agriculture news in Marathi, success story of women self help group,Mangalwadha,Dist.Sholapur | Page 2 ||| Agrowon

महिला गटाने तयार केला चटणी, मसाल्याचा ज्ञानेश्वरी ब्रॅंड
सुदर्शन सुतार
रविवार, 28 जुलै 2019

प्रक्रिया उद्योग वाढविणार...
चटणी उद्योगाने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे. यापुढे हा उद्योग वाढवणार आहोत. येत्या काळात ज्वारीपासून पदार्थ निर्मितीबाबत आम्ही विचार करीत आहोत. या उद्योगातही आम्हाला नक्की यश मिळेल.
-सौ. रूपाली गवळी, अध्यक्षा, ज्ञानेश्वरी महिला शेतकरी स्वयंसहायता समूह 

मंगळवेढा (जि. सोलापूर) गावातील आठ महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत बँकेकडून अर्थसाह्य न घेता, स्वतः आर्थिक गुंतवणूक करून काळे तिखट, लाल तिखट, शेंगा चटणी निर्मिती उद्योगाला सुरवात केली. बाजारपेठेत ओळख तयार करण्यासाठी ज्ञानेश्वरी ब्रॅंड तयार केला. अल्पावधीतच त्यांनी स्थानिक मार्केट मिळवले. गुणवत्तेच्या जोरावर मुंबई, पुण्यातही ज्ञानेश्वरी ब्रॅंडच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. 
 

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरातील कृष्णनगरमध्ये महिलांचा ज्ञानेश्वरी महिला शेतकरी स्वयंसहायता समूह हा गट कार्यरत आहे. गटातील सर्व महिला याच भागात राहणाऱ्या, एकमेकींच्या मैत्रिणी. सर्वजणी एकाच विचाराच्या. फार पूर्वीपासूनच या मैत्रिणी दर सणावाराला एकत्र येत, महिला दिनासारख्या उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत, त्यामुळे त्यांच्यात परस्परातला विश्वास आणि नातं मैत्रीच्याही पलीकडे जपलेलं. या मैत्रीनेच त्यांच्यातील आत्मविश्वास जागविला आणि एखादा लघू उद्योग आपण सुरू करावा, असे त्यांनी ठरवले. अडीच वर्षापूर्वी त्यांनी बचत गट स्थापन केला. 
पहिल्यांदा गटाच्या माध्यमातून बचतीशिवाय लघू उद्योगाकडे फारसे 
लक्ष नव्हते. पण प्रत्येकीच्या मनात काही तरी करण्याची जिद्द होती. त्यातूनच चटणी निर्मिती उद्योग समोर आला. ग्राहकांकडून रोज मागणी असणारा हा पदार्थ असल्याने सर्वच महिलांनी चटणी निर्मिती करायचे ठरविले. विशेष म्हणजे या सर्व महिला शेतकरी कुटुंबातून आलेल्या. प्रत्येकीच्या घरात शेती आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनेही (आत्मा) महिला बचत गटाला चटणी निर्मिती उद्योगाला सहकार्य केले. आत्माला हा बचत गट जोडला गेला. आत्माचे उपसंचालक मनोहर मुंढे, आत्माचे तालुका व्यवस्थापक विक्रम सावंजी यांनी या महिलांना प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले. यामुळे गटातील महिलांचा उत्साह वाढला आणि त्यांनी प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. 
गटाच्या अध्यक्ष म्हणून सौ. रूपाली गवळी, सचिव सौ. सविता लोहकरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. गटामध्ये सौ. सुजाता माने, सौ. मंगल भोसले, सौ. पद्मिनी भुसे, सौ. कविता माने, सौ. मनीषा बिले, सौ. वैशाली पवार या सदस्या आहेत. 

चटणीनिर्मितीला सुरवात
गटाने चटणी निर्मिती उद्योगाची सुरुवात पहिल्यांदा ३० किलो मिरच्यांपासून केली. पहिल्यांदा  २८ किलो लाल तिखट तयार केले. पहिल्या टप्प्यात गटाने लाल तिखटाची विक्री जवळचे नातेवाईक, काही विक्रेत्यांना केली. चटणीची चव आणि गुणवत्ता पाहून ग्राहकांकडून मागणी वाढली आणि खऱ्या अर्थाने प्रक्रिया उद्योगाने गती पकडली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन काळे तिखट, शेंगा चटणी, धने, जिरे पावडर निर्मितीला गटाने सुरवात केली. गटातील सर्व सदस्या दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत प्रक्रिया उद्योगासाठी वेळ देतात. मिरच्या निवडणे, यंत्रावर पावडर तयार करणे, मसाला कुटणे ही सगळी कामे गटातील सदस्या स्वतः करतात.

