प्रदर्शनामध्ये ग्राहकांना पदार्थांची थेट विक्री
प्रदर्शनामध्ये ग्राहकांना पदार्थांची थेट विक्री

स्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही ख्याती

कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती आंबाडे यांनी विविध पदार्थ तयार करून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ व्यावसायिक दृष्टी न ठेवता पदार्थांचा दर्जा आणि चव वाढवून विविध पदार्थांत हातखंडा मिळवला. त्यामुळे त्यांचे पदार्थ परदेशातही जाऊ लागले. इतर महिलांना रोजगार देत भविष्यात आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे त्याचे ध्येय आहे.    

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील स्वाती संजय आंबाडे लग्न होऊन उच्चशिक्षित शेतकरी कुटुंबात आल्या. स्वाती ताईंचे माहेर इचलकरंजी. लग्नानंतर त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबाची आठ एकर शेती. पती संजय हे या भागातील प्रगतिशील शेतकरी. ऊस, भाजीपाला ही त्यांच्या कुटुंबाची मुख्य पिके. सगळी जमीन नदीच्या काठी असल्याने पुराचा धोकाही शेतीला असतो. पण वेगवेगळे प्रयोग राबवून आंबाडे कुटुंबीयांनी शेती फायदेशीर केली आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्नच त्यांच्या दृष्टीने उदरनिर्वाहासाठी पुरेसे होते. परंतु स्वातीताइंना काही तरी वेगळे करून आपली ओळख निर्माण करण्याची इच्छा होती. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे सुरवातीला त्यांनी सौंदर्यप्रसाधने, कपड्यांचा व्यवसाय केला. पण त्यात त्यांचे मन रमेना. स्वातीताई पाककलेत निपुण आसल्यामुळे यामध्येच आपण पूरक व्यवसाय का करू नये? असे त्यांना वाटले. म्हणून त्या नवीन खाद्य पदार्थ शिकल्या. कुरूंदवाड परिसरात सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. या संस्थांच्या सभा व अन्य कार्यक्रमांना नाष्टा व जेवण पुरविण्यास त्यांनी प्रारंभ केला. यामध्ये गावरान थाळी, शेंगदाणा चटणी, पंजाबी थाळी आदी प्रकार ग्राहकांच्या पसंतीस उतरले. यातूनच त्यांच्या पदार्थांची यादी वाढत गेली.

साजूक तुपाचा वापर केवळ व्यावसायिक दृष्टी न ठेवता पदार्थांचा रुचकरपणा ग्राहकांच्या जिभेवर राहावा यासाठी स्वातीताईंनी पदार्थांचा दर्जाकडे बारकाईने लक्ष दिले. बाजारातून तूप विकत न आणता ते थेट घरगुती स्वरुपातून गावातील महिलांकडून विकत घेतले. यामुळे गावातील महिलांना तर फायदा झालाच, पण स्वातीताईंनाही सकस तूपाची उपलब्धता झाली. बाकी चांगल्या दर्जाचा कच्चा माल त्यांनी स्थानिक ठिकाणाहून विकत आणून चविष्ट पदार्थ करण्यास सुरवात केली. घरगुती साजूक तुपामुळे पदार्थांचा दर्जा चांगला राहू लागला. चांगल्या चवीमुळे पदार्थांची मागणी वाढू लागली.  

महिलांना मिळाला रोजगार  घराशेजारील जागेमध्ये पदार्थ बनविले जातात. सुमारे पंधरा महिला आठवड्यातील एक किंवा दोन दिवसाचा अपवाद वगळता दिवसभर पदार्थ तयार करत असतात. महिलांना तासिका तत्वावर मजूरी दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. यामुळे मोठी आर्डर आली तरी वेळेत हे पदार्थ तयार करण्यात महिला तत्पर असतात.

