शाळेबरोबरच शेतीमध्येही उपक्रमशील

जळगाव येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी आपले अध्यापनाचे कार्य सांभाळत लाडली (ता.धरणगाव) गावशिवारातील वडिलोपार्जित शेतीमध्ये कापूस पिकाबरोबरीने उडीद, मूग या आंतरपिकांवर भर दिला आहे.
Intercropping of  Pigeon pea in cotton
Intercropping of Pigeon pea in cotton

जळगाव येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी आपले अध्यापनाचे कार्य सांभाळत लाडली (ता.धरणगाव) गावशिवारातील वडिलोपार्जित शेतीमध्ये कापूस पिकाबरोबरीने उडीद, मूग या आंतरपिकांवर भर दिला आहे. चांगले विद्यार्थी घडवीत असतानाच कोरडवाहू शेतीला त्यांनी नवी दिशा दिली आहे.  लाडली (ता.धरणगाव,जि.जळगाव) गावशिवार हे भेंडी, कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गिरणा नदीकाठी बहुतांश गावाचे शिवार आहे. परंतु काही भागातील जमीन खारपण स्वरूपाची आहे. त्यामुळे अति सिंचन केल्यास नुकसान होण्याची भीती असते. किरण पाटील यांची शेतीही खारपण स्वरूपाची आहे. इच्छा असूनही ते जमिनीत कूपनलिका, विहीर घेऊ शकत नाहीत, कारण खारे पाणी लागण्याची जास्त शक्यता असते. लाडली गावाजवळच किरण पाटील यांची पाच एकर शेती आहे. किरण पाटील गेल्या बारा वर्षांपासून जळगाव शहरातील भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक आहे. त्यांचे थोरले बंधू भरत हे जळगाव शहरातील एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. तेदेखील जळगाव शहरात वास्तव्यास आहे. दोघे बंधू एकत्रित शेती करतात.  शेती नियोजनाला सुरूवात 

  • लाडली हे गाव जळगाव शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे.चार वर्षांपूर्वी किरण पाटील यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे शेती लीजवर द्यायची की स्वतः वेळ काढून करायची, यावर दोन्ही बंधुंमध्ये विचार मंथन सुरू झाले. ज्या शेतीमुळे आपण शिकून, सावरून मोठे झालो, शिक्षक बनलो, नोकरी मिळाली, त्या शेतीला लीजवर देणे योग्य नाही असे दोन्ही बंधूंनी ठरविले. वडिलांनी शेतीचे जे धडे दिले, त्याचा अवलंबकरून  शेतीचे योग्य नियोजन करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून किरण पाटील शेती करीत आहे.शेती नियोजनात बंधू भरत, आई सखूबाई, पत्नी सौ. रंजना आणि आतेभाऊ समाधान यांची मोठी मदत होते. 
  • शेती करायची तर सिंचनासाठी पाणी हवे. परंतु किरण यांच्या शिवारात विहीर, कूपनलिका खोदून पुरेसे गोड्या पाण्याचे स्रोत सापडत नाहीत. गिरणा नदीकाठी एक, दोन गुंठे जमीन  खरेदी करून तेथे कूपनलिका घ्यावी लागते. तेथून जलवाहिनी करून शेतात पाणी आणावे लागते. त्यासाठी किमान आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा खर्च येतो. दुसऱ्या बाजूला जमीन खारपण असल्याने  सिंचनाची सुविधा करून सध्याच्या काळात सुपीकता वाढविणे, टिकविणे अवघड वाटत आहे. यामुळे किरण यांनी  सिंचनाची मोठी सुविधा न करता जमीन स्वतः कसायला सुरवात केली. 
  • कापूस लागवडीला पसंती 

  • किरण पाटील एक चांगला पाऊस झाल्यानंतर जून महिन्यात साडेचार एकरात तीन बाय साडे तीन फूट अंतराने बीटी कापसाची लागवड करतात. गेले दोन वर्षे पाऊस बऱ्यापैकी आहे. यामुळे लागवड यशस्वी होऊन पिकाची वाढही चांगली होत असल्याचे दिसून आले आहे. पाटील यांचा रासायनिक खतांचा कमी वापर करण्यावर भर असतो. शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. कपाशी पिकाला ते दोनदा मर्यादित स्वरूपात खते देतात.
  • जमीन सुपिकतेवर त्यांचा भर आहे. रासायनिक कीडनाशकांच्या वापराएवजी सेंद्रिय कीटकनाशके, निंबोळी अर्काच्या वापरावर पाटील यांचा भर आहे. पिकाच्या आंतरमशागतीसाठी किरण यांचे आतेभाऊ समाधान मदत करतात. आंतरमशागतीमुळे जमीन भुसभुशीत राहते, वेळेवर तण नियंत्रण होते. पिकाच्या मुळांची चांगली वाढ होते. त्यामुळे पीक जोमदार येते. असा पाटील यांचा अनुभव आहे.
  • शेती कामामध्ये पारंगत  किरण पाटील हे शिक्षकी पेशामध्ये असले तरी कापूस बियाणे निवड आणि लागवड, रासायनिक खते देणे, तण नियंत्रण, फवारणी,कापूस वेचणी या कामांमध्ये पारंगत आहे. वडिलांकडूनच त्यांनी शेती कामांची सर्व माहिती घेतली होती. ती आता उपयोगी पडत आहेत. आई सखूबाई यादेखील किरण यांच्याकडेच जळगावात असतात. शेतात कापूस वेचणी, तण नियंत्रणाची कामे असल्यास त्यादेखील सकाळीच शेतात पोचतात. किरण पाटील  आणि त्यांचे बंधू शनिवार, रविवारी आवश्यकतेनुसार पूर्णवेळ शेताच्या कामांसाठी राखीव ठेवतात.  यंदा अति पावसात उडदाचे नुकसान होत होते. हे नुकसान वाचविण्यासाठी किरण व बंधू भरत यांनी उडिदाची कापणी, मळणी स्वतः करून घेतली. आपल्या कुटुंबापुरते उडीद उत्पादन मिळविले.  आंतरपिकांवर भर 

