अतिदुर्गम भागात युवकाने केली एकात्मिक शेती

धामनवण (ता. अकोले, जि. नगर) या दुर्गम गावातील शांताराम बारामते या युवकाने आपल्या १२ एकर शेतीत विविध प्रयोग करीत शेतीतून आपले अर्थकारण उंचावले आहे. सुमारे सात ते आठ एकरांत चारसूत्री पद्धतीने भाताची लागवड, जोडीला वरई, नाचणी व पूरक म्हणून शेळी, कोंबडीपालन, मधमाशीपालन अशी त्यांची शेती आहे. त्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीत एकात्मिक शेतीचा आदर्श शांताराम यांनी जोपासला आहे.
shantaram baramate's goat farming
shantaram baramate's goat farming

धामनवण (ता. अकोले, जि. नगर) या दुर्गम गावातील शांताराम बारामते या युवकाने आपल्या १२ एकर शेतीत विविध प्रयोग करीत शेतीतून आपले अर्थकारण उंचावले आहे. सुमारे सात ते आठ एकरांत चारसूत्री पद्धतीने भाताची लागवड, जोडीला वरई, नाचणी व पूरक म्हणून शेळी, कोंबडीपालन, मधमाशीपालन अशी त्यांची शेती आहे. त्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीत एकात्मिक शेतीचा आदर्श शांताराम यांनी जोपासला आहे. नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध राजूर गाव सोडले की अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम असलेल्या कुमशेत, आंबीतकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे १५ किलोमीटरवर धामनवण गाव लागते. मुळात अकोले तालुक्याला नयनरम्य निसर्गाचे वरदान लाभले आहे. या भागात अनेक अल्पभूधारक शेतकरी पाहण्यास मिळतात. धामनवणही त्यास अपवाद नाही. गावात प्रवेश करतेवेळी परिसरातील शिवारात वेगवेगळे प्रयोग आपले लक्ष वेधून घेतात. यामध्ये ठिबकवर घेतलेली मिरची, उन्हाळी भुईमूग, मधुमक्षिका पालनाच्या पेट्या, शेततळे, फणस, आंबा व मिरीची डोलणारी झाडे, पावसाळ्यात चारसूत्री लागवडीचा भाताचा प्लॉट, गांडूळखत निर्मिती आदी बाबी दृष्टीस पडतात. शांताराम कोंडीबा बारामते या आदिवासी युवकाची ही शेती आहे. शांताराम यांची शेती खरे तर स्वभावाने तसा अबोल असा हा शांताराम आहे. पण शेतीतील कोणताही नवी गोष्ट कळली की त्याबाबत उत्सुकतेने माहिती तो घेणारच. घरची आर्थिक परिस्थिती तशी खूप बेताची. वृद्ध आई, बायको व मुले असा त्याचा छोटा परिवार आहे. दहावीत असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरची व शेतीची सारी जबाबदारी शांताराम यांच्यावर पडली. आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षणही फारसे घेता आले नाही. शेती हेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते. त्यामुळे पारंपरिक शेतीत अडकून राहण्यापेक्षा सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात प्रगती करण्याचे त्याने ठरवले. सुधारीत शेतीचा वसा

