हळद पावडर उद्योगात तयार केली ओळख

हळद पावडरीचे पॅकिंग करताना गटातील सदस्या
हळद पावडरीचे पॅकिंग करताना गटातील सदस्या

सांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. गुणवत्ता आणि रंगामुळे या ठिकाणच्या हळद पावडरीला मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन सांगली शहरातील श्रीराम समर्थ महिला बचत गटाने ग्राहकांच्या मागणीनुसार हळद पावडर तयार करून विक्री सुरू केली. या उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.

सांगली शहराच्या गावभागातील कबाडेवाडा येथे २००४ साली श्रीराम समर्थ महिला बचत गटाची सुरवात झाली. गटाचा पहिल्यांदा पूरक उद्योगाचा उद्देश नव्हता. शहर तसेच ग्रामीण भागातील महिला गट बचतीच्या बरोबरीने बाजारपेठेच्या मागणीनुसार पूरक उद्योगातून आर्थिक नफा वाढवत आहेत हे पाहून गटाने पूरक उद्योगाला सुरवात करण्याचे ठरविले. सुरवातीला गटाने चहा, नाष्टा आणि लहान प्रमाणात खानावळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या गटामध्ये सौ. रेखा पाटील (अध्यक्षा), रेखा वादवणे (सचिव), श्रीमती रतनमाला शिवजी, श्रीमती उमा जोशी, श्रीमती कमल कबाडे, सौ. मीरा चौगुले, श्रीमती सुलभा गोडबोले, सौ. जान्हवी खाडीलकर, सुनीता माने, सौ. राणी औरसंगे अशा सदस्या आहेत. खानावळ हा उद्योग लहान असला तरी यासाठी भागभांडवल हवे होते. सुरवातीला सर्वच सदस्यांनी आपल्याजवळील काही रक्कम व्यवसायासाठी जमा केली. सांगली महानगरपालिकेतील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या मार्फत महिला बचत गटाची नोंदणीदेखील केली. जमा झाले भागभांडवल  व्यवसाय उभा करायचा म्हटले की, भागभांडवल आलेच. त्यासाठी गटातील प्रत्येक सदस्याने दर महिना २०० रुपयांची बचत सुरू केली. एक वर्षाची बचत झाल्यावर गटाने पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर खानावळ सुरू केली. सुरवातीच्या काळात गटामार्फत चहा, नाष्टा, जेवण सुरू केले. गुणवत्तेमुळे खाद्यपदार्थांना मागणी वाढली. महानगरपालिकेतर्फे आयोजित विविध कार्यक्रमांत गटाला चहा, नाष्टा आणि जेवणाची मागणी सुरू झाली. त्यामुळे गटाचा आत्मविश्वास वाढला. या व्यवसायातील उलाढालीवर गटाला पन्नास हजार रुपयांचे कर्ज मिळाले. या कर्जातून प्रक्रिया व्यवसाय आपण करू शकतो हे गटाच्या लक्षात आले.   सांगली महानगरपालिकेतर्फे बचत गटांचे मेळावे होतात. या माध्यमातून विविध प्रकारचे मार्गदर्शन मिळू लागले. गटाला नवीन उद्योगांची माहिती मिळू लागली. शहर प्रकल्पाधिकारी तथा उपायुक्त स्मृती पाटील, समूह संघटक सौ. सव्वाखंडे, व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे यांचे मार्गदर्शन मिळाले. या मार्गदर्शनातून गटाने हळद निर्मिती उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.   हळद पावडर निर्मितीला सुरवात  सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणहून हळकुंड तसेच हळद पावडर देश, विदेशात जाते. या बाजारपेठेतील हळदीला चांगली मागणी असल्याने गटाने हळद पावडर निर्मितीचा निर्णय घेतला. उद्योगाच्या उभारणीसाठी बचत गटातील सदस्यांनी चर्चा करून २०१० साली हळद पावडर निर्मितीस सुरवात केली. याबाबत सौ. रेखा पाटील म्हणाल्या की, आमचा गट लहान आहे. आम्ही दरमहा २०० रुपयांची बचत करतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात यंत्रसामग्री खरेदी करता आली नाही. आम्ही सांगली बाजार समितीतून दर्जेदार हळकुंडांची खरेदी करतो. त्यानंतर परिसरातील मिलमधून त्याची पावडर तयार करून घेतो.  पावडर निर्मितीबाबत मीरा चौगुले म्हणाल्या की, आमच्याकडे हळद साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने एकदम हळद खरेदी करून ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार एक ते दोन क्विंटल दर्जेदार हळकुंडांची खरेदी करून त्याची पावडर तयार करतो. ग्राहकांच्या मागणीनुसार १०० ग्रॅम पासून ते १ किलोपर्यंत पॅकिंग करतो. हळद पावडरीच्या बरोबर भडंग, संक्रातीला लागणारे हलव्याचे दागिनेदेखील आमच्या गटातील सदस्या तयार करतात. गेल्या दोन वर्षात ग्राहकांच्याकडून हळद पावडरीची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे पावडर करण्याचे यंत्र खरेदी करण्याचे गटाने नियोजन केले आहे. यंत्राची किंमत दोन लाख रुपये असून त्यासाठी आम्ही भागभांडवल जमा करून उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात घेणार आहे. बाजारपेठेत ओळख तयार होण्यासाठी ब्रॅंड नेम तयार करत आहोत. त्याचादेखील विक्रीसाठी फायदा होईल. सध्या आम्ही समितीतून बाजार दराने हळकुंडांची खरेदी करतो. परंतू येत्या काळात शेतकऱ्यांकडून सेलम आणि राजापुरी हळकुंडांच्या खरेदीचे नियोजन आहे. याचा शेतकरी तसेच गटालादेखील फायदा होणार आहे.  

अशी आहे विक्री व्यवस्था गटाला हळद पावडर विक्री करणे तसे आव्हानात्मकच होते. परंतू सांगली-कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या अंतर्गत अनेक महिला बचत गट आहेत, त्यांच्याशी गटाने संपर्क केला. याबाबत सौ. रेखा पाटील म्हणाल्या की, या बचत गटातील सदस्यांना आम्ही हळद पावडर तयार करतो आहे, त्याच्या विक्रीसाठी तुमची मदत हवी आहे, असे सांगितले. त्यांनीदेखील मदत केली. तसेच मुंबईतसुद्धा महिला बचत गट आणि आमचे पाहुणे आहेत, त्यांनादेखील आम्ही हळद पावडरीचे सॅंपल दिले. या संपर्कातून आम्ही सांगली परिसर तसेच मुंबईमध्ये हळद विक्रीला सुरवात केली. मुंबईतून आम्हाला ऑर्डर मिळाली की, हळद पावडर तयार करून आम्ही थेट पोचवितो. याचे आम्हाला लगेच पैसे मिळतात. संपर्कातून हळद पावडरीची आम्ही विक्री वाढवित आहोत.

  - सौ. रेखा पाटील, ९८९०४७१३५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com