भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गती

डोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे या युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन केले आहे.
yogesh with his father in his lemon orchard
yogesh with his father in his lemon orchard

डोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे या युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन केले आहे. दर्जेदार उत्पादनामुळे ग्राहकांच्याकडून भाजीपाल्याला चांगली मागणी असते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन योगेशने अकोला शहरात भाजीपाला बास्केट विक्रीला सुरुवात केली. लिंबू बाग आणि भाजीपाला शेतीवर कुटुंबाचे अर्थकारण चांगल्या पद्धतीने सुरू आहे. शेतीचे क्षेत्र कमी असले तरी मेहनतीची तयारी आणि बाजारात जे विकते तेच पिकवत असाल तर अपेक्षित आर्थिक नफा मिळविता येतो. हे बघायचे असेल तर डोंगरगाव (ता.जि.अकोला) येथील योगेश रामराव नागापुरे या युवा शेतकऱ्याची शेती पाहावी लागले. केवळ एक एकर क्षेत्रामध्ये बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन नागापुरे कुटुंबाने केले आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्यांना भाजीपाला शेतीने दुसरीकडे काम करण्यासाठी सवड दिलेली नाही. लिंबू बाग आणि भाजीपाला शेतीवरच कुटुंबाचे अर्थकारण चांगल्या पद्धतीने सुरू आहे. डोंगरगाव हे अकोला तालुक्यातील गाव. या गाव शिवारातील प्रयोगशील शेतकरी रामराव नागापुरे. त्यांना योगेश आणि मुकेश ही दोन मुले. एकूण सहा सदस्यांचे हे कुटुंब. मोठा मुलगा योगेश हा एमए प्रथम वर्षापर्यंत शिकल्यानंतर पूर्णवेळ शेती नियोजनात उतरला. गावापासून काही अंतरावरच कुटुंबाची पावणे दोन एकर शेती आहे. यांपैकी पाऊण एकरात लिंबू लागवड आहे. तर उर्वरित एक एकरात वर्षभर भाजीपाला, वेलवर्गीय पिकांची लागवड असते. थेट भाजीपाला विक्रीवर भर रामराव हे अनेक वर्षांपासून बाजारपेठेचा अंदाज घेत विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. उत्पादित भाजीपाल्याची परिसरातील गावांमध्ये जाऊन थेट ग्राहकांना विक्री केली जाते. स्वच्छ, ताजा भाजीपाला ग्राहकांना गावामध्येच मिळत असल्याने त्यांचा शेतमाल हातोहात खपतो. अलीकडे भाजीपाला शेतीची सूत्रे योगेशने हाती घेतली. तो परिसरातील बाजाराची दिशा ओळखून पीक नियोजन करतो. उत्पादित शेतमालाची परिसरातील गावांच्यामध्ये तसेच अकोला बाजारपेठेत विक्री केली जाते. याचबरोबरीने आजही रामराव यांचे फिरते भाजीपाला विक्रीचे काम सुरू असते. या विक्रीतून ते दररोज हजार रुपयांपर्यंत उलाढाल करतात. वर्षभर रोजगार निर्मिती लिंबू बाग आणि भाजीपाला शेतीने नागापुरे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले. त्याचबरोबरीने वर्षभर किमान तीन मजुरांच्या रोजगाराची सोय उपलब्ध झाली आहे. नागापुरे कुटुंबातील सर्व सदस्य शेतीमध्ये राबत असताना देखील भाजीपाला पिकाच्या व्यवस्थापनासाठी काहीवेळा किमान दोन ते तीन महिला मजूर लागतात. ओळखली मार्केटची गरज

