रानमेवा प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगती

रानमेवा प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगती
रानमेवा प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगती

कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आंबा, तळवडे गावातील बारा महिलांनी एकत्र येत सह्यगिरी महिला बचत गट तयार केला. गटाने करवंद, जांभूळ, फणस, कोकम फळांपासून विविध प्रक्रिया उत्पादने तयार केली. पर्यटन उद्योग आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून गटाने स्वतंत्रपणे सक्षम विक्री व्यवस्था उभी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी परिसरात भात, नाचणी आणि काही प्रमाणात भाजीपाला, ऊस लागवड आहे. या तालुक्यातील आंबा, तळवडे गावांचा परिसर डोंगरपट्टांचा, त्यामुळे वर्षभर या परिसराला पर्यटक भेट देतात. बाजारपेठेची ही संधी लक्षात घेऊन या गावातील बारा महिलांनी २००६ साली सह्यगिरी महिला बचत गट तयार केला. तळवडे गावातील सौ. सायली राजेंद्र लाड गटाच्या अध्यक्षा आहेत. कोल्हापुरातील स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परूळेकर यांनी गट उभारणी, प्रक्रिया उद्योगासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्य केले. पहिल्या टप्प्यात आंबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन गटाने भडंग, पॉपकॉर्न, लाडू आणि पापड निर्मितीला सुरुवात केली. या पदार्थांच्या विक्रीतून गटाला बाजारपेठेचा अंदाज आला. खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी सदस्या दरमहा १०० रुपये बचत करतात. गटामध्ये सायली लाड (अध्यक्षा), शुभांगी वायकूळ (उपाध्यक्ष), प्रतिभा कोकाटे (सचीव), श्रद्धा वायकूळ, समृद्धी कामेरकर, मिताली बेर्डे, सुरेखा लाड, लता गुडेकर, निर्मला बेर्डे, सुप्रिया कोलते, नीलिमा कामेरकर, अनुजा जठार या सदस्या आहेत. रानमेव्यावर प्रक्रिया

  • आंबा, तळवडे परिसरातील डोंगर पट्ट्यात करवंद, आंबा, फणस, जांभूळ, कोकम हा रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गटाने या फळांवर प्रक्रियाकरून विक्रीचे नियोजन केले. प्रक्रिया उद्योग सुरू करण्याअगोदर महिलांनी वारणा भगिनी मंडळातर्फे प्रशिक्षण घेतले. दर हंगामात परिसरातील महिलांच्याकडून रानमेवा योग्य दरात खरेदी केला जातो.  
  • पहिल्या टप्प्यात महिलांनी करवंद चटणी, क्रश, लोणचे, जॅम, सरबत, जांभळाचे सरबत, जॅम, साटे, आंब्यापासून लोणचे, चुंदा, कोकम सरबत, सोलकढी आणि फणसापासून साटे, वेफर्स निर्मिती सुरू केली.  
  • रानमेव्याची वेगळी चव आणि दर्जामुळे परिसरातील दुकानदार, पर्यटकांकडून उत्पादनांना टप्प्याटप्प्याने मागणी वाढू लागली.  
  • गटाने मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्यासाठी ग्राईंडर, कटर, कुकर, तसेच बाटली, पाऊच पॅकिंग यंत्राची खरेदी केली. यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे शक्य झाले.  
  • गटातील काही महिला मॅंगो शेवया तसेच नाचणी, बेसन, मेथी लाडू निर्मिती करतात. पापडामध्ये पालक, टोमॅटो, जिरा, नाचणी, मेथी आणि फणसाचा स्वाद उपलब्ध आहे. गटाने प्रक्रिया आणि उत्पादनांसाठी परवाना घेतला आहे. गटाने केलेल्या कर्ज वाटपातून सदस्यांनी घरगुती व्यवसाय, पशूपालनालादेखील सुरुवात केली.
  • जबाबदारीचे वाटप

