कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’ झाल्या सक्षम

गटातून झाला फायदा... कांदळवन संवर्धन करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही पर्यावरण संवर्धनातून पर्यटन करतो. कांदळवन सफारीतून बचत गटाला चांगला आर्थिक फायदा होत आहे. येत्या काळात मत्स्य प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहोत. - श्‍वेता हुले, ८८०६४६५२८६ (अध्यक्षा, स्वामिनी महिला बचत गट)
मांडवी खाडीतील कांदळवनातून पर्यटकांना सफर घडविताना स्वामिनी बचत गटाच्या महिला सदस्या.
मांडवी खाडीतील कांदळवनातून पर्यटकांना सफर घडविताना स्वामिनी बचत गटाच्या महिला सदस्या.

वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला बचत गटाने मांडवी खाडीमध्ये कांदळवन पर्यटन सफारीतून आर्थिक प्रगती साधत वेगळी ओळख तयार केली. देश-विदेशातील पर्यटकांना मांडवी खाडीत सफर घडविताना पर्यावरण संवर्धनाचे काम हा गट करत आहे. याचबरोबरीने मत्स्य प्रक्रिया, खेकडा, कालवे उत्पादनावर गटाने लक्ष केंद्रित केले आहे.

वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) शहराला निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. निळेशार पाणी, विविध जातीचे मासे त्याचबरोबरीने समुद्रकाठाला असलेले कांदळवन आणि त्यामध्ये मुक्तसंचार करणारे पक्षी असे सुंदर वातावरण येथे अनुभवायला मिळते. किनारपट्टी परिसरात राहणारे बहुतांशी कुटुंबांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय. पुरुषांनी समुद्रात जाऊन मासेमारी करायची आणि महिलांना परिसरातील बाजारपेठेत मासे विक्री करायची, असा येथील दिनक्रम आहे. परंतु अलीकडे महिला बचत गटाच्या माध्यमातून नवीन आर्थिक स्रोत तयार होऊ लागले आहेत.   बचत गटाची उभारणी  पारंपरिक मासेमारीच्या बरोबरीने वेंगुर्ला किनारपट्टी भागातील दहा महिलांनी पुढाकार घेत २००६ मध्ये स्वामिनी महिला बचत गटाची सुरवात केली. सुरवातीला हा गट इतर बचत गटाप्रमाणे कार्यरत होता. मात्र, आर्थिक उत्पन्न वाढ तसेच वेगळेपण जपण्यासाठी विविध उपक्रमांची चर्चा सुरू झाली. सन २००८ मध्ये बचत गटाच्या अध्यक्षा श्‍वेता हुले आणि सचिव सई सातर्डेकर यांना मांडवी खाडीमध्ये कांदळवन समुद्र सफारीची कल्पना सुचली. याबाबत सुवर्णा हुले, गौतमी हुले, आएशा हुले, जान्हवी हुले, सुशिला हुले, प्रियांका दाभोलकर, स्नेहा खोबरेकर, राधिका लोणे या गटातील सदस्यांची चर्चा केल्यानंतर हा सफारी प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला.

कांदळवन सफारीला सुरवात  बचत गटातील सदस्यांनी विविध लोकांशी चर्चा केल्यानंतर २०१५ मध्ये वेंगुर्ला बंदराजवळील मांडवी खाडीमध्ये कांदळवन सफारीचा प्रस्ताव युएनडीपी समोर सादर केला. या प्रस्तावाला २०१६ मध्ये मान्यता मिळाली. ‘पर्यावरण संवधर्नातून पर्यटन’ या ध्येयानुसार इको टुरिझमचा निर्णय गटाने घेतला. खाडीतील कांदळवनात पर्यटकांना बोटीने फिरवायचे असेल तर पहिल्यांदा बोट चालविता येणे महत्त्वाचे होते. गटातील महिलांना बोट चालविण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे महिलांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सतीश हुले यांनी स्वीकारली. बोटीचे स्टेअरिंग कसे पकडावे, वल्हा कसा चालवायचा, वाऱ्यांची दिशा ओळखून बोट कशी चालवायची याबाबत महिनाभर गटातील दहा महिलांनी प्रशिक्षण घेतले.  याचबरोबरीने महिलांनी कांदळवनातील विविध झाडांचे पर्यावरणाच्यादृष्टीने महत्त्व, विविध हंगामात कांदळवनात येणाऱ्या पक्ष्यांची ओळख, खाडीत सापडणारे मासे आणि त्यांच्या वैशिष्टांची शास्त्रीय माहिती तज्ज्ञांकडून करून घेतली. 

