शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
अॅग्रो विशेष
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले आर्थिक स्थैर्य
सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील विनायक व माणिक पाटील यांनी द्राक्ष पिकाच्या काटेकोर व्यवस्थापनातून निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेतही आपली ओळख निर्माण केली आहे.
सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील विनायक व माणिक पाटील यांनी द्राक्ष पिकाच्या काटेकोर व्यवस्थापनातून निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेतही आपली ओळख निर्माण केली आहे. वडिलोपार्जित अर्ध्या एकर द्राक्ष बागेपासून आज हे बंधू १६ एकर द्राक्ष बागेपर्यंत पोचले आहेत. शेती उत्पन्नातून आजवर २९ एकर शेती खरेदी केली. शिलकीतून घर खर्चासह, आरोग्य, नवीन यंत्रसामग्री खरेदीसाठी रक्कम बाजूला ठेवली जाते.
तासगाव तालुक्याचा पूर्व भाग अवर्षणग्रस्त असला तरी आज तासगाव नावासोबतच डोळ्यासमोर उभी राहतात, ती रसाळ मधुर द्राक्षे. तासगाव-आटपाडी राज्यमार्गावरील वायफळे गावातील विनायक वसंत पाटील हे प्रगतिशील शेतकरी. पूर्वी शेती पावसाच्या भरवशावर असल्याने पिकांची शाश्वती नसायची.
कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यातही चिकाटीने विनायक यांचे एम. ए. (इतिहास), माणिक यांचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. १९७५ मध्ये सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पासाठी पाटील यांनी चांगल्या प्रतीची शेती प्रकल्पात गेली. माळरानाच्या राहिलेल्या शेतीला पाण्याची सोय झाली. १९९०-९१ पासून विनायक आणि त्यांचे बंधू माणिक हे दोघे मिळून शेती पाहतात. द्राक्षाने त्यांना आर्थिक स्थैर्यांबरोबरच चांगले नावही दिले आहे. सध्या विनायक पाटील हे द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक आहेत.
वडिलांनी द्राक्ष शेतीस केली सुरुवात
गावात १९८२ च्या दरम्यान कै. नारायण पाटील पहिली द्राक्ष बाग लावली. त्यानंतर परिसरात द्राक्ष शेती हळूहळू वाढू लागली. दोन पैसे अधिक मिळत असल्याने आपणही द्राक्ष लागवड करावी, असे स्वप्न वडिलांनी पाहिले. १९८८ मध्ये त्यांनी अर्धा एकर द्राक्ष बाग लावली. त्यातून पैसे मिळू लागले. १९९० मध्ये विनायक यांनी जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला. सलग पाच वर्षे स्वतः ट्रॅक्टर घेऊन दुसऱ्याच्या शेतात मशागतीची कामे करण्यास सुरुवात केली. त्यातून आर्थिक हातभार लागू लागला.
विनायक पाटील सांगत होते, शेती संपूर्ण माळरान होती. ती पिकाखाली आणण्यासाठी पैशांची गरज होती. द्राक्ष शेतीतून मिळणारे पैसे आणि ट्रॅक्टरच्या कामातून येणारी मिळकत यातून शेती सुपीक करण्याचे नियोजन केले. दरम्यान, सिद्धेवाडी तलावाचे काम पूर्ण झाले होते. पाणी कमी झाल्यानंतर त्यातील गाळ शेतात टाकून घेतला. त्यानंतर १९९५ मध्ये पुन्हा नव्याने एका एकर द्राक्ष बाग लावली. पुढे येणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी एक ते दीड एकर द्राक्ष वाढवत नेली. आज सोळा एकर द्राक्ष बाग उभी आहे. सुरुवातीच्या तीन वर्षे काळात बेदाणा तयार केला. मात्र परंतु पळशी (ता. खानापूर) येथील द्राक्षाची निर्यात करणाऱ्या शेतकरी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष निर्यातीसाठी व्यवस्थापन सुरू केले. कै. मल्हारी माळी (सावळज) यांच्याकडून ‘माणिक चमण’ या जातीच्या द्राक्षासाठी मार्गदर्शन घेतले. मात्र २००३ मध्ये मोठा दुष्काळ पडल्याने जुनी दीड एकर द्राक्ष बाग काढून टाकावी लागली. दुष्काळाशी सामना करण्याची ताकद आणि शिकवण वडिलांनी दिल्याने आम्ही भावंडे कधीच हतबल झालो नाही. उलट हिरिरीने मार्ग काढण्यासाठी उभा राहिलो. त्यासाठी उपयोगी आले ते साठवलेले पैसे.
साठवणीची आठवण हवीच...
दरवर्षी पिकातून आलेल्या पैशातून काही रक्कम साठवली जातेच. या शिलकीतून शेती विकत घेण्याचे नियोजन असते. सहा वर्षांपूर्वी गावातच २० एकर शेती विकत घेतली. गेल्या वर्षी जत तालुक्यातील कुंभारी येथे नऊ एकर शेती विकत घेतली.
-१५ एकरमध्ये ज्वारी, गहू, उडीद, भुईमूग, मका अशी विविध पिके घेतली जातात. प्रामुख्याने घरगुती खाद्यासाठी त्यांचे नियोजन असले, तरी अधिक उत्पादनाची विक्री केली जाते. हा पैसाही घरगुती खर्चासाठी वापरला जातो.
अधिक उत्पादनासोबत सुपीकताही जपायला हवी
माणिक पाटील सांगतात, की अधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. मात्र यामुळे जमिनीची सुपीकता बिघडणार नाही, याकडे जातीने लक्ष देतो. एक वर्षी उत्पादन येण्यापेक्षा त्यात सातत्य राहणे एकूण अर्थकारणासाठी गरजेचे असते. सुपीकतेसाठी शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर जास्त वापर करतो. मातीतील सेंद्रिय कर्ब जपल्याने पहिल्यापासून द्राक्षाचे निर्यातक्षम स्थिर उत्पादन ठेवण्यात यश आले आहे. उत्तम दर्जामुळे मागणीही चांगली राहते.
एकत्र कुटुंबाचा फायदा
शेतीचा विस्तार वाढला आहे. शेती एकत्रित असली तरी कामाची जबाबदारी विनायक आणि माणिक यांच्यात अर्धी अर्धी विभागलेली आहे. शेतीतील कामांचे नियोजन रोज संध्याकाळी केले जाते. त्यानुसार कामे पूर्ण करून घेणे सोपे होते. शेती कामासाठी सर्व प्रकारची आधुनिक यंत्रे हळूहळू घेतली आहेत.
मुलांचे शिक्षण सुरू
विनायक पाटील यांची मुलगी श्रद्धा नववीत आहे, तर मुलगा शिवम हा लहान आहे. माणिक यांची मुलगी मेघा ही बी. एस्सी.चे (कृषी) शिक्षण घेत असून, प्राजक्ता अकरावीत आणि मुलगा ऋतुराज नववीत शिकत आहे.
शेतीतून मिळणाऱ्या निव्वळ नफ्याची विभागणी
- विनायक पाटील यांचे संयुक्त कुटुंब आहे. कुटुंबात लहान-मोठे मिळून ११ सदस्य आहेत.
- शिक्षण, घरखर्च आणि आरोग्यासाठी - ३० टक्के रक्कम
- पुढील वर्षीच्या द्राक्ष पिकासाठी - २० टक्के
- घेतलेली शेतीच्या डेव्हलपिंगसाठी - १० टक्के
- नवीन अवजारांसाठी - १० टक्के
- वैयक्तिक विमा - १० टक्के
- आणीबाणीच्या प्रसंगी - २० टक्के
अशी आहे द्राक्षशेतीचे गणित
- द्राक्षे : १६ एकर
- जाती : माणिक चमन (६ एकर), सुपर सोनाका (४ एकर), आर. के. सीडलेस (३ एकर) एस.एस. एन. सीडलेस (एक एकर), २ ए -क्लोन (२ एकर)
- निर्यातक्षम क्षेत्र : १० एकर
- एकरी सरासरी उत्पादन : १० टन
- निर्यातक्षम द्राक्षासाठी उत्पादनखर्च : एकरी चार ते साडेचार लाख रुपये.
- दर : प्रति किलोस ७० ते ८० रुपये
- एकूण उत्पन्न : साडेसात लाख ते आठ लाख
- निव्वळ नफा : एकरी ४ लाखांपर्यंत.
- स्थानिक बाजारपेठेसाठी द्राक्षाचे क्षेत्र : ६ एकर
- एकरी सरासरी उत्पादन : १५ टन
- दर : प्रति किलोस ४० ते ५० रुपये
- एकूण उत्पन्न : साडेपाच ते सहा लाख
- उत्पादन खर्च : एकरी अडीच ते तीन लाख खर्च
- निव्वळ नफा : एकरी ३ लाख.
आणीबाणीसाठी २० टक्के राखीव
द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे पिकांचे नुकसान होते. त्यानुसार उत्पादनामध्ये घटही होते. दरामध्येही चढउतार होत असतात. त्यानुसार उत्पन्न कमी जास्त होते. म्हणूनच आणीबाणीच्या स्थितीसाठी २० टक्क्यांची रक्कम दरवर्षी शिल्लक ठेवली जाते.
प्रतिक्रिया
द्राक्ष हे नगदी पीक असून, संवेदनशील असल्याने व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल दरवर्षी करावे लागतात. दरामध्ये होणाऱ्या चढउताराशी जुळवून अनेक खर्चातही बदल करावा लागतो. आजवर पाण्याची टंचाई अधूनमधून भासत असे. मात्र यंदा टेंभू योजनेचे काम पूर्ण झाल्याने सिद्धेवाडी तलाव भरून राहील, ही आशा आहे.
- माणिक पाटील
संपर्क - विनायक वसंत पाटील, ८२७५०३१५९९
फोटो गॅलरी
- 1 of 670
- ››