  • शांताराम यांनी अभ्यास, धडपड व कृषी विभागाची मदत घेत शेतीत अनेक बदल घडवले आहेत. गेल्या ११ ते १२ वर्षांपासून ते चारसूत्री पद्धतीने भाताची लागवड करीत आहेत. गावात या तंत्राचा सर्वप्रथम वापर करणारे ते पहिलेच शेतकरी असावेत. भातात संकरित वाणाचा वापर ते करतातच.
  • मात्र काळभात किंवा अन्य देशी बियाणेही त्यांनी संवर्धित केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अन्य शेतकरी देखील सतत नवे बियाणे, उपचार पद्धती यांची माहिती घेत असतात.
  • रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर मर्यादित राहावा म्हणून गांडूळ खत, दशपर्णी अर्क, बायोडायनॅमिक खत निर्मिती ते आपल्या शेतावर करतात. त्यातून अन्य शेतकऱ्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे.
  • गावात परिवर्तन सेंद्रिय भात उत्पादक गटाची स्थापना आत्मा अंतर्गत झाली आहे. शांताराम या गटाचे सक्रिय सदस्य आहेत. शेतकऱ्यांना संघटित करण्यात त्यांचा पुढाकार असतो. आदिवासी भागात प्रथमच भात पिकात राब पद्धतीला पर्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. राब ही पारंपरिक पद्धती अनेक ठिकाणी वापरली जाते. त्यातून नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होते. त्याऐवजी गादीवाफे पध्दतीचा वापर करून रोपवाटिका तयार करण्यात येते. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही या प्रयोगाची प्रेरणा मिळाली आहे.
  • भाताच्या रोपांना सुरुवातीला पाणी कमी पडल्यास तुषार सिंचन व्यवस्था उभारली आहे. त्यामुळे रोपे वेळेत तयार करणे व नुकसान टाळणे शक्य झाले आहे.
  • भाताचे उत्पादन शांताराम यांचे दरवर्षी सात ते आठ एकर भाताचे क्षेत्र असते. एकरी सुमारे २० क्विंटल उत्पादन ते घेतात. साळीला त्यांच्या भागात क्विंटलला २२०० ते २३०० रुपये दर मिळतो. अलीकडील काळात त्यांनी मोबाईल राईसमील घेतली आहे. कृषी विभागाचे त्यास अनुदान मिळाले आहे. त्याद्वारे प्रक्रिया करून किलोला ५० रुपये दराने भाताची विक्री केली जाते. घरच्यापुरता तांदूळ ठेऊन उर्वरित तांदळाची विक्री होते.

  • भाताला पूरक म्हणून नाचणी सुमारे २० ते २२ गुंठे व वरई देखील तेवढ्याच गुंठ्यात असते. नाचणी आरोग्यवर्धक असल्याने घरीच उपयोगात येते. वरईची विक्री मात्र क्विंटलला २२०० ते २३०० रुपये दराने होते.
  • अकोले भागात मिरी या मसाले पिकाच्या लागवडीचा प्रयोग शांताराम यांनी केला असून आपल्या शेतकरी गटामार्फत सहा शेतकऱ्यांना त्यात सहभागी केले आहे. बांधावर आंबा व शेवगा यांची काही झाडे लावली आहेत.
  • पूरक व्यवसायांची जोड शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्याशिवाय उत्पन्न वाढणार नाही हे ओळखून शांताराम यांनी शेळीपालन व कोंबडीपालन केले आहे. सुमारे १५ शेळ्या आहेत. एक देशी गाय, दोन बैल आहे. दररोज सात ते आठ घमेले लेंडीखत उपलब्ध होते. गोबरगॅसचे युनिट आहे. त्यावर स्वयंपाक होतो. स्लरीचा वापर शेतीसाठी होतो. शेततळे असून त्यात मासेपालन केले आहे. मधमाशीपालन इथला परिसर जंगलाने व्यापला असल्याने येथे मधमाशीपालनास मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन शांताराम यांनी पुणे येथील खादी ग्रामोद्योग केंद्रातून मधुमक्षिका पालन प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्यांच्याकडे सुमारे १० पेट्या आहेत. वसाहती असलेल्या सुमारे सात पेट्यांची विक्री केल्याचेही ते सांगतात. या भागात सातेरी मधमाशी आढळते. त्यापासून मध संकलनाचे काम आता सुरू केले आहे. मागील वर्षी जिल्हा परिषदेअंतर्गत कृषी विभागामार्फत उत्कृष्ट शेतकरी म्हणून शांताराम यांना गौरवण्यात आले आहे. संपर्क- शांताराम बारामते- ९५५२३७२९८४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com