरी’ ब्रँड तयार केला. गुणवत्तेमुळे दरवर्षी आवळा उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.

 दैनंदिन कामकाजातून मोकळा वेळ घालवण्यासाठी जाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन कुशावर्त जाचक यांनी घरगुती पद्धतीने आवळ्यापासून विविध पदार्थ तयार करण्यास सुरवात केली. जवळचे नातेवाईक, घरी येणाऱ्या पाहुण्यांना वानोळा म्हणून हे पदार्थ दिले जायचे. पुढे वानोळा म्हणून आवळ्याचे पदार्थ नेणारे कायमस्वरूपी ग्राहक झाले. १९९० मध्ये सुरू झालेल्या प्रक्रिया उद्योगाने वेगळी ओळख निर्माण केली. कोणतीही मोठी यंत्रणा न वापरता काही किलोपासून सुरू झालेला हा आवळा प्रक्रिया उद्योग पाच टनांवर गेला आहे. कायमस्वरूपी बांधले गेले ग्राहक अगोदरच मागणी नोंदवितात. बारामती शहरातील दुकानदार आणि पुणे शहरातील निवडक मॉलमध्ये ‘धन्वंतरी’ ब्रँडने हे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातात. वयाच्या ७६ व्या वर्षीही सुमन जाचक या आवळा प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारात रमलेल्या आहेत. माळरानावर आवळा लागवड    प्रक्रियेसाठी आवळा हा महत्त्वाचा घटक. याबाबत माहिती देताना सुमन जाचक म्हणाल्या, की आमच्या जाचक कुटुंबीयांच्या वडिलोपार्जित शेतीपैकी सुमारे २५ एकर क्षेत्र पूर्णपणे कोरडवाहू माळरान होते. या क्षेत्रामध्ये पाणी देण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने १९७४ साली माळरानावर टिकाव आणि पहारीच्या मदतीने आवळा, चिंच, बोर यांची प्रत्येकी पाचशे झाडे लावण्यात आली. ही झाडे जगविण्यासाठी एक किलोमीटर अंतरावरून बैल गाडीतून वीर धरणाच्या कालव्यावरून बॅरलने पाणी आणून, तांब्याने या झाडांना घालण्यात येत होते. या लागवडीपैकी आवळा आणि चिंचेची झाडे चांगली वाढली. दहा वर्षांनंतर आवळ्याच्या झाडापासून चांगले उत्पादन सुरू झाले. सध्या या बागेपासून सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अडीच टन उत्पादन मिळते. यंदा जुनी बाग आम्ही छाटली आहे. त्यामुळे बाजारपेठेतून आवळे खरेदी करणार आहे.   सुरू झाला प्रक्रिया उद्योग   आवळा प्रक्रियेबाबत सुमन जाचक म्हणाल्या, की आमच्या शेतातील उत्पादित आवळा सातारा शहरातील आयुर्वेदीक रसशाळा आणि पुण्यातील च्यवनप्राशनिर्मिती करणाऱ्या कंपनीला दिला जायचा. एक किलो आवळ्याला चार ते पाच रुपयांचा दर मिळायचा. याच दरम्यान मी १९८५ साली घरगुती पद्धतीने आवळ्याची कॅंडी, मोरावळा हे पदार्थ बनविण्यास सुरवात केली. हे पदार्थ पहिल्यांदा घरी आलेले नातेवाईक, पाहुण्यांना दिले जायचे. माझे पती कुशावर्त जाचक हे लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना, शहरातील अनेक लोकांशी आवळा प्रक्रियेबाबत चर्चा करायचे. त्यामुळे त्यांच्या ओळखीतूनही आवळ्याच्या उत्पादनांना मागणी वाढू लागली. साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आवळा पदार्थ तयार केले जायचे. तयार उपपदार्थाचा रंग नंतर काळा होत जात असल्याने मागणीनुसार पदार्थ तयार केला जायचा. आवळा उपलब्ध असेपर्यंत प्रक्रियेचे काम चालायचे. मात्र, आता मागणी चांगली वाढल्याने वर्षभरासाठी पाच टन माल तयार करूनही अपुरा पडत आहे. आमच्या बागेतून दोन टन आणि पुणे, मध्यप्रदेशातील व्यापाऱ्यांच्याकडून अडीच टन आणि काही प्रमाणात परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून आवळा खरेदी केला जातो.

तयार केला ‘धन्वंतरी‘ ब्रॅंड  आवळ्याच्या विविध पदार्थांचे २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, एक किलो बरणी पॅकिंग केले जाते. बाजारपेठेत उत्पादनांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी जाचक यांनी धन्वंतरी ब्रॅंड तयार केला आहे. त्याची नोंदणीदेखील केली आहे. जागेवर २५ टक्के प्रक्रिया पदार्थांची विक्री होते. ५० टक्के प्रक्रिया पदार्थ बारामती शहर आणि पुण्यातील मॉलमध्ये विक्रीस पाठविले जातात आणि २५ टक्के पदार्थ पुण्यातील ग्राहकांना मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातात. सुमन जाचक या आजही महिला बचत गटांना आवळा प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यास तयार असतात. कृषी विभागातर्फे त्यांच्याकडे प्रशिक्षणांचे आयोजनही केले जाते. आवळ्याचे विविध पदार्थ बनविण्यासाठी तीन महिन्यांच्या काळात आठ महिला तर एक पुरुष मजूर घेतला जातो. दरवर्षी साधारणत: पाच टन आवळ्यावर प्रक्रिया केली जाते. यापैकी अडीच ते तीन टन कॅंडी, एक टन मोरावळा, उर्वरित एक टन आवळ्याची सुपारी, चूर्ण, जूस, सॉस बनविला जातो. खर्च वजा जाता दरवर्षी आवळा प्रक्रिया उद्योगातून दोन ते अडीच लाखांची उलाढाल होते.

प्रशिक्षणातून प्रक्रियेला गती

पुणतांबा (जि. नगर) येथील चंद्रकांत बारहाते यांनी आवळा उत्पादक संघाच्या माध्यमातून १९९० साली पुण्यात आवळ्यापासून विविध उपपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या निवासी प्रशिक्षणासाठी प्रतिव्यक्ती पाचशे रुपये प्रवेश मूल्य होते. जाचक पती पत्नींने हे प्रशिक्षण पुर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान सुमन जाचक या प्रशिक्षकाला मदत करायच्या तर कुशार्वत जाचक हे प्रक्रियेचे मुद्दे टिपून घ्यायचे. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान आवळ्याचे पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिकही मिळाले. त्यामुळे प्रक्रिया उद्योग वाढीसाठी मदत झाली. आवळ्यापासून कॅंडी, मसाला कॅंडी, साखर विरहित सरबत, साखरयुक्त सरबत, सॉस, जॅम, लोणचे, मोरावळा, सुपारी, आवळा चूर्ण असे पदार्थ तयार केले जातात. आजही फारसा नफा मिळविण्याचा उद्देश न ठेवता, केवळ वेळ जावा यासाठी सूमन जाचक या आवळा प्रक्रिया उद्योगात रमल्या आहेत. जाचक यांच्याकडून पंढरपूर, करमाळा भागातील चार व्यक्तींनी प्रशिक्षण घेऊन स्वत:चा आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. सुमन जाचक यांना आवळा प्रक्रिया उद्योग आणि उत्पादनांच्या विक्रीमध्ये मुलगा शैलेंद्र, संदीप, मुलगी सुजाता,जावई शिवराज भोसले आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली मदत होते. 

- सुमन जाचक, ९४०३१८८२५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com