agriculture news in marathi success story of turmeric grower farmer from aastul village district akola | Agrowon

तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत वाटचाल

गोपाल हागे
गुरुवार, 28 मे 2020

अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी अभ्यासूपणा व प्रयोगशीलता दाखवून आपली १२ एकर शेती विकसित केली आहे. व्यावसायिक पीक पद्धतीची रचना व कृषी विद्यपीठाचे मार्गदर्शन घेत हळद पिकात त्यांनी हातखंडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. मागील हंगामात हळद (सात महिने कालावधी) व त्यानंतर कलिंगड अशी वर्षभरात दोन पिके घेतली. लॉकडाऊनच्या काळात कलिंगडाची थेट विक्री साधून चांगले उत्पन्न मिळवले.
 

अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी अभ्यासूपणा व प्रयोगशीलता दाखवून आपली १२ एकर शेती विकसित केली आहे. व्यावसायिक पीक पद्धतीची रचना व कृषी विद्यपीठाचे मार्गदर्शन घेत हळद पिकात त्यांनी हातखंडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. मागील हंगामात हळद (सात महिने कालावधी) व त्यानंतर कलिंगड अशी वर्षभरात दोन पिके घेतली. लॉकडाऊनच्या काळात कलिंगडाची थेट विक्री साधून चांगले उत्पन्न मिळवले.

अकोला जिल्ह्यातील आस्टुल (ता. पातूर) येथील संतोष घुगे यांची पास्टूल भागात सुमारे १२ एकर शेती आहे. त्यांचे वडील शिक्षक व प्रगतिशील शेतकरी होते. संतोष यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात १९९२- ९३ मध्ये पदविका घेतली. त्यानंतर परीक्षेद्वारे कनिष्ठ अभियंता व तांत्रिक साहाय्यक या दोन पदांवर निवड झाली. पण मुलाने शेतीतच काहीतरी करावे ही वडिलांची इच्छा होती. तरीही व्यवसाय म्हणून सुमारे चार वर्षे शासकीय कंत्राटदार म्हणून अनुभव घेतला. त्यानंतर आता मात्र ते पूर्णवेळ शेतकरी झाले आहेत.

शेतीतील वाटचाल
शिक्षण व व्यवसाय सुरू असताना संतोष सुरुवातीला शेतीकडे फारसे लक्ष देऊ शकले नव्हते. आधीच लावलेल्या मोसंबी, लिंबू, सोयाबीन, गहू आदी पिकांपासूनच त्यांनी शेतीतील अनुभव घेण्यास सुरुवात केली. पिकांची उत्पादकता वाढवण्यास प्राधान्य दिले. सेंद्रिय निविष्ठा शेतातच तयार करून त्यांचा वापर वाढविला. घरगुती वापरासाठी गव्हाचे ते सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतात. दरम्यानच्या काळात नदीकाठी असलेली जमीन, वन्यप्राण्यांचा त्रास, नगदी पैसा मिळवून देण्याची क्षमता यासारख्या बाबींचा विचार करीत ते हळद पिकाकडे वळले.

हळदीने वाढवला हुरूप
संतोष यांनी अलीकडे दोन ते तीन वर्षांपासून हळदीची शेती सुरू केली आहे. त्यांच्या भागात हळद उत्पादकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मात्र अभ्यासूवृत्ती, योग्य व्यवस्थापन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांनी पहिल्याच वर्षी एकरी ३५ क्विंटलपर्यंत वाळवलेल्या हळकुंडाचे उत्पादन घेतले. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले.

