agriculture news in marathi success story of women self help group from jalana district | Agrowon

महिला गटांना मिळाली 'प्रेरणा'

संतोष मुंढे
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

रामनगर (ता.जि.जालना) येथील सौ.उषा चव्हाण-शिंदे यांनी महिला गटाच्या माध्यमातून पूरक व्यवसायाला चालना दिली. जिल्ह्यातील २६ गावातील साडेतीन हजारावर महिलांना गटाच्या माध्यमातून हस्तकला, प्रक्रिया उद्योगासोबत शेतीपूरक उद्योगांना चालना मिळाली आहे.
 

रामनगर (ता.जि.जालना) येथील सौ.उषा संदीपान चव्हाण-शिंदे यांनी गरजू महिलांना एकत्र करत गटाच्या माध्यमातून पूरक व्यवसायाला चालना दिली. याचबरोबरीने उत्पादनांच्या विक्रीचे जाळे तयार केले. जालना जिल्ह्यातील २६ गावातील साडेतीन हजारावर महिलांना गटाच्या माध्यमातून हस्तकला, प्रक्रिया उद्योगासोबत शेतीपूरक उद्योगांना चालना मिळाली आहे.

एकत्र आल्याशिवाय आर्थिक आणि सामाजिक प्रगती होत नाही, हे सूत्र लक्षात घेऊन रामनगर (ता.जि.जालना) येथील सौ.उषा संदीपान चव्हाण-शिंदे यांनी पंचक्रोशीत महिला बचत गटांची बांधणी केली. या गटातून महिला आर्थिकदृष्टया सक्षम होत आहेत. २००९ मध्ये उषा शिंदे यांचा रामनगर येथील संदीपान चव्हाण यांच्याशी विवाह झाला.

जालना शहरात खासगी कंपनीत इलेक्ट्रिशिअन म्हणून काम पाहणाऱ्या संदीपान यांच्यावरच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. उषाताईंना समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी बी.एस.डब्लू ची पदवी घेतली. कुटुंबातील एकच व्यक्‍ती कमावती असल्याने कुटुंबाची गरज म्हणून उषाताईंना घराबाहेर पडणे क्रमप्राप्त होते. शिक्षण आणि समाजकार्याची आवड यातूनच उषाताईंनी २०११ मध्ये गावामध्ये दहा महिलांना एकत्र करून रोशनी महिला बचत गटाची स्थापन केली.

बचतीतून उद्योगाकडे 
रोशनी महिला बचत गटातील प्रत्येक सदस्या दरमहा बचत करू लागल्या. बचतीमधील सातत्यामुळे गटाला पहिल्या टप्प्यात बॅंकेकडून १५ हजारांचे कर्ज मिळाले. मिळालेल्या कर्जाचे समान वाटप करून योग्य कालावधीत गटाने परतफेड केली. यामुळे दुसऱ्या टप्प्यात रोशनी गटाला पुन्हा एक लाख रुपयांचे कर्ज मिळाले. या कर्जातून गटाने शाश्वत रोजगाराच्यादिशेने पाऊल टाकले. बॅंकेकडून कर्ज मिळाल्याने बचत गटातील महिलांनी पूरक उद्योग सुरू करण्याचे नियोजन केले. गटातील सदस्यांनी क्रांतिसिंह बहूद्‌देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनानुसार खरपुडी (जि. जालना) येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार गटाने प्रशिक्षणासाठी नोंदणी केली.

पहिल्या टप्प्यात उषाताईंसह गटातील दहा महिलांनी मसाला प्रक्रिया, आवळा प्रक्रिया आणि हस्तकला याविषयीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी गावामध्ये नव्याने महिलांचे गट तयार करून त्यांना प्रशिक्षित करण्याचे धोरण अवलंबिले.त्यामुळे विविध कामामध्ये प्रशिक्षित महिला, युवतींची संख्या वाढली. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला, मुलींना प्राधान्याने सहभाग करून त्यांना स्वतःचा रोजगार कसा उभा करता येईल, याकडे लक्ष दिले.

त्रिसूत्रीचा वापर 
प्रशिक्षण-कर्ज-उद्योग या त्रिसूत्रीचा अवलंब करून महिलांना सक्षम करण्याचे काम उषाताईंनी केले. हे करताना प्रत्येक उद्योगात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांचेही गट तयार केले. बाजारपेठेचा अभ्यासकरून हस्तकला, आवळा प्रक्रिया, मसाले, शिवणकाम, कागदी व कापडी पिशव्या, मुखवास निर्मिती, दहीमिर्ची निर्मिती, चिप्स सारख्या खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले. विविध गावातील महिलांची मागणी लक्षात घेऊन कुक्‍कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदींविषयी प्रशिक्षण देवून पूरक उद्योग सुरू करण्यासाठी उषाताईंनी चांगले मार्गदर्शन केले आहे.

