Agriculture news in marathi success story of varud village farmers from jalana district | Agrowon

एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत शेतीकडे वाटचाल

संतोष मुंढे
शुक्रवार, 31 जुलै 2020

गावातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामातील विविध पिके घेतात. कापूस, मका, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, घरच्या गरजेनुसार तीळ, चवळी, भुईमूग, मटकी आदी विविधता गावातील शेतकऱ्यांकडे पाहण्यास मिळते.

हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड, सिंचनासाठीचे स्रोत वाढविणे, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, तंत्रज्ञानाचा अवलंब आदींच्या माध्यमातून वरुडी (जि. जालना) गावातील शेतकऱ्यांची शाश्वत व प्रगतिशील शेतीकडे वाटचाल सुरू आहे. कृषी विज्ञान केंद्र, जालना व कृषी विभागाचे मोठे साह्य मिळत असल्याने ही वाटचाल अधिक सुकर झाली आहे.

जालना जिल्ह्यात वरूडी (ता. बदनापूर) येथील गावातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामातील विविध पिके घेतात. कापूस, मका, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, घरच्या गरजेनुसार तीळ, चवळी, भुईमूग, मटकी आदी विविधता गावातील शेतकऱ्यांकडे पाहण्यास मिळते. रेशीम उद्योगासाठी तुतीसह फळपिकांमध्ये मोसंबी या प्रमुख पिकासह डाळिंब, सीताफळ, चिंच, केसर आंबा अशीही समृद्धी दिसून येते.

शेतीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुकूटपालन, रेशीम उद्योग आदी पूरक उद्योगांसह नजीकच्या औरंगाबाद, जालना या औद्योगिक शहरात काही अल्पभूधारक शेतकरी व मजूर कुटुंबातील सदस्यांनी रोजगाराचा मार्ग अवलंबिला आहे.

सिंचनाचा मार्ग
पूर्वी पाऊस चांगला पडला तर नदी, नाल्यांना मग विहिरींनाही पाणी यायचे. अलीकडील वर्षांत पावसाची अनियमितता वाढली. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी शेततळ्याचा मार्ग अवलंबिला. सन २०१८-१९ मध्ये कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून जवळपास ४२ शेततळी पूर्ण झाली. सुमारे २५ शेततळ्यांचे अस्तरीकरण पूर्ण झाले असून काही शेतकऱ्यांनी पदरमोड करून हे काम करून घेतले आहे.

गावातील फळबाग व पूरक व्यवसाय दृष्टिक्षेपात

 • १०० एकर मोसंबी. नव्याने सहा हेक्टरवर लागवड.
 • ५० ते ६० एकर डाळिंब. १५ एकर सीताफळ
 • नव्याने केसर आंबा लागवड.
 • सुमारे ४० शेतकऱ्यांकडे दुग्धव्यवसाय
 • २५ शेतकऱ्यांकडे दहापेक्षा जास्त तर किमान ५० महिलांकडे एक ते दोन शेळ्या
 • २५ शेतकरी करतात मत्स्यपालन
 • काही शेततळ्यात शिंपले टाकून मोत्याची शेती करतात.
 • १० ते २० जणांकडे कुकूटपालन
 • पाच शेतकऱ्यांकडे रेशीम उद्योग

रेन गेज व हवामानाचा अंदाज...
खासगी कंपनीच्या सल्ल्याने सहा वर्षापासून प्रयोगशील शेतकरी जयकिसन शिंदे शेतकऱ्यांना हवामानाविषयी माहिती शेअर करता. पाऊस, गारपीट, सोसाट्याचा वारा, उष्णता, आर्द्रता, धोक्याचे संकेत यांची व्हॉटस ॲप ग्रुपद्वारे माहिती दिली जाते. कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), खरपुडी, जि. जालना यांच्याकडील 'रेन गेज' सुविधेमुळे पावसाची नोंद केली जाते.

केव्हीकेचे उपक्रम
केव्हीके, जालना तर्फे निक्रा प्रकल्पांतर्गत वरुडी गाव दत्तक घेण्यात आले आहे. त्यामाध्यमातून चारा लागवड, विविध पूरक व्यवसाय, मिश्रपीक, जलसंधारण, पाणी अडवा, पाणी जिरवा आदी उपक्रम राबवण्यात येतात. त्यातून शिवार शाश्वत करण्यासह शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. याला कृषी विभागाच्या शेततळे, फळबाग लागवडीसह विविध योजनांची जोड देण्यात येते.

