वराहपालन, अन्य पूरक व्यवसायातून आर्थिक बळकटी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरवडे येथील सुनील देसाई मुंबईतील वातानुकूलित बस वाहतुकीचा व्यवसाय बंद करून शेतीसाठी गावी परतले. तेथे आंबा, काजू व अन्य विविध पिकांनी समृद्ध बाग फुलवण्याबरोबर वराहपालन सुरू केले.
pigs and poultry farming
pigs and poultry farming

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरवडे येथील सुनील देसाई मुंबईतील वातानुकूलित बस वाहतुकीचा व्यवसाय बंद करून शेतीसाठी गावी परतले. तेथे आंबा, काजू व अन्य विविध पिकांनी समृद्ध बाग फुलवण्याबरोबर वराहपालन सुरू केले. आज या व्यवसायाने त्यांना आर्थिक बळकटी दिली आहे. अन्य पूरक व्यवसायांचीही जोड दिल्याने त्यात अजून भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील कणकवली-कुंभारवाडी-बीडवाडी मार्गावर वरवडे गाव आहे येथे सुनील वसंत देसाई यांची दहा एकर शेती आहे. यातील पाच एकर वडिलोपार्जित तर पाच एकर खरेदी केली आहे. देसाई यांच्या वडिलांचा बस वाहतुकीचा व्यवसाय होता. कित्येक वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई-गोवा, मुंबई-मालवण अशा आरामबस फेऱ्या सुरू केल्या. देसाई सांगतात की त्या काळात या मार्गावर कदाचित आम्हीच सर्वप्रथम या फेऱ्या सुरू केल्या असाव्यात. सुनील यांनी स्वतः बसचालक म्हणूनही अनुभव घेतला. मुंबईत एका प्रसिद्ध हवाई कंपनीसाठी त्यांनी सुमारे सात वातानुकूलित बसेसची सेवा काही वर्षे दिली. शेतीवर लक्ष केंद्रित व्यवसायाच्या निमित्ताने सुनील यांची कोकणात ये-जा व्हायची. तेथील निसर्ग त्यांना सतत खुणावायचा. गावी जाऊन शेती करावे आणि समृद्ध जीवन जगावे असे त्यांना सतत वाटायचे. मग आपल्या वडिलोपार्जित पाच एकरांवर लक्ष केंद्रित केले. पाच एकर जमीन खरेदी केली. या दहा एकरांत समृद्ध फळबाग फुलवण्यास सुरुवात केली. अर्थात व्यवसाय सुरू असताना ते गावी यायचे. त्यातून सुमारे एकहजार काजू रोपे बागेत उभी राहिली. एके दिवशी उन्हाळ्यात बाजूच्या रानातील वणवा बागेत घुसला. एका दिवसांत सर्व रोपे जळून खाक झाली. इतक्या परिश्रमानंतर लावलेली रोपे जळल्यामुळे जिवाची प्रचंड घालमेल झाली. मात्र यापुढे शेतीत अजून हिमतीने व पूर्णवेळ काम करायचे ठरवले. गावचा रस्ता धरला अखेर कुटुंबासोबत चर्चा करून २००१ च्या दरम्यान देसाई यांनी गावी जायचे निश्‍चित केले. पत्नी संगीता आणि मुलगी प्रियांका यांनी देखील त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. ज्या जमिनीत काजूची रोपे जळली त्या ठिकाणी नियोजनबद्ध शेती करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. त्या सुमारास शेती व पूरक व्यवसायासंबंधीची पुस्तके वाचली होती. त्यातूनच शेतीसह वराहपालन सुरू करण्याचा विचार आला. त्याविषयी देखील पुस्तके वाचली. परंतु पुस्तकी ज्ञानावर न थांबता ज्या ठिकाणी वराहपालन प्रकल्प कार्यान्वित होते अशा केरळ, कर्नाटक, गोवा राज्यातील प्रकल्पांना भेटी दिल्या. प्रकल्पाचे फायदे तोटे, व्यवस्थापन, विक्री व्यवस्था या बाबी तपासल्या. सुरू केले वराहपालन वराहपालनाचा निर्णय पक्का झाल्यानंतर शेड बांधण्यास सुरुवात केली. काहींनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यात अडथळे कसे निर्माण होतील यादृष्टीने प्रयत्न केले. परंतु जिथे विरोध तिथे अधिक जोमाने काम करण्याचा देसाई यांचा स्वभाव असल्यामुळे ते हा प्रकल्प उभारण्याच्या कामी अधिक ताकदीने उतरले. शेडचे काम पूर्ण होताच केरळ येथील शासकीय फार्मवरून १० मादी व एक नर असे ११ प्राणी खरेदी केले. लार्ज व्हाईट यॉर्कशायर जातीचे हे वराह होते. व्यवसायाचा विस्तार अकरा वराहांपासून सुरू केलेला हा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. या भागात हा प्रकल्प नवखा असल्यामुळे देसाई यांना प्राण्यांच्या आरोग्याच्या काही तक्रारी निर्माण झाल्यास केरळ,कर्नाटकातील तज्ज्ञांशी चर्चा करून उपचार करावे लागायचे. प्राण्यांची वाढ होऊ लागली तशी १४ हजार चौरस फूट आकाराचे शेड बांधण्याचे ठरविले. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने कर्जसाह्य केले. दोन-तीन वर्षात आलेल्या अनुभवाच्या आधारे या शेडची उभारणी केली. वराहपालन दृष्टिक्षेपात

