शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोड

खोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप यांनी शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी गवती चहा, कडिपत्ता, शेवगा, गाजर, तुळस पावडर आणि तूप निर्मितीला सुरवात केली.
award for work in agriculture and processing industries.
award for work in agriculture and processing industries.

खोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप यांनी शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी गवती चहा, कडिपत्ता, शेवगा, गाजर, तुळस पावडर आणि तूप निर्मितीला सुरवात केली. कृषी प्रदर्शन तसेच थेट विक्रीवर भर देत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे. भोर (जि.पुणे) तालुक्यातील खोपी गाव शिवारामध्ये भात हे मुख्य पीक. त्याचबरोबरीने काही शेतकरी हंगामी भाजीपाला पिकांची लागवडीकडे वळले आहेत. खोपी गावातील अंजना नारायण जगताप या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील महिला. शेतीची त्यांना पहिल्यापासून आवड, परंतु शेतीसाठी लागणारी पुरेशी साधने उपलब्ध नसल्यामुळे पारंपारिक शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास सुरू केला.  अंजनाताईंच्या कुटुंबाची सात एकर शेती आहे. त्यामध्ये भात, भुईमूग, घेवडा, भाजीपाला लागवड तसेच आंबा, पेरू बाग आहे.  खोपी गावामध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ सेंद्रिय शेती गट स्थापन करण्यात आला. या गटामध्ये सहभागी होण्याची संधी अंजनाताईंना मिळाली. गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीबाबत त्यांना मार्गदर्शन मिळू लागले.  त्यामुळे त्यांनी शेतीमध्ये बदलाला सुरवात केली.  अभ्यासदौऱ्यातून मिळाली दिशा  दोन वर्षांपूर्वी आत्मा अंतर्गत पुणे जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा म्हैसूर येथील सीएफटीआरआय संस्थेमधील संशोधन पहाण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये अंजनाताई सहभागी झाल्या. अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झाल्यामुळे शेतीमधील नवीन प्रयोग, असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे तसेच उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया करण्याची सविस्तर माहिती मिळाली. अभ्यास दौऱ्यामुळे शेतीमध्ये चांगले काम करण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला. विक्रीचे घेतले प्रशिक्षण  गेल्या वर्षी आत्मा, पुणे यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती गटातील प्रयोगशील शेतकरी स्वाती शिंगाडे यांच्यासोबत दिल्ली येथे  आयोजित महिला किसान दिनाच्या कार्यक्रमामध्ये अंजनाताईंना सहभागी होण्याची संधी मिळाली. या ठिकाणी आयोजित प्रदर्शनामध्ये त्यांनी शेतीमालाचे पॅकिंग,लेबलिंग आणि विक्री व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेतली. दिल्लीवरून आल्यानंतर उत्पादित शेतीमालाचे पॅकिंग आणि गटाच्या नावाने लेबलिंग करून गाव परिसर आणि पुणे जिल्ह्यात विक्री करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.   कृषी महोत्सवामध्ये उत्पादनांची विक्री  गेल्या वर्षी आत्मा, पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी सेंद्रिय शेती गटास शेतीमाल विक्रीसाठी दालन उपलब्ध करून दिले. या महोत्सवामध्ये अंजनाताईंनी तयार केलेल्या विविध प्रक्रिया उत्पादनांची चांगली जाहिरात झाली. यामुळे विविध खरेदीदारांशी ओळख झाली. उत्पादनांची चांगल्या प्रकारे विक्री झाली. या महोत्सवात महाराष्ट्र  तसेच परराज्यातील  शेतकऱ्यांनी दालनास भेट दिली होती. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या प्रक्रिया उत्पादनाची माहिती घेतली. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी संपर्क वाढविण्यास सुरवात केली. याचबरोबरीने पुणे शहरामध्ये आयोजित होणाऱ्या विविध धान्य महोत्सवामध्ये   अंजनाताई सहभागी होतात. यातून प्रक्रिया उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळाली.प्रदर्शनात  काही शेतकऱ्यांची प्रक्रिया उत्पादने त्या विकतात. निसर्गोपचार केंद्रातील येथील डॉ. संतोषी चौरजे, डॉ.ज्योती कुंभार यांची देखील विक्रीसाठी मदत होते.  शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी  खोपी गावातील स्वामी समर्थ सेंद्रिय शेती गटांमध्ये २० शेतकरी आहेत. प्रक्रियेसाठी गरजेनुसार अंजनाताई या गटातील शेतकऱ्यांकडून कडीपत्ता, शेवगा, मूग, गाजराची खरेदी करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून गटातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे.    शेतीमध्येही प्रयोगशीलता   अंजनाताईंनी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने शेतीमध्येही पीक बदल केला आहे. खरीप हंगामात एक एकरावर इंद्रायणी भात, भुईमूग अर्धा एकर, घेवड्याची अर्धा एकरावर लागवड असते. याचबरोबरीने काही क्षेत्रावर वांगी,टोमॅटो,मिरची लागवड असते. या पिकांना सेंद्रिय खते, जीवामृताचा वापर केला जातो. रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू लागवड असते. याचबरोबरीने तीन एकर क्षेत्रावर हापूस,केसर आंबा कलमे तसेच पेरू लागवड केली आहे. पेरू लागवडीमध्ये गवती चहा, तुळशीचे आंतरपीक घेतलेले आहे.  विविध पिकांची लागवड  म्हैसूर येथील अभ्यास दौऱ्यावरून आल्यावर मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलामध्ये कोणता प्रक्रिया उद्योग करावा, याबाबत अंजनाताईंनी माहिती घेतली. यासाठी गटातील शेतकऱ्यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून त्यांनी आयुर्वेदिक काढा (चहा) बनविण्याचे ठरविले. यासाठी जाणकारांकडून माहिती घेतली. प्रायोगिक तत्त्वावर घरी हा काढा तयार केला. यामध्ये गवती चहा, तुळस,आले पावडर, लवंग, दालचिनी, कडीपत्ता पावडरीचा वापर केला. ग्राहकांच्याकडून या चहाला चांगली मागणी मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला.  उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेऊन पेरू बागेमध्ये त्यांनी सेंद्रिय पद्धतीने तुळस, कडीपत्ता,गवती चहाची लागवड केली आहे.  घरच्यांची मिळाली साथ ग्राहक तसेच दुकानदारांच्याकडून व्हाट्सॲपद्वारे मागणी नोंदवून घेतली जाते. त्यानुसार उत्पादनांची विक्री केली जाते. सध्या दर महिन्याला १५ किलो प्रक्रिया उत्पादनांची विक्री होत आहे. साधारणपणे ४०० ते  ५०० रुपये किलो या दराने प्रक्रियायुक्त पावडरची विक्री होते. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बनवलेल्या काढ्यास चांगली मागणी होती. दरवर्षी विविध वनस्पतींची पावडर, हंगामी भाजीपाला, हरभरा डाळ तसेच गूळ,काकवी,देशी गाईच्या तूप विक्रीतून दीड लाखांची उलाढाल होते. प्रक्रिया उद्योगामध्ये अंजनाताईंना कुटुंबाची चांगली साथ मिळाली आहे. प्रक्रिया उद्योगाला सुरवात   तीन वर्षापूर्वी अंजनाताईंनी स्वतःच्या शेतीमध्ये तुळस, कडीपत्ता, गवती चहा, शेवग्याची लागवड केली आहे. याच्या पानांची काढणी करून त्यांची पावडर तयार केली जाते. प्रामुख्याने नैसर्गिक पद्धतीने सावलीत पाने वाळवली जातात.त्यानंतर ओव्हनमध्ये काहीवेळ ठेवली जातात. त्यानंतर मोठ्या मिक्सरमध्ये वाळविलेल्या पानांची पावडर तयार केली जाते. सध्या कडीपत्ता पावडर, गवती चहा पावडर, शेवगा पावडर, हुलगा पावडर, गाजर पावडर आणि मोड आलेले मूग अशा उत्पादनांवर त्यांचा भर आहे.   संपर्क ः अंजना जगताप, ९७६३०२२६७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com