हळदीला मिळाली आंतरपिकांची जोड

सातत्याने दरामध्ये होणाऱ्या चढ उतारामुळे खानापूर (ता.वाई,जि.सातारा) येथील सागर धनसिंग जाधव यांनी हळदीमध्ये आंतरपिकांचे नियोजन केले. हळदीमध्ये जाधव हे कोथिंबीर, घेवडा लागवड करतात.
Sagar Jadhav showing a bunch of turmeric in his field
Sagar Jadhav showing a bunch of turmeric in his field

सातत्याने दरामध्ये होणाऱ्या चढ उतारामुळे खानापूर (ता.वाई,जि.सातारा) येथील सागर धनसिंग जाधव यांनी हळदीमध्ये आंतरपिकांचे नियोजन केले. हळदीमध्ये जाधव हे कोथिंबीर, घेवडा लागवड करतात. याचबरोबरीने त्यांनी पपईचे चांगले उत्पादन घेतले आहे. गाव परिसरामध्येच शेतमालाची थेट विक्री करत त्यांनी उत्पन्नवाढीचा स्त्रोत बळकट केला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हा हळद उत्पादनाचे आगर समजले जातो. एकट्या वाई तालुक्यात सुमारे ९०० हेक्टरवर हळद लागवड होते. मात्र दरातील घसरणीमुळे हळद पिकातील नफा कमी होत आहे. यावर उपाय म्हणून खानापूर (ता.वाई) येथील सागर धनसिंग जाधव या युवा शेतकऱ्याने सेंद्रिय हळदीच्या बरोबरीने आंतरपीक म्हणून कोथिंबीर, घेवडा आणि पपई लागवडीचे नियोजन केले. जाधव यांनी दोन वर्षांचा अॅग्री डिप्लोमा केला आहे. शिक्षणानंतर नोकरी न करता २००४ पासून शेती करण्यास सुरूवात केली. जाधव यांची एकूण सात एकर बागायती शेती आहे. यामध्ये साधारणपणे एक ते सव्वा एकर हळद, २० गुंठे आले आणि एक एकर ऊस आदी पिकांचे नियोजन असते. सागर जाधव यांनी २००७-०८ मध्ये सव्वा एकरात हळद लागवड केली होती. या पिकासाठी त्यांनी ५२ हजार रुपयांचे शेणखत, सहा हजार रुपयांचे लेंडी खत, ४८ हजार रुपयांचे बेणे तसेच आंतरमशागत, पीक व्यवस्थापनावर दीड लाख रुपये खर्च झाला होता. यावेळी त्यांना ३० क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन आणि प्रति क्विंटल सात हजार दर मिळाला होता. हळदीतून दोन लाख दहा हजार रुपये मिळाले, मात्र खर्च वजा जाता अवघे ५० हजार रुपये हाती शिल्लक राहिले. दहा महिने कष्ट करून हळद पिकात अल्पप्रमाणात नफा शिल्लक राहिला. उत्पन्न वाढीसाठी त्यांनी पुढील टप्यात सेंद्रिय पद्धतीने हळदीचे उत्पादन आणि आंतरपिकांच्या लागवडीचे नियोजन केले. शेतीला पूरक व्यवसाय आणि पुरेसे शेणखत उपलब्ध होण्यासाठी जाधव यांनी चार म्हशी आणि एका देशी गाईचे संगोपन केले आहे. शेणखताबरोबरच महिन्याकाठी दुधाचे चार हजारांचे उत्पन्न मिळते. हळदीमध्ये आंतरपिकांचे नियोजन  हळद पिकातून मिळणारे उत्पन्न आणि दर लक्षात घेऊन जाधव यांनी सेंद्रिय पद्धतीने हळद पीक व्यवस्थापनाचा निर्णय घेतला. शेणखताला पर्याय म्हणून त्यांनी शेतात मेंढ्या बसविण्याचा पर्याय निवडला. पीक व्यवस्थापनामध्ये जीवामृत, दर्शपर्णी, ताक यांची फवारणी, आळवणीसाठी वापर केला जातो. तसेच हळद पिकामध्ये आंतरपिकांच्या लागवडीस सुरवात केली. हळदीला ठिबक सिंचन केले. कोथिंबिरीचे आंतरपीक 

  • साधारणपणे हळदीची १५ ते ३० मे दरम्यान लागवड होते. लागवडीसाठी साडेतीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार करून त्यावर धने विस्कटून दिले. त्यानंतर गादीवाफ्यावर दोन ओळीत एक फुटाचे अंतर ठेऊन हळद बेण्याची लागवड केली जाते.
  • जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कोथिंबिरीची काढणीस आली. खानापूर रस्त्यावरील स्टॉल तसेच वाई बाजार समितीत विक्री केली. या काळात कोथिंबिरीला चांगला दर मिळाल्यामुळे खर्च वजा जाता दोन महिन्यात चाळीस हजारांचे उत्पन्न मिळाले.
  • घेवड्याचे आंतरपीक 

  • हळदीच्या गादीवाफ्यावर धने पेरणीच्या बरोबरीने दर पाच फूट अंतरावर वरुण घेवड्याची टोकण केली.
  • हळदीच्या बरोबरीने घेवड्याला जीवामृत तसेच दशपर्णी अर्काची फवारणीचे नियोजन केल्याने पीक चांगले आले.
  • साधारणपणे दोन ते अडीच महिन्यात घेवड्यातून पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
  • पपई लागवड  सागर जाधव यांनी २०१९ मध्ये पन्नास गुंठे क्षेत्रावर हळद लागवड केली, मात्र काही कारणामुळे हळदीची चांगली उगवण चांगली नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी हळदीमध्ये आंतर पीक म्हणून पपई लागवडीचे नियोजन केले.

