पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडा

दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील भाजीपाला लागवडीतून गोळप (ता.जि.रत्नागिरी) येथील पूजा लक्ष्मण झोरे आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण झाल्या. त्याचबरोबरीने त्यांनी दुर्गादेवी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील महिलांना नवी दिशा दिली आहे.
Pooja Zore poultry business
Pooja Zore poultry business

दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील भाजीपाला लागवडीतून गोळप (ता.जि.रत्नागिरी) येथील पूजा लक्ष्मण झोरे आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण झाल्या. त्याचबरोबरीने त्यांनी दुर्गादेवी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील महिलांना नवी दिशा दिली आहे. गोळप (ता.जि.रत्नागिरी) गावशिवारातील गणेशनगर परिसरात लक्ष्मण आणि पूजा झोरे यांनी २०१० साली दीड एकर जमीन विकत घेऊन घर उभारले. याच दरम्यान झोरे कुटुंबांची ओळख ‘उमेद' अभियानाच्या वनश्री आंब्रे यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा झोरे यांनी गावातील १३ महिलांना एकत्र करून दुर्गादेवी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना केली. पूजा झोरे गटाच्या सचिव आहेत. गटातील सदस्यांनी वैयक्तिकरित्या छोटे व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला; मात्र पूजा यांनी परंपरागत दुग्ध व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुग्ध व्यवसायाला सुरवात  पूजा झोरे यांचे सासरे पूर्वी दुग्ध व्यवसाय करत होते. कालांतराने तो बंद पडला. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी पूजाताईंनी २०१४ साली दोन गावठी म्हशी खरेदी केल्या. या म्हशींपासून दिवसाला १० लिटर दूध मिळत होते. दुधाची विक्री गोळप परिसरात होत होती. दुधाला वाढती मागणी असल्याने झोरे यांनी म्हशींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये पशुसंवर्धन योजनेच्या पन्नास टक्के अनुदानातून त्यांनी मुऱ्हा म्हशींची खरेदी केली. त्यावेळी ८० हजार रुपये अनुदान मिळाले. सध्या झोरे यांच्याकडे आठ म्हशी आणि एक गीर गाय आहे. म्हशींचे व्यवस्थापन 