  • सध्या प्रकल्पात लहान- मोठे धरून सुमारे ३५० ते ४०० वराह.
  • वराह प्रकल्प अर्थकारण- १० मादी १ नर यांच्यानुसार
  • प्रति मादीला दिवसभरात लागणारे खाद्य- ३ किलो
  • खाद्याचा सरासरी दर ५ रुपये व औषधे ५ रुपये
  • प्रति मादीवर दिवसा होणारा खर्च- ८० रुपये
  • एक मादी वर्षभरात १६ पिल्ले देते.
  • प्रत्येक पिल्लू १०० किलो वजनाचे होईपर्यंत त्यावरील खर्च- ८००० रुपये
  • वराहांना गोवा, केरळ, कर्नाटक आदी राज्यांत मागणी
  • विक्रीयोग्य वराहास प्रति किलो १२५ रुपये दर मिळतो.
  • काही ग्राहक प्रकल्पस्थळी येऊन घेऊन जातात.
  • प्रति पिल्लू चारहजार रुपये दर मिळतो.
  • वराह प्रकल्पाचे नियोजन

  • अतिशय काटेकोर नियोजन ठेवावे लागते.
  • प्रत्येक वयाच्या पिल्लांना वेगवेगळे ठेवावे लागते. त्यांची वाढ झाल्यानंतर त्यांना दुसरीकडे हालवावे लागते.
  • शेडमध्ये अतिशय स्वच्छता ठेवावी लागते. शेड दिवसभरात स्वच्छ पाण्याने धुवावे लागते.
  • खाद्य, पाणी वेळच्या वेळेत देण्यात येत असल्याने वाढ चांगली होते .त्यामुळे प्राणी चांगल्या दर्जाचे आहेत.
  • लॉकडाऊनमधील स्थिती कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. अनेक पूरक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले. वराहपालनावर देखील परिणाम झाला. मात्र या काळात त्यांना मागणी देखील राहिली. त्यांचे वजन जेवढे वाढते तितकी अधिक रक्कम मिळते. त्यामुळे एक- दोन महिने विक्री झाली नाही तरी फार नुकसान होत नसल्याचे देसाई सांगतात. अन्य पूरक व्यवसाय

  • गावठी कोंबडीपालनाची जोड. कोंबड्यांना दिवसभर बागेत सोडले जाते. मुक्तपणे बागडत असल्याने त्या आरोग्यपूर्ण वातावरणात राहतात. संध्याकाळी आपसूकच शेडमध्ये येतात.
  • सध्या चारशेहून अधिक गावठी कोंबड्या. त्यातून चांगले उत्पन्न.
  • जोडीला गोपालन. कांकरेज,गीर, साहिवाल, कोकणगीड्डा अशा चार जातीच्या सुमारे आठ गायींचे पालन. घरगुती वापरासाठी दूध आणि बागेसाठी शेण, गोमूत्र उपलब्ध होते.
  • समृद्ध शेती

  • दहा एकरांत नारळ-२५०, हापूस व अन्य वाण आंबा-१००, दालचिनी-१००, बांबूची बेटे १५० व नवी ३००, कोकम १००, याशिवाय हळद, फणस, काजू, चिकू, पेरू, आवळा, मॅंगोस्टीन, लिंबू, केळी, सुपारी, रेड जाम, भोकर, पॅशन फ्रूट, अननस आदींची विविधता
  • चवळी, उडीद, मूग, वाल आदी कडधान्ये.
  • सुरण, साबुदाणा, अळूचे विविध प्रकार आदींचीही लागवड
  • तोंडली,घेवडा, शेवगा, पालेभाज्या, वाल आदी भाजीपाला
  • नैसर्गिक पद्धतीने शेतीवर भर. गोमूत्र, शेण, वराह विष्ठा, कोंबडीखत यांचा खत म्हणून वापर.
  • गवताची एक काडीदेखील जाळत नाहीत. संपूर्ण बागेत कायम स्वरूपी पालापाचोळ्याचे आच्छादन दिसून येते. त्यामुळे जमीन सुपीक आणि भुसभुशीत झालेली दिसते.
  • कोकम, नारळ तेल, आंबा पल्प, आंब्याचे साठ, कोहळ्यांचे सांडगे आदींचीह निर्मिती सुरू केली आहे. घरगुती वापरांसह त्यांची विक्री.
  • संपर्क- सुनील देसाई- ९१३७६२१३६९, ९८२०६१७१७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com