विद्यापीठाच्या वाणाचा प्रयोग

  • मागील खरिपात सुपारी व मसाला पिके संचालनालय, कालिकत यांच्याद्वारे संचालित उद्यानविद्या विकासासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विकसित ‘पीडीकेव्ही वायगाव’ या हळदीचे बियाणे प्रयोगासाठी देण्यात आले. त्यात कुरकुमिनचे प्रमाण अधिक आहे.
  • हळद हे किमान नऊ महिने दीर्घ मुदतीचे पीक आहे. हा कालावधी शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यासाठी काहीवेळा अडचणीचा ठरत असतो. त्यावर मात करीत लागवडीची योग्य वेळ साधत संतोष यांनी मागील हंगामात सुमारे सात महिन्यात पीक काढणीस आणले. शेतकऱ्यांना त्याचे दर्जेदार बेणे पुरविण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. आज स्वत:ची गरज भागवून सुमारे ७० क्विंटल बेणे त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

हळदीनंतर कलिंगड

  • संतोष सांगतात की हळदीच्या काढणीनंतर पुढील खरीप हंगामाची मशागतीची कामे उरकायची असल्याने दुबार पीक घेणे शक्य होणार नाही अशी आधी धारणा होती. मात्र काढणी लवकर झाल्याने शेत जानेवारी महिन्यामध्येच खाली झाले. दरम्यान जवळच्या मित्रांकडून कलिंगडाच्या रोपांबाबत विचारणा झाली. प्रयोग करून बघावा या हेतूने त्वरित तयारी दर्शवली. त्यानुसार १५ फेब्रुवारीच्या दरम्यान ठिबक सिंचनावर लागवड केली. व्यवस्थापन चांगले ठेवल्याने दीड एकरांत सुमारे २५ टन उत्पादन मिळाले.
  • हळदीच्या शेतात घेतलेल्या फळांचा गोडवा अधिक असल्याचे जाणवले. सुमारे १५ एप्रिलपासून काढणी सुरु झाली. परंतु कोरोना लॉकडाऊनमध्ये वाहतूक व विक्रीस येणाऱ्या अडचणी पाहता सुरुवातीचा तोडा विनामूल्य वाटप करून टाकला. फळांचा गोडवा आणि उच्च दर्जा पाहता मग हळूहळू खरेदीसाठी शेतात ग्राहकांची रीघ लागली. त्यातून १० रुपये प्रति किलो दराने सुमारे २० टन थेट विक्री झाली. दोन लाख रुपये उत्पन्न संकटात हाती आले.

विद्यापीठाकडून मार्गदर्शन व सन्मान

  • संतोष यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटी, शेतकरी चर्चासत्र, दूरध्वनी आदी माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, डॉ. विजय काळे, डॉ. अभय वाघ, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ गजानन तुपकर यांचे मार्गदर्शन लाभते. विद्यापीठ विकसित व शिफारसीत वाण व तंत्रज्ञान वापराला संतोष यांची नेहमीच पसंती असते.
  • विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, सुपारी व मसाला पिके संचालनालयाचे संचालक डॉ. होमी चेरीयन यांचे ते आभार व्यक्त करतात. परिसरातील शेतकऱ्यांसाठी घुगे यांच्या शेतात शेतीशाळाही आयोजित झाली आहे. यावर्षी नुकत्याच पार पडलेल्या मसालावर्गीय व औषधी व सुगंधी वनस्पती विषयावर आयोजित राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्र व प्रदर्शनामध्ये संतोष यांना ‘सर्वोत्कृष्ट हळद उत्पादक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सफेद कांदा व मोसंबी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विकसित अकोला सफेद या कांदा वाणाचा प्रयोगही अर्ध्या एकरांत यंदा केला. त्याचे पाच टन उत्पादन मिळाले. मोसंबीचेही त्यांना प्रति झाड १०० किलोपर्यंत उत्पादन मिळते. येत्या काळात भाजीपाला पिकांच्या दर्जेदार उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करण्याचा मानस आहे.

संपर्क- संतोष घुगे- ९४२१७४७५३०, ७७२१९९५५७७
डॉ. विजय काळे-८२७५५३११८५४
प्राध्यापक), उद्यानविद्या विद्या शाखा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...