चुलीवरची भाजणी 
चटण्यांसाठी मिरचीची भाजणी पूर्णपणे चुलीवर केली जाते. तसेच काळ्या तिखटामध्ये घरीच तयार केलेला मसाला वापरला जातो. त्यामुळे मसाला, चटण्यांना एक विशिष्ट प्रकारची चव येते. आज गटातर्फे काळे तिखट, लाल तिखट, शेंगा चटणी तयार केली जाते. ग्राहकांकडून काळे तिखट आणि शेंगा चटणीला सर्वाधिक मागणी मिळते आहे. त्याशिवाय धने आणि जिरे पूड निर्मितीला गटाने सुरवात केली आहे. 

स्वतः केली गुंतवणूक   
चटणी निर्मिती उद्योगासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता होती. परंतू गटाने कोणत्याही बँकेचे अर्थसाह्य न घेता स्वतः आर्थिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. आठ महिलांनी प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले. त्यामुळे गटाकडे ८० हजार रुपये भांडवल तयार झाले. या भांडवलातून गटाने चटणी पावडर तयार करण्याचे ६० हजारांचे यंत्र खरेदी केले. याशिवाय पॅकिंग यंत्रणा, इलेक्ट्रॅानिक वजन काटा आदी साहित्यासह मिरच्यांची खरेदी केली. 

चटणी, मसाल्याचा ज्ञानेश्वरी ब्रॅंड 
चटण्या तयार करणाऱ्या सर्व महिला असल्याने त्याच्या चवीबाबत कायम सतर्क असतात. चटणी निर्मितीच्या ठिकाणी स्वच्छता असतेच, त्याबरोबरीने चटणी, मसाला तयार करताना हातात हॅण्डग्लोज, डोक्यावर टोपी घालूनच प्रक्रिया केली जाते. दर्जेदार कच्चा माल चटणी आणि मसाला निर्मितीसाठी वापरला जातो. वैशिष्ट्यपूर्ण चव आणि ठसा ग्राहकांच्या मनात कायम राहावा यासाठी गटाने चटणी आणि मसाल्याचा ज्ञानेश्वरी ब्रॅंड तयार केला आहे. 

दरमहा ३०० किलोची विक्री 
महिन्याकाठी साधारण ५० किलो लाल तिखट, ५० किलो शेंगा चटणी आणि २०० किलो काळ्या तिखटाची विक्री होते. याचबरोबरीने धने आणि जिरे पावडर प्रत्येकी ५ किलो विक्री होते. साधारण दरमहा ३०० किलोच्याही पुढे विक्री होते. गटाची महिन्याकाठी साधारण एक लाखाची उलाढाल होते. त्यातील ६० हजार खर्च वजा जाता, साधारण ४० हजार रुपये निव्वळ नफा राहतो. या माध्यमातून महिन्याकाठी प्रत्येकीला किमान ५ हजार रुपये मिळतात. सध्या गटातील सदस्यांनी कोणताही नफा न घेता, भांडवल वाढवण्यावर भर दिला आहे.                 
चटणी, मसाला निर्मिती आणि विक्रीसाठी गटाने जागा भाड्याने घेतली आहे. या ठिकाणाहून अर्धा किलो, पाव किलो, पाच किलो याप्रमाणे चटणी, काळा मसाल्याचे पॅकिंग करून विक्री केली जाते. स्थानिक भागात मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला आणि सोलापूर बाजारपेठेत चटणी, मसाला विक्री होते. याचबरोबरीने मुंबई आणि पुण्यातील ग्राहकांकडूनही चटणी तसेच मसाल्याची मागणी वाढली आहे. 

- सौ. रूपाली गवळी, ९६७३५७४४४५
 -  सौ. सविता लोहकरे, ९४२०६४६०२९

फोटो गॅलरी

इतर महिला
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
प्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे...देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
शेती, पूरक उद्योगातून महिला गट झाला...पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथील ऋचा...
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
स्वच्छ पाणी प्या, आजारापासून दूर रहाखराब पाण्यामुळे अमिबाची लागणसुद्धा होऊ शकते. या...
आरोग्यवर्धक नारळपाणी आयुर्वेदात नारळपाण्याला खूप महत्त्व आहे. नारळात...
अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून...बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर...
आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकलसीकरण हे लहान मुले, बाळांसाठी आणि आजारी...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...
प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...
शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...