agriculture news in Marathi, Success story of Yashsvi women self help group,Barshitakli,Dist.Akola | Agrowon

महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘यशस्वी’ भरारी
गोपाल हागे
रविवार, 16 जून 2019

बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी एकत्र येत यशस्वी महिला बचत गट तयार केला. बाजारपेठेचा अभ्यास करत विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीला सुरवात केली. प्रदर्शन तसेच थेट विक्रीवर भर देत गटाने आर्थिक उलाढाल वाढविली. गटाच्या माध्यमातून महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे.

बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी एकत्र येत यशस्वी महिला बचत गट तयार केला. बाजारपेठेचा अभ्यास करत विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीला सुरवात केली. प्रदर्शन तसेच थेट विक्रीवर भर देत गटाने आर्थिक उलाढाल वाढविली. गटाच्या माध्यमातून महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे.

शहरी भागामध्ये विविध प्रक्रिया पदार्थांची मागणी वाढत आहे, ही बाब लक्षात घेत बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी एकत्र येत यशस्वी महिला बचत गट तयार केला. या गटाने प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. आज या महिलांनी बनविलेल्या पदार्थांची मागणी वाढत असून, त्यांच्या मिळकतीतही चांगली भर पडली आहे. बार्शीटाकळी येथे २०१३ मध्ये स्थापन झालेल्या गटाने प्रगतीची दिशा पकडली आहे. गटामध्ये सुनीता ठाकरे (अध्यक्षा), मंदा पंडित (सचिव), पूजा कडू (कोशाध्यक्ष) आणि राणी खापरी, जया जुमळे, रूपाली भडांगे, स्वाती कोल्हे, सुनीता पांडे, वैशाली खुले, सुमन टाले या सदस्या कार्यरत आहेत.

बार्शीटाकळी गावातील सामान्य कुटुंबातील दहा महिलांनी एकत्र येत बचत गट तयार केला. बार्शीटाकळी हे तालुक्याचे ठिकाण असले तरी लोकसंख्येने फारसे मोठे गाव नाही. मात्र जवळच अकोला शहराची मोठी बाजारपेठ आहे. हीच बाब या गटातील महिलांसाठी फायदेशीर ठरली. गटाने २०१७ मध्ये प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. यापूर्वी महिलांनी सिसा उदेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. तेथील गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख कीर्ती देशमुख यांनी महिलांना खाद्यपदार्थ बनविण्यातील बारकावे शिकविले. याचबरोबरीने पॅकिंग, मार्केटिंग, नवनवीन संकल्पनांबाबत गटातील महिलांना सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांनीच गृहोद्योग सुरू करण्यासाठी गटाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सुनीता ठाकरे, राणी खापरी, सुनीता पांडे यांनी पुढाकार घेत खाद्यपदार्थ निर्मितीला सुरवात केली. 

गटातील महिला दरमहा २०० रुपयांची बचत करतात. यातून ८५ हजार रुपयांची बचत झाली आहे. गटाला प्रक्रिया उद्योगासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून अर्थसाहाय्य मिळते. गटाने पहिल्यांदा एक लाख रुपये कर्ज घेतले, त्यानंतर त्याची परतफेड केली. पुढील टप्प्यात बँकेने तीन लाखांचे कर्ज दिले, यातील दीड लाख रुपये गटातील महिलांनी कर्ज स्वरूपात घेतले. उर्वरित पैसा प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतविला. येत्या काळात या रकमेची वेळेत परतफेड केल्यास बँकेने पाच लाखांचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली असल्याचे गटातील महिलांनी सांगितले.  

नैसर्गिक रंगनिर्मिती 
होळी सणामध्ये रसायनयुक्त रंग वापरल्याने मानवी आरोग्याचे नुकसान होते याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. हे लक्षात घेऊन गटातील महिलांनी कृषी विज्ञान केंद्रात पर्यावरणपूरक रंग बनविण्याचे तंत्र शिकून घेतले. कीर्ती देशमुख यांनी रंगनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया शिकविली. त्यानंतर या गटाने या वर्षी विविध पर्यावरणपूरक रंग तयार केले. शहरात त्यांची विक्री केली. पहिल्याच वर्षात सुमारे ६५ हजार रुपयांची उलाढाल रंगविक्रीतून झाल्याची माहिती गटाच्या अध्यक्षा सुनीता ठाकरे यांनी दिली.     