प्रेरणा बचत गट विक्री केंद्र 
विविध विषयात प्रशिक्षित महिला, युवती तयार झाल्यानंतर त्यांच्या उत्पादित मालाला विक्रीचे व्यासपीठ मिळावे यासाठी उषाताईंनी प्रेरणा बचत गट विक्री केंद्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. तीन वर्षापूर्वी रामनगर येथील मानेगाव रस्त्यावरील एका गाळ्यामध्ये प्रेरणा बचत गट विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. याच केंद्रावरून हस्तकला वस्तू, मसाले, आवळा प्रक्रिया पदार्थांची विक्री केली जाते. तसेच दिल्ली, मुंबई, कोलकता,हैदराबाद, सुरत, पुणे आदी शहरात विविध वस्तू विक्रीसाठी पाठविल्या जातात. याशिवाय विविध प्रदर्शनामध्ये महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावले जातात.

हस्तकला वस्तुंची निर्मिती 

 •  १८ गावातील १६७ महिला हस्तकलेमध्ये पारंगत.
 • मोर,गणपती, रूखवत कीट, दुल्हन किट, महालक्ष्मी कीट, आकाश कंदील, झाडू, कुंड्या, आरसा, झूंबर, टेडी झूला, की होल्डर, ताटावरचे झाकण, बाहुली, आदी वस्तुंची निर्मिती.
 • मागणीनुसार कापडी बॅग, कागदी बॅग, पर्स, हॅंड पर्स, मेडीकल पाकीट, पार्सल पाकीट, पडद्यांची निर्मिती.

मसाला उद्योग 

 • बचत गटातील २७ महिलांचा सहभाग.
 • हळद, चटणी,मटण मसाला, पाव भाजी मसाला, पनीर मसाला आदी मसाल्याची निर्मिती.

आवळा प्रक्रिया 

 • १७ महिलांचा सहभाग.
 • आवळा कॅण्डी, लोणचे, मुरंबा निर्मिती.

साड्यांची विक्री 
रामनगरसह भीलपूरी, सावरगाव, मोजपूरी, मिरखेडा, उटवद, मानेगाव, नेर, हस्ती पिंपळगाव, बाजी उम्रद, जळगाव, इंदेवादी, ममदाबाद, कार्ला, माहेर जवळा, दरेगाव, शिरसवाडी, गोकूळवाडी सारख्या पंधरा गावातील बचत गटातील १५ महिलांनी साडी विक्री उद्योगाला सुरवात केली आहे.

उलाढाल आणि उत्पन्न 

 • हस्तकलेची वार्षिक उलाढाल सुमारे ३ लाख रुपये.
 • आवळा प्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल दीड लाख रुपये.
 • सहभागी महिलेला तीन हजारांपासून ते दहा हजारापर्यंत मासिक उत्पन्नाची सोय.

उषाताईंचे कार्य 

 • जालना जिल्ह्यातील २६ गावातील साडेतीन हजारांवर महिलांना बचत गटाशी जोडले.
 • १८ उद्यमशील गटातून १८७ कार्यक्षम महिलांचे संघटन.
 • उत्पादक आणि विक्री करणाऱ्यांचे बनविले गट.
 • शिलाई उद्योगातून १५७ महिलांना रोजगार.
 • १७६ महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण.
 • बचत गटातून कुक्‍कुटपालन, शेळीपालन, पशूपालनाला सुरवात.
 • शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सात मुलींना निःशुल्क प्रशिक्षण.तसेच सात मुलींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी.
 • दहा महिलांना सोबत घेऊन लॉकडाउनमध्ये महिनाभर २२ निराधार महिलांना आहाराचा पुरवठा.
 • महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

प्रतिक्रिया

उभारणार 'महिलांची बॅंक'
बचत करून कर्ज उचल करत त्याची परतफेड करण्यात गुरफटून न राहता महिलांच्या कल्पना, कलेला वाव देण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामीण भागातील महिलांची प्रगती होत आहे. येत्या काळात बचत गटात कार्यरत असलेल्या 'महिलांची बॅंक' उभी करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.
- सौ.उषा संदीपान चव्हाण-शिंदे, ७०२८०७७५५५
(संचालिका,प्रेरणा बचत गट विक्री केंद्र, रामनगर, जि.जालना)

पूरक उद्योगांना चालना
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आयोजित विविध प्रशिक्षणात महिलांना सहभागी करणे, पूरक उद्योगासाठी प्रोत्साहन, बॅंक व्यवहाराची ओळख आणि प्रत्यक्ष उद्योग सुरू करण्यापर्यंतचे मार्गदर्शन उषाताई करतात. केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता प्रेरणा बचत गट विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंची विक्री व्यवस्थाही त्यांनी निर्माण केली आहे.
- सौ.एस.एन.कऱ्हाळे,
(विषय विशेषज्ञ(गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, खरपूडी जि. जालना.


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...