  • मे महिन्यात हळद लागवडीसाठी उताराला आडवे साडे तीन फूट रुंदीचे गादी वाफे तयार करून हळदीच्या बेण्याची लागवड केली.
  • ऑगस्ट महिन्यात एक आड एक गादीवाफ्यामध्ये पपई रोप लागवड करताना दोन रोपात सात फुटांचे अंतर ठेवले. पपई रोपांना देखील जिवामृत तसेच दशपर्णी अर्काचा वापर करण्यात आला. ठिबक सिंचनातून पाणी व्यवस्थापन करण्यात आले.
  • जानेवारी महिन्याच्या शेवटी हळदीची काढणी करण्यात आली. पन्नास गुंठ्यातून वाळलेल्या हळदीचे २५ क्विंटल उत्पादन मिळाले. दर कमी असल्याने हळदीची विक्री न करता वेअर हाऊसमध्ये ठेवली आहे.
  • हळद काढणी केल्याने गादीवाफे सपाट झाले. फक्त पपईच्या ओळी शेतात राहिल्या. पपईच्या दोन रांगांमध्ये हलकी नांगरटकरून फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राने घेवड्याची पेरणी केली. मार्च ते एप्रिल महिन्यात घेवड्याच्या हिरव्या शेंगांची तोडणी सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात गाव परिसरातील रस्त्यावर स्टॉलवर थेट ग्राहकांना घेवडा विक्री केली.यातून खर्च वजा जाता चाळीस हजाराचे उत्पन्न मिळाले.
  • घेवडा काढल्यानंतर पपईच्या मधल्या पट्यात शेपू, मेथीची लागवड केली होती.परंतु ही पिके फारशी चांगली आली नाहीत. त्यामुळे हलकी नांगरट करून जूनच्या पहिल्या आठवड्यात ट्रॅक्टर चलीत पेरणी यंत्राने सोयाबीनची पेरणी केली. पपईचे पीक मोठे झाल्याने सोयाबीनवर सावली झाली. तरी देखील सध्या पीक शेंगाच्या अवस्थेत आहे.
  • पपईचे जूनपासून उत्पादन सुरू झाले. लॉकडाऊनमुळे कवठे रस्त्यावर स्टॉल उभा करून पवार यांनी पपईची थेट ग्राहकांना विक्री सुरू केली. सध्या दररोज १०० फळांची वजनानुसार चार प्रकारात प्रतवारीकरून विक्री केली जाते. वजनानुसार २० ते ५० रुपये असा दर मिळतो. सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापन असल्याने फळाला चांगली गोडी आहे. दररोज पपई विक्रीतून खर्च वजा जाता दोन हजारांचे उत्पन्न मिळत आहे.
  • थेट विक्रीवर भर  जाधव यांच्या गावापासून चार किलोमीटर अंतरावर वाई-सुरूर रस्त्यावर मॅाल आहे. या मॅालमध्ये परिसरातील गावांमधून नागरिक खरेदीसाठी येत असतात. हे लक्षात घेऊन सागर यांनी या रस्त्यावर स्टॉल उभारून पपईची थेट ग्राहकांना थेट विक्री सुरू केली. सकाळी लवकर सागर आणि त्यांच्या पत्नी सौ.निशा शेतातील पपईची तोडणी करतात.त्यानंतर पपईची क्रेटमध्ये प्रतवारीकरून सकाळी दहा वाजता सागर स्वतः ट्रॅक्टरमधून क्रेटची वाहतूक करून कवठे रस्त्यावरील स्टॉलवर दररोज विक्री करतात. आत्तापर्यंत थेट विक्रीतून दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. पुण्यामध्ये स्थायिक असलेला त्यांचा भाऊ संदीप याने लॉकडाऊनच्या काळात सोसायटी आणि परिसरात थेट ग्राहकांना पपई विक्रीकरून २५ हजारांचे उत्पन्न मिळवून दिले. शेतकरी गटाची सुरवात  सागर पवार यांना पीक नियोजनासाठी वाई तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते. दहा वर्षापूर्वी सागर जाधव यांनी गावातील दहा तरुण शेतकऱ्यांच्या बरोबरीने भैरवनाथ स्वयंसहायता समूह बचत गटाची स्थापना केली. गटातील सदस्य प्रत्येक महिन्याला ५०० रुपयांची बचत करतात. या बचतीमधून गटाने हळद शिजवण्याचा कुकर घेतला आहे. हळद काढणीच्या काळात शेतकऱ्यांना हा कुकर भाडेतत्वावर दिला जातो. यातून गटाला दरवर्षी वीस हजारांची मिळकत होते. या मिळकतीमधून गटातील सदस्यांना एक टक्का व्याजदराने दीड लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. संपर्क- सागर जाधव, ७०२८३८८२५४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com