भविष्यातील नियोजन 
 गट तयार झाल्याने महिलांना अनेक गोष्टी नव्याने शिकता आल्या. कधी बँकेत न जाणाऱ्या ग्रामीण भागातील महिला आता गटाचे सर्व आर्थिक व्यवहार स्वतः करतात, अधिकाऱ्यांशी बोलतात. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी विविध कच्च्या मालांची स्वतः खरेदी करतात. आता त्यांना कुठलाही माल स्वतः बाजारपेठेत जाऊन आणण्याची गरज राहिलेली नाही. मोबाईलद्वारे  कच्च्या मालाची व्यापाऱ्यांकडे मागणी नोंदविली जाते, व्यापारी घरपोच माल पोहोचवितात. लोणच्यासाठी कैरी, मिरची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केली जाते. प्रक्रिया उद्योगातील प्रगतीमुळे गटातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास वाढला. आता कुठेही प्रदर्शन असेल तर या महिला पदार्थांच्या विक्रीसाठी जातात. छोट्या स्तरातून सुरू झालेला हा गृहोद्योग वाढविण्याचा संकल्प गटाने केला आहे. येत्या काळात प्रक्रिया उद्योगासाठी गटाची स्वतःची जागा, तसेच प्रक्रियेसाठी यंत्रणा खरेदी केली जाणार आहे. गटातील महिलांसह परिसरातील शंभर महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा गटाचा प्रयत्न असल्याचे सुनीता ठाकरे, राणी खापरी यांनी सांगितले. 

खाद्यपदार्थांची निर्मिती
पौष्टिक पराठा पीठ (गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, हरभरा पिठांचे मिश्रण) एक किलो पॅकिंगमध्ये विक्री केले जाते. सोबतच कारळे चटणी, जवस चटणी, लसूण चटणी, कवठ लोणचे (मसाला व गोड-आंबट), हळद लोणचे, आंबा लोणचे तयार केले जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार पाव किलो, अर्धा किलो, ३०० ग्रॅम अशा विविध पॅकिंगमध्ये विक्री केली जाते. एक किलो पराठा पीठ ९० रुपये किलो, विविध चटण्या १०० ग्रॅम पॅकिंग ५० रुपये, आंबा लोणचे २५० रुपये किलो, हळद लोणचे २५० ग्रॅम ६० रुपये या दराने विकले जाते. खाद्यपदार्थांचा दर्जा उत्कृष्ट राहील याची खबरदारी घेतली जाते. स्वच्छता पाळली जाते. यासोबतच गटाच्या माध्यमातून परिसरातील महिलांनी तयार केलेल्या घरगुती (वड्या, शेवया, पापड, सांडोल्या, कुरडई) खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. यातून व्यावसायिक साखळी उभी राहत आहे.  

प्रदर्शनातून थेट विक्रीवर भर
पहिल्याच वर्षात (२०१७) या गटातील महिलांनी अकोल्यात झालेल्या कृषी प्रदर्शनात स्टॉल लावला. त्याठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने हुरूप वाढला. पहिल्याच वर्षात अडीच लाखांची उलाढाल झाली. यातून चांगला नफा शिल्लक राहिला. त्यानंतर २०१८ मध्ये तेल्हारा, अमरावती, खामगाव, अकोला, जळगाव आदी ठिकाणी झालेल्या प्रदर्शनांमध्ये गटाने तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री केली. या प्रदर्शनांमुळे विक्रीचे तंत्र अवगत झाले. कच्चा माल खरेदीसाठी वापरलेली रक्कम वसूल झाली. शिवाय, नफादेखील शिल्लक राहिला. यामुळे गटाने खाद्यपदार्थ बनविण्यात विविधता आणली.  या वर्षी जानेवारी महिन्यापासून गटाने तयार केलेले पदार्थ अकोल्यात नियमितपणे स्टॉल लावून विक्री केले जात आहेत. याशिवाय दोन महिला घरोघरी जाऊनही खाद्यपदार्थांची विक्री करतात. महिन्याला सत्तर हजारांची उलाढाल होत असल्याची माहिती गटाच्या अध्यक्षा सुनीता ठाकरे यांनी दिली. येत्या काळात हे पदार्थ अकोल्यातील मोठ्या किराणा दुकानांमध्येही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 - सुनीता ठाकरे, ९६०४९१२०५९,    
- राणी खापरी, ९३५९२७९४४६

 

 

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...