  •  पाटील यांचे कापूस हे जरी मुख्य पीक असले तरी, किमान एका एकरातील कपाशीमध्ये उडीद, मुगाचे आंतरपीक घेतात. त्यामुळे कुटुंबासाठी लागणारे कडधान्य उपलब्ध होते. या आंतरपिकांसाठी रासायनिक खते, किडनाशकांचा वापर टाळतात. रसायन अवशेष मुक्त धान्यासाठी पाटील प्रयत्नशील असतात.  
  • किरण पाटील कापसाच्या १६ ओळीनंतर तुरीची एक ओळ  घेतात. देशी किंवा वडिलांनी संवर्धन केलेल्या तूर बियाणे ते लागवडीसाठी निवडतात. तुरीचे कुटुंबाला गरजेपुरते उत्पादन मिळते.
  • आंतर पिकांमुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते. कापूस पिकात अति पाऊस, कमी पाऊस किंवा इतर कारणांमुळे तूट वाढली, नांग्या सतत भराव्या लागत असल्यास त्यासाठी ते चवळी, ज्वारी,तूर, उडीद, मुगाला पसंती देतात. सापळा पीक म्हणून ही लागवड फायद्याची ठरते.
  • ऑक्टोबरमध्ये उष्णता अधिक असली तर आवश्यकतेनुसार शेजारच्या शेतकऱ्याकडून पाणी विकत घेऊन कापसाला एक ,दोन वेळा सिंचन केले जाते. यामुळे उत्पादनात वाढ मिळते.ऑक्टोबरमध्ये जमिनीत चांगला ओलावा असल्यास पाटील एक एकरावर हरभरा आणि दादर ज्वारीचे मिश्रपीक घेतात. हरभऱ्याचे कुटुंबापुरते उत्पादन मिळते.
  • पाटील यांना कोरडवाहू कापसाचे एकरी चार ते साडेचार क्विंटल उत्पादन मिळते. व्यापाऱ्याला जागेवर कापसाची विक्री करतात. गेले दोन वर्षे सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा दर त्यांना मिळाला आहे.    
  • कापूस पिकातील तण नियंत्रण, वेचणी, फवारणी आदी प्रमुख कामांसाठी किरण किंवा त्यांचे बंधू भरत स्वतः राबतात. मजुरी कशी कमीत कमी लागेल, यावर भर असतो. यामुळे मजुरी खर्च कमी येतो, नफा वाढतो. कुटुंबासाठी कडधान्य पिकवून वर्षाला बऱ्यापैकी नफा ते मिळवितात. 
  • बांधावर झाडे, रानभाज्या पाटील यांच्या शेतीच्या बांधावर खानदेशात प्रसिद्ध असलेल्या अवीट गोडीच्या मेहरूणी बोरांची सुमारे आठ डेरेदार झाडे आहेत. त्याची व्यावसायिक शेती करीत नसले तरी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाइकांना या बोरांची चव चाखायला मिळते. तसेच गावातील मंडळीदेखील बोरांसाठी किरण यांच्या शेतात येतात. याशिवाय बांधावर शेवगा, अंबाडीची लागवड केली आहे. येत्या काळात शेती बागायती करण्याचे पाटील बंधूंनी नियोजन केले आहे. त्यासाठी पाईपलाईनची सोय करून वर्षभर भाजीपाला उत्पादनाचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. शाळेमधील उपक्रम  कोरोना प्रादुर्भावामुळे शाळेमध्ये अध्यापन बंद आहे. परंतु इतर शालेय कामकाज सुरू आहे. ही कामे पूर्ण करून किरण पाटील शेतीसाठी वेळ देतात. किरण पाटील हे भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहे. दररोज शाळा सुरू होण्याच्या अगोदर एक तास २० विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण, इंग्रजी वाचन, लिखाण सुधारणा यासाठी निःशुल्क वर्ग घेतात. दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्याकडून इंग्रजी भाषेत हस्तलिखित पुस्तक तयार करतात. त्यामध्ये मुलांनी लिहिलेल्या कथा, उतारे यांचा समावेश असतो. गेली नऊ वर्षे पाटील हस्तलिखित पुस्तकांचा उपक्रम राबवीत आहेत. विविध संस्थांनी त्यांच्या शालेय उपक्रमाची दखल घेऊन   आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला आहे.  संपर्क- किरण पाटील, ९२७०८६०२९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com