agriculture news in marathi Successful grape cultivation through the use of subsurface drip technique | Agrowon

सबसरफेस ठिबक तंत्राच्या वापरातून यशस्वी केली द्राक्ष शेती

सुदर्शन सुतार
शुक्रवार, 15 मे 2020

अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, प्रयत्नवाद, बागेतील गरज ओळखून तंत्रज्ञानाचा अंगीकार या आधारे होनसळ (जि. सोलापूर) येथील शिवाजी लक्ष्मण पवार यांनी द्राक्षशेती यशस्वी केली आहे. आपल्या ५० एकर बागेत सबसरफेस ठिबक तंत्राचा (जमिनीखालील ठिबक) प्रयोग करून पाण्याची ६० टक्क्यांपर्यंत बचत केली. झाडाच्या मुळांना थेट पाणी देत बाष्पीभवन टाळले. त्यातून द्राक्षाची गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ केली. जैविक मल्चिंगचा वापरही त्यांनी फायदेशीर केला आहे.

अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, प्रयत्नवाद, बागेतील गरज ओळखून तंत्रज्ञानाचा अंगीकार या आधारे होनसळ (जि. सोलापूर) येथील शिवाजी लक्ष्मण पवार यांनी द्राक्षशेती यशस्वी केली आहे. आपल्या ५० एकर बागेत सबसरफेस ठिबक तंत्राचा (जमिनीखालील ठिबक) प्रयोग करून पाण्याची ६० टक्क्यांपर्यंत बचत केली. झाडाच्या मुळांना थेट पाणी देत बाष्पीभवन टाळले. त्यातून द्राक्षाची गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ केली. जैविक मल्चिंगचा वापरही त्यांनी फायदेशीर केला आहे.

सोलापूर- तुळजापूर महामार्गावर होनसळ येथे (ता. उत्तर सोलापूर) येथे शिवाजी पवार यांची ६० एकर शेती आहे. पैकी ५० एकरांत द्राक्षबाग आहे. उर्वरित क्षेत्रात चारापिके व अन्य क्षेत्र आहे. सुमारे २०-२५ वर्षांपासून शिवाजीराव द्राक्षशेतीत आहेत. कुस्तीचे प्रशिक्षण घेत त्यांनी कोल्हापूर येथे पदवीचे शिक्षण घेतले. गावी येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत अवघ्या काही गुणांनी संधी हुकली. मग नोकरी किंवा व्यवसाय अशा क्षेत्रात न जाता थेट शेतीत उतरणे पसंत केले.

द्राक्षबागेचा विस्तार
त्यावेळी तीन एकर द्राक्षबाग होती. शेतीचे प्रयोग करताना वडिलांकडूनही अनुभवाचे धडे गिरवले. शिकाऊवृत्ती, निरीक्षणाची सवय ठेवत द्राक्षशेतीचा सर्वांगाने अभ्यास केला. शास्त्रीय दृष्टीकोन व तंत्रज्ञान आत्मसात केले. टप्प्याटप्प्याने द्राक्षाचे क्षेत्र ५० एकरांपर्यंत नेले. आज पंचक्रोशीतील अभ्यासू आणि प्रयोगशील शेतकरीही म्हणून त्यांचा लौकिक आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत. त्या माध्यमातून द्राक्ष उत्पादकांना ते मार्गदर्शन करतात. अभिजित, किरण आणि सूरज ही पदवीधारक त्यांती मुलेही वडिलांबरोबर द्राक्षशेतीत राबत आहेत.

द्राक्षबागेचे व्यवस्थापन

 • पन्नास एकरांत माणिक चमन ४ एकर, सुपर सोनाका ३०, आरके ८, एसएसएन (निवड पध्दतीचे वाण) ४, अनुष्का (निवड पध्दतीचे) ३,तर सोनाका १ एकर अशा सहा वाणांची लागवड.
 • बहुतांश प्लॉटमधील सुमारे ७० टक्के क्षेत्रातून निर्यात.
 • भागात पाऊस खूप कमी पडतो. दरवर्षी पावसावर आधारीत हंगामाचे नियोजन
 • २५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने गोडी छाटणी.

जैविक मल्चिंग

 • गोडी छाटणीनंतर झाडाच्या बोधावर उसाच्या पाचटाचे मल्चिंग. प्रति दोन झाडांमध्ये त्याचे एक बंडल. बाहेरून खरेदी करून वापर. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन थांबले. मातीचा मुलायमपणा वाढला. जमिनीत गांडुळाची संख्या वाढली, ओलावा टिकला. झाडाची ताकद वाढली.
 • घरी २० देशी गायी. त्यांचे शेण आणि गोमूत्राची स्लरी तयार करून ट्रॅक्टरचलित टँकरच्या साह्याने प्रत्येक झाडाला त्याचा वापर.
 • शेणखत, गोमूत्राचा वेळोवेळी वापर.
 • सेंद्रिय घटकांचा अधिक वापर. त्यामुळे रासायनिक घटकांवरील खर्चही कमी