  • नवीन पिढी शेती नियोजनात नव्या विचाराने काम करते आहे, हे योगेशच्या बाबतीतही म्हणता येईल. त्याने काळाची गरज ओळखत वडिलोपार्जित भाजीपाला शेतीला नवी दिशा दिली. भाजीपाला विकायचा म्हणून कधीही कुठले पीक तो लावत नाही. भाजीपाला लागवडीसाठी योगेशकडे एक एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये हंगाम आणि बाजारपेठेत कुठल्या पिकाला कधी चांगला दर मिळतो, याचा अंदाज घेत तो लागवडीचे नियोजन करतो. ही लागवड एकाचवेळी न करता टप्प्याटप्प्याने संबंधित भाजीपाला काढणीला येईल अशा पद्धतीने केली जाते.
  • खरीप, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही हंगामामध्ये कोणत्या भाजीपाल्यास ग्राहकांकडून मागणी आहे, त्यानुसारच लागवडीचे टप्पे ठरतात. विशिष्ट काळात काही विशिष्ट भाज्यांची मागणी राहते, हे लक्षात घेत त्यानुसारही योगेशचे नियोजन ठरते. त्यामुळे भाजीपाल्यातून अपेक्षित नफा मिळतोच. भाजीपाला लागवड केली, परंतु पैसे मिळाले नाहीत, असे कधीही होत नाही. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे टोमॅटोमध्ये काहीसे आर्थिक नुकसान सोसावे लागले.
  • ताजा दर्जेदार भाजीपाला ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला असल्याने आता काही जण योगेशच्या शेतात जाऊन खरेदी करतात. अकोल्याची बाजारपेठ सुद्धा भाजीपाला शेतीसाठी पूरक ठरली आहे. लिंबाची विक्री अकोला बाजारपेठेत होते. काही व्यापारी थेट बागेतून लिंबू खरेदी करतात. दरवर्षी नागापुरे कुटुंब लिंबू विक्रीतून सरासरी ७५ हजार ते एक लाख रूपये तसेच भाजीपाला पिकातून सव्वा लाख रुपयांची उलाढाल करते. लिंबू फळबाग आणि भाजीपाला शेतीने नागापुरे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले आहे.
  • लागवडीचे नियोजन खरीप चवळी, पालक, चुका, गिलके, दोडके, दूधी भोपळा, कारले, फ्लॉवर, टोमॅटो, वांगे, मिरची. हिवाळा वांगी,मेथी,पालक, कोथिंबीर, मुळा, बीट. उन्हाळा गिलके, बरबटी, भेंडी, चवळी, घोळ. लॉकडाउनचा उठवला फायदा

  • मार्चपासून कोरोना लॉकडाउनमुळे अकोला जिल्ह्यातील बाजारपेठ बंद होती. जिल्ह्यातील भाजीपाला बाजार व्यवस्था विस्कळीत झाली. शहरी ग्राहकांना दररोज लागणारा भाजीपाला मिळणे कठीण होऊन बसले होते. अशा काळात योगेशने पुढाकार घेतला. गावातील जय गजानन शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून अकोला शहरात योगेशने आत्मा यंत्रणेच्या सहकार्याने शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारीत भाजीपाला विक्री व्यवस्था उभी केली.
  • कोरोनामुळे ग्राहकांच्यामध्ये काळजीचे वातावरण होते. एप्रिल-मे महिन्यात योगेशने ग्राहकांची गरज लक्षात घेऊन निवडक भाजीपाल्याची बास्केट तयार केली. यामध्ये १२ प्रकारच्या भाज्या होत्या. साडेसहा किलोची बास्केट ५०० रुपये आणि साडेतीन किलोची बास्केट २५० रुपये या दराने अकोला शहरातील ग्राहकांना घरपोच केली जात होती. योगेशने शेतकरी गटाच्या माध्यमातून राबविलेला थेट भाजीपाला विक्रीचा प्रयोग चांगलाच चर्चेत राहिला. खुद्द केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीदेखील योगेशच्या भाजीपाला विक्री व्यवस्थेचे कौतुक करीत इतरांसाठी प्रेरणादायी काम केल्याची पावती दिली.
  • योगेशने गेल्या दोन महिन्यांच्या काळात थेट भाजीपाला विक्रीतून सुमारे ७५ हजार रुपयांची उलाढाल केली. हा अनुभव खूप शिकवून गेल्याचे तो सांगतो. या विक्रीमुळे त्याला दुसरा फायदा असा झाला की, अकोल्यातील वीस नवे ग्राहक त्याच्यासोबत थेट जोडले गेले. आता मोबाईलवर ग्राहकांच्याकडून भाजीपाला बास्केटची ऑडर येते. त्यानुसार योगेश विविध प्रकारचा भाजीपाला ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवितो.
  • संपर्क- योगेश नागापुरे, ९८२२९९८४१२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com