पदार्थांचा तयार केला ब्रॅण्ड

अर्हम फूड्‌स नावाने पदार्थांची विक्री केली जाते. काही व्यापारी घाऊक प्रमाणात पदार्थ घेऊन त्याचे स्वत: मार्केटिंग करतात. व्यापाऱ्यांकडून पदार्थांच्या चवी बाबतच्या सूचनाही तातडीने अंमलात आणल्या जातात. यामुळे आता स्वत: व्यापारी या पदार्थांची आर्डर देतात. वर्षाला दहा ते पंधरा लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते. सरासरी वीस टक्के नफा मिळत असल्याचे स्वातीताई सांगतात. त्यांना भविष्यात कुरुंदवाड मध्ये खास महिलांनी उभारलेले एक शाकाहारी हॉटेल सुरू करायचे आहे.  संपूर्ण व्यवसायामध्ये त्यांना माधवी दातार तसेच त्यांच्या सासूबाई शशिकला, पती संजय आणि मुलगा सुजल हे मदत करतात. त्यांच्या मदतीमुळेच आपण हे यश मिळवू शकलो असे स्वातीताई सांगतात. 

लाडूंमध्ये हातखंडा

विविध प्रकारचे लाडू हे स्वातीताईंच्या पाककलेचे वैशिष्ट्य. त्यांच्याकडे हळीव लाडू, हिरव्या मुगाचे लाडू, शेंगदाणा लाडू, बाजरी लाडू, शेंगोळी लाडू, गुळातील डिंक लाडू, मल्टिग्रेन लाडू आदि प्रकारचे लाडू मिळतात. खवा, ज्वारी आणि खारीक वापरुन  तीन थराचे लाडू हा त्यांचा स्पेशल मेनू आहे.  याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे नमकीनही बनवले जातात. यामध्ये मेथी नमकीन मध्ये चार स्वाद आहेत. चटपटा चिली, चीज, गार्लिक, टॅंगी टोमॅटो, सॉल्टेड आदि प्रकारात नमकीन बनविले जाते. २०० ग्रॅम पासून एक किलोपर्यंत पदार्थांचे पॅकींग होते. लाडूचे दर प्रकारानुसार किलोसाठी २६० ते ५०० रुपये तर शेंगदाणे चटणीचा दर ३०० रुपये किलो असा आहे.   

दर्जेदार चवीने मिळविले मार्केट माऊथ टू माऊथ पब्लीसीटी हे सूत्र त्यांनी अंगिकारून व्यवसाय सुरू केला. चांगले पदार्थ दिले की एक व्यक्ती दुसऱ्याला सांगत जाते असे गृहीतक धरून त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला. काही महोत्सवामध्ये स्टॉल लावून त्यांनी राज्यभरातील ग्राहकांची पसंती मिळविली. सध्या पुण्याबरोबर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातून त्यांच्या पदार्थांना चांगली मागणी आहे.

दिवाळीसाठी चोवीस प्रकारचे पदार्थ  दिवाळी सणामध्ये स्वातीताईंना थोडीही उसंत नसते. नेहमीच्या पदार्थाबरोबर दिवाळीच्या फराळाचे सर्व पदार्थ त्या साजूक तूपामध्ये करतात. यामुळे या कालावधीत पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या कालावधीत जवळ जवळ २४ प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. या भागात दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. 

परदेशातही मागणी स्वातीताईंनी तयार केलेले पदार्थ घरगुती तुपामध्ये केलेले असल्यामुळे त्याचा टिकाऊपणा बाजारात मिळणाऱ्या इतर पदार्थांच्या तुलनेत जास्त आहे. शेंगदाणा पोळी आणि डिंक लाडूला परदेशातील ग्राहकांकडून जास्त मागणी असते. नागरिक, विद्यार्थी जास्त प्रमाणात हे पदार्थ घेऊन परदेशात जातात. हा अभिमानाचा क्षण असल्याचे स्वातीताई सांगतात. 

विविध स्पर्धांमध्ये यश   पदार्थांचा दर्जेदारपणा हे स्वातीताईंच्या यशाचे मुळ आहे. याच जोरावर त्यांनी पाककलेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय श्रावण महोत्सव स्पर्धेत महाराष्ट्राची किचन क्विन या विभागात त्या उपविजेत्या ठरल्या. सहभागी तब्बल १५०० स्पर्धकांमधून त्या उपविजेत्या बनल्या. जेष्ठ उद्योजक विठ्ठल कामत आणि सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी परीक्षण करून त्यांच्या पदार्थांना दाद दिली आहे. 

-  स्वाती आंबाडे, ७२१८९५५१८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com