पर्यावरणपूरक कांदळवन पर्यटन  स्वामिनी महिला बचत गटाने २०१७ मध्ये मांडवी कांदळवन सफारीला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात पर्यटकांचा या उपक्रमास काहीसा थंड प्रतिसाद मिळाला. परंतु, जसजशी सफरीची प्रसिध्दी झाली, तसतसा पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला. आता देश विदेशातील पर्यटक कांदळवन सफारीचा आनंद घेतात.  महिला बचत गटातर्फे पर्यटकांसाठी बोटीतून खाडी परिसरातील कांदळवन सफारी केली जाते. त्याचबरोबरीने कांदळवनात असणाऱ्या अविसिनिया मरिना, अविसिनिया ऑफिशनॅलिस, रायझोफोरा म्युक्रोनॅटा, सोनेरेशिया अल्बा, एक्झोकॅरिया अगालोचा, कॅन्डेलिया कॅन्डल, ब्रुग्वेरा जिम्नोरायझा, अकॅन्थस इलिसिफोलिअस या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या खारफुटींची माहिती दिली जाते. याशिवाय कांदळवनात दिसणारे खेकडे, कोळंबी, विविध जातींचे मासे तसेच विविध हंगामात कांदळवनामध्ये येणारे अमेरिकन डार्टर, ग्रेट इग्रेट, किंगफिशर, सीगल या पक्ष्यांची रंजक माहिती दिल्यामुळे पर्यटकांना कांदळवन सफारीच्या बरोबरीने परिसरातील जैवविविधतेची माहिती मिळते. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

सफारीचे नियोजन 

  • बोट चालविण्यासाठी तीन आणि गाईड म्हणून एक अशा चार 
  • महिला बोटीवर एका फेरीसाठी काम करतात. एक ते दीड तासाची सफारी असते.
  • एका बोटीत दहा पर्यटक, प्रत्येकी १५० रुपये किंवा एका फेरीला दीड हजार रुपये पर्यटकांकडून घेतले जातात.
  • सफारीचा हंगाम नोव्हेंबर ते जूनचा पहिल्या आठवडा असतो. गटाला दरवर्षी दीड लाख रुपयांचे उत्पन्न. 
  • सफारीला देश विदेशातील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद.
  • आत्मविश्वास वाढला... आतापर्यंत समुद्र तसेच खाडी भागात बोटी फक्त पुरुष चालवत होते. मात्र, आता आमच्या बचत गटातील सर्व महिला बोट चालवितात. पर्यटन उपक्रमामुळे महिलांमध्ये एक आत्मविश्‍वास निर्माण झाला. - सई सातर्डेकर (सचिव, स्वामिनी महिला बचत गट)

    प्रक्रिया उद्योग, खेकडेपालनाला चालना   कांदळवन कक्ष, मुंबई यांच्या मार्फत २०१२ ते २०१७  या कालावधीत सयुंक्त राष्ट्रविकास कार्यक्रम व जागतिक पर्यावरण केंद्राच्या अर्थसहाय्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात प्रकल्प राबविण्यात आला. याबाबत प्रकल्प व्यवस्थापन तज्ज्ञ दुर्गा ठिगळे-सावंत म्हणाल्या, की मत्स्य व्यवसाय, पर्यटन, शेतीमधील उपजीविका शाश्‍वत व पर्यावरणपूरक व्हावी तसेच सागरी किनारपट्टीचे संवर्धन स्थानिकांच्या सहभागाने करता यावे, यासाठी विविध उपक्रमांना सुरवात झाली. यापैकीच एक आहे मांडवी खाडीमधील पर्यावरणपूरक कांदळवन पर्यटन प्रकल्प. कांदळवन पर्यटन हा महिला गटाने सुरू केलेला देशातील पहिला प्रकल्प आहे. यासाठी स्वामिनी महिला बचत गटातील सदस्यांना कांदळवन कक्षाचे श्री. एन. वासुदेवन आणि प्रकल्प संचालक सुबीर घोष यांनी चांगले मार्गदर्शन मिळाले. गटातर्फे कांदळवनांचे चांगले संवर्धन होत आहे. जिल्ह्यातील महिला गटांना मत्स्य प्रक्रिया, जिताडा संवर्धन, खेकडे पालन, कालवे पालनाबाबत प्रशिक्षण देण्यात येते. शेतकरी महिलांना एसआरआय पद्धतीने भात लागवड, शेतीपूरक उद्योगाबाबत प्रशिक्षण दिले जाते.    - दुर्गा ठिगळे-सावंत, ९५९५१९५६९५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com