  • गटातील सहाजणींकडे प्रक्रिया उद्योगाची जबाबदारी आहे. तीन जणी घरगुती खानावळ चालवितात. चारजणी दिवाळीचा फराळ तयार करतात. दोघी जणी अंगणवाडीला पोषक आहार पुरवितात. प्रत्येक सदस्याने उपलब्ध वेळेनुसार दैनंदिन कामाची जबाबदारी वाटून घेतली आहे.  
  • आंबा, तळवडे परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन सायली लाड यांनी तीन वर्षांपूर्वी खाद्यपदार्थांचे लहानसे हॉटेल सुरू केले. या ठिकाणी बचत गटाच्या उत्पादनांचे विक्री केंद्र उभारले. गटाच्या स्टॉलवरून करवंद लोणचे १६० रुपये, चटणी १८० रुपये, चुंदा १६० रुपये, जॅम १८० रुपये, फणस वेफर्स २०० रुपये, पल्प १५० रुपये, आंबा लोणचे १५० रुपये प्रति किलो या दराने विक्री होते.  
  • आंबा घाटात वर्षा पर्यटनाच्या काळात गटातर्फे फिरता खाद्यपदार्थांचा स्टॉल असतो. या ठिकाणी बटाटेवडा, मका कणीस, मिसळ, भजी तसेच प्रक्रिया उत्पादनांची विक्री केली जाते. आंबा परिसरात पर्यटकांसाठी रिसॉर्ट आहेत. या ठिकाणी गटातील सदस्या शुभांगी वायकूळ, श्रद्धा वायकूळ आणि अनुजा जठार या वडे मटण, तांबडा-पांढरा रस्सा मागणीनुसार पुरवतात. शुभांगी वायकूळ या सेंद्रिय पद्धतीने विविध भाजीपाल्यांचे उत्पादन करतात.
  • प्रदर्शनातून विक्री

  • गटातील महिला दरवर्षी कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, मुंबई आणि दिल्ली येथील हट बाजार या प्रदर्शनात सहभागी होतात. या माध्यमातून थेट ग्राहकांना विक्री केली जाते. पुणे, मुंबईतील ग्राहक गटाकडे दरवर्षी प्रक्रिया पदार्थांची मागणी नोंदवितात.  
  • गटाने कोल्हापूर शहरातील स्वयंसिद्धा शॉपी तसेच रंकाळा परिसरातील फिरत्या विक्री केंद्रात उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. मे महिन्यात दर रविवारी आंबा ग्रामपंचायतीतर्फे बचत गटांचा बाजार भरतो. त्यामध्ये परिसरातील १२ महिला गट सहभागी होतात.  
  • बचत गटाच्या उत्पादनांची दरमहा उलाढाल बारा हजारांपर्यंत पोचली आहे. मिळणाऱ्या नफ्याचा वाटा गटातील महिलांना त्यांच्या प्रक्रिया पदार्थांच्या उत्पादनानुसार दिला जातो.
  • दिवाळी फराळाला पसंती

  • गेल्या वर्षीपासून गटाने दिवाळी फराळ ही संकल्पना राबविली. प्रत्येकीने चिवडा, लाडू, चकली, करंजी, अनारसे अशा पदार्थांच्या निर्मितीची जबाबदारी घेतली. दिवाळीच्या दरम्यान मुख्य रस्त्यावर स्टॉल आणि ठराविक हॉटेलमध्ये फराळाचे पदार्थ पॅकिंगमध्ये विक्रीस ठेवले जातात.  
  • तीनशे रुपये आणि पाचशे रुपयांमध्ये हा फराळ उपलब्ध आहे. वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे वर्षभर या पदार्थांना हॉटेल व्यावसायिकांच्याकडून मागणी असते. यंदाच्या दिवाळीत फराळ विक्रीतून गटाने पन्नास हजारांची उलाढाल केली.
  • गटाचे विविध उपक्रम प्रशिक्षण, आरोग्य शिबिर

  • परिसरातील गावात नव्याने सुरू झालेल्या महिला गटांना खाद्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण आणि बचतीचे महत्त्व सांगितले जाते. वनविभागाच्या सहाय्याने विविध उपक्रम राबविले जातात.  
  • गेल्या पाच वर्षांपासून डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या सहयोगाने दुर्गम भागातील बोरमाळ धनगरवाडा, भिवाची वाडी, केर्ले, केंबुर्णीवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. महिलांसाठी पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
  • परसबाग उपक्रम

  • दरवर्षी स्वयंसिद्धा संस्थेतर्फे सदस्यांना विविध भाजीपाला बियाणांचे वाटप केले जाते. या महिला दरवर्षी परसबाग तसेच भाजीपाला रोपे आणि गांडूळ खताची निर्मिती करतात. गटाने वनौषधी रोपवाटिका निर्मितीचे प्रशिक्षण घेतले आहे.
  • मधमाशी पालन

  • आंबा परिसरात जंगलामुळे वर्षभर विविध वनस्पतींचा फुलोरा असतो. हे लक्षात घेऊन गटातील महिलांनी मधमाशीपालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात मध विक्रीचे नियोजन आहे.
  • येत्या काळातील उपक्रम

  • पावसाळ्यात रानभाज्यांची लागवड आणि पदार्थांची निर्मिती.  
  • सोलर ड्रायरमधून पालेभाज्यांची वाळवणी आणि विक्री.  
  • कुक्कुटपालन, पशूपालनाचे नियोजन.  
  • हॉटेलसाठी चांगला स्वयंपाकी बनविण्याचे प्रशिक्षण.
  • संपर्क - सायली लाड, ९०११९३२८१९ शुभांगी वायकूळ, ८६६९८२९६५७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com