ठळक बाबी

 • सन २००२ मध्ये १२५ एकरांवर कृषी विभागाकडून बांधबंदिस्ती
 • त्याचवेळी जलपुनर्भरणचा जयकिसन शिंदे यांच्याकडून प्रयोग
 • शेतकरी पुरुष व महिला बचत गटही गावात
 • गटाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सहकार्याने पहिल्यांदाच बांधावर खत प्रयोग

प्रतिक्रिया
बांधबंदिस्ती, जलपुनर्भरण, हवामानाचा अंदाज, बाजारभाव, मत्स्यपालन, शेळीपालन, शेती उत्पादन खर्च नियंत्रित ठेवण्याच्या पद्धती, नवतंत्रज्ञानाचा वापर, केव्हीकेचे मार्गदर्शन व कृषी विभागाच्या समन्वयातून गावाचे शिवार शाश्वततेकडे वाटचाल करते आहे
जयकिसन शिंदे, ९५९५६१४०७० (प्रयोगशील शेतकरी)

तीनशे मोसंबीची झाडे आहेत. केशर आंब्याची नव्याने लागवड केली आहे. अर्ध्या एकरात शेततळे व त्यात यंदा शिंपले टाकून मोत्याची शेती करण्याकडे वळलो आहे.
- सुभाष विष्णू शिंदे,(वरुडी)

सव्वा एकरात सीताफळाची बाग आहे. तीन वर्षापासून उत्पादन देणाऱ्या या बागेतून पहिल्या वर्षी पन्नास हजार, दुसऱ्या वर्षी ८० हजार तर तिसऱ्या वर्षी सव्वा लाखांचे उत्पन्न मिळाले. सोशल मीडियाचा वापर व थेट विक्रीवर भर आहे. चार वर्षांपासून मोसंबीच्या २७५ झाडांची व दोन वर्षापासून डाळिंबाच्या साडेपाचशे झाडांची जोड दिली आहे. सीताफळाची नर्सरी असून रोपांची विक्री करतो.
- सुदाम देवराव शिंदे, ८६६८३८३२१६

चार वर्षांपासून रेशीम उद्योगाकडे वळलो आहे. पहिली दोन वर्षे समाधानकारक यश मिळाले नाही. गेल्या दोन वर्षांत वर्षाला प्रति २०० अंडीपुंजांच्या चार बॅचेसमधून किमान दोन लाखांचे उत्पन्न मिळते आहे. आम्ही दोघे भाऊ शेंद्रा एमआयडीसीमध्ये दहा वर्षांपासून खासगी कंपनीत काम करून शेतीतही चांगले लक्ष घालतो आहे.
- शिवनाथ शिंदे, (वरुडी)

एकत्र कुटुंबातील शेतीला अलीकडे देशी कुकूटपालनाची जोड दिली आहे. दहा पक्षांपासून सुरू केलेला व्यवसाय ५० ते ६० पक्षांपर्यंत पोचला आहे. तीन वर्षांपूर्वी मोसंबीची चारशे झाडे लावली आहेत. दोन गायींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायही सुरू केला आहे.
- शिवाजी रामनाथ शिंदे

सन २००६ पासून दूध संकलन करतो. घरच्या प्रति दिन ५० दुधासह ३०० लीटर दुधाचे गावातून संकलन होते. सुमारे ८० शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. दीड एकर शेतीला कुकूटपालनाचाही जोड दिली आहे
- परमेश्वर कुंडलिक शिंदे

वातावरण बदलाच्या अनुषंगाने शेतीत विविध प्रयोग करून शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम कृषी विज्ञान केंद्रातर्फे होत आहे. यापुढे एकात्मिक शेती पद्धतीवर भर देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत ठेवण्याचे प्रयत्न आहेत. गावातील शेतकरी प्रयोगशील असून त्यांचे सहकार्य लाभत असल्यानेच पुढे जाणे शक्य
होत आहे.

- पंडित वासरे (कृषी अभियंता, प्रकल्प अधिकारी, निक्रा प्रकल्प, केव्हीके, खरपुडी जालना)

कृषी विभागाच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. वरुडी गावातील शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळतो आहे. यंदा बांधावर शेतकरी गटामार्फत खत पोचविण्याचा उपक्रम राबविला. यंदा आजवर सुमारे ५२० मिलिमीटर पाऊस गावाशिवारात पडला आहे. खरीप पीक स्थिती चांगली असून आंतरपीक पद्धतीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी स्वीकार केला आहे.
- बाळासाहेब शिंदे, (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...