  • कोकणातील वातावरणात मुऱ्हा म्हशी चांगले दूध उत्पादन देतात, असा झोरे यांचा अनुभव आहे. मात्र या म्हशींसाठी खाद्याचे योग्य नियोजन करावे लागते.
  • एक म्हैस दिवसाला सरासरी१५ लिटर दूध देते. सध्या सहा म्हशींपासून सरासरी प्रतिदिन ६० लिटर दूध मिळते. गोळप परिसरात प्रति लिटर ६० रुपये दराने दूध विक्री होते.
  • म्हशींना योग्य प्रमाणात चारा,मका कडबा तसेच पेंड, भुसा एकत्र करून दिला जातो.
  • पशुतज्ज्ञांच्याकडून वेळेवर लसीकरण, औषधोपचार.
  • दर सहा महिन्यांनी दोन किंवा तीन म्हशी गाभण राहतील असे नियोजन.
  • फळ बागायतदार, रोपवाटिकाचालकांना शेणाची विक्री. महिन्याला सहा हजार रुपये शेण विक्रीतून मिळतात.
  • वीस गुंठे क्षेत्रावर मका लागवड. ओला,कोरडा चारा कुट्टी करून म्हशींना दिला जातो.
  • भात बीजोत्पादन ः पूजाताई दरवर्षी दीड एकर भातशेती करतात. यातून घरापूरता तांदूळ होतो. यंदा पूजाताईंना कृषी विभागाकडून बीजोत्पादनासाठी रत्नागिरी ६, ८ या जातीचे बियाणे मिळाले आहे. कुटुंबाची मिळाली साथ  पशुपालन, कुक्कुटपालन आणि परसबागेच्या व्यवस्थापनामध्ये पूजा झोरे यांना पती लक्ष्मण, मुले संतोष आणि अक्षय यांची चांगली साथ मिळाली आहे. प्रत्येकाने आपापली कामे वाटून घेतली आहेत. घरोघरी दूध, भाजी पोचवण्याची जबाबदारी लक्ष्मण यांच्याकडे आहे. गोठा व्यवस्थापन, कुक्कुटपालन आणि भाजीपाला लागवडीमध्ये दोन्ही मुलांची मदत होते. त्यामुळे गेल्या दहा वर्षात शेती आणि पूरक व्यवसायातून वार्षिक उत्पन्नात वाढ होत गेली. संसाराची गाडी सुरळीत ठेवतानाच दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पूजाताईंचा प्रयत्न आहे. कुक्कुटपालनातून उत्पन्नात वाढ  दुग्ध व्यवसायात जम बसल्यानंतर पूजाताईंनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. फेब्रुवारी, २०१९ मध्ये पाली (जि.रत्नागिरी) येथून एका खासगी विक्रेत्याकडून कावेरी जातीची २५ पिल्ले विकत आणली. एक दिवसाचे पिल्लू २३ रुपयांना मिळाले. या पिल्लांचे योग्य व्यवस्थापन ठेवले. साधारणपणे तीन महिन्यानंतर कोंबड्यांची विक्री सुरू केली. कोंबड्यांच्या विक्रीसाठी घराजवळ बॅनर लावला. त्यामुळे अल्पावधीमध्येच सगळ्या कोंबड्यांची ३५० रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. जुलै महिन्यात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यात पूजाताईंनी गावरान आणि कावेरी जातीची २५० पिल्ले आणली. यंदा कोरोना लॉकडाऊनमध्ये सगळ्या कोंबड्या विकल्या गेल्या. यामधून खर्च वगळता ४० टक्के नफा मिळाल्याने पूजाताईंनी हॅचरी युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी पूजाताईंनी एक दिवसांची कावेरी जातीची ५०० पिल्ले आणून त्यांचे महिनाभर संगोपन केले. लसीकरण करून त्यांची परिसरात विक्री केली. यातूनही त्यांना चांगला आर्थिक नफा मिळाला. परसबागेत भाजीपाला लागवड  झोरे यांच्या घराशेजारी काही जमीन शिल्लक होती. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनासाठी उमेद अभियानाने तयार केलेली परसबाग संकल्पना पूजाताईंनी राबवली. परसबाग उभारणीसाठी त्यांना गटातून दहा हजार रुपये मिळाले. पाच गुंठ्यांतील परसबागेमध्ये वाल, भेंडी, गवार, पालेभाजी, मुळा, कोथींबीर, पडवळ, कारली आणि काकडीची लागवड असते. भात कापणी झाली की, लगेच पूजाताई भाजीपाला लागवडीला सुरवात करतात.

  • परसबागेची वर्तुळाकार रचना असते. प्रत्येक भाजीसाठी वेगळी जागा निश्‍चित केली आहे. वाफ्यात शेणखत मिसळून त्यावर बियाण्यांची पेरणी केली जाते.
  • साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांत पालेभाज्या काढणीस सुरवात होते. फळभाज्यांसाठी थोडा जास्तीचा कालावधी लागतो.
  • नोव्हेंबर महिन्यात लागवड केली की पुढे महिन्याभरातच भाजीपाला उत्पादन सुरु होते. सेंद्रिय भाजीपाल्यास चांगली मागणी आहे.
  • भाजीपाला पेरणी ते काढणीपर्यंतच्या कामामध्ये पूजाताईंना त्यांची दोन्ही मुले मदत करतात. नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाला विक्रीतून ३० हजारांचे उत्पन्न मिळते.
  • गोळप परिसरात दुधाची विक्री करताना त्यांचे पती लक्ष्मण हे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे घरोघरी भाजीपाला विक्री करतात.
  • ६पूजाताई गोळप ग्राम संघाच्या अध्यक्षा असल्यामुळे गाव परिसरात त्यांनी केलेल्या उपक्रमाची लगेच माहिती होते. त्याचा भाजीपाला विक्रीस फायदा होतो. यंदा त्यांनी चार गुंठ्यावर हळद लागवड केली आहे.
  • संपर्क ः पूजा झोरे, ९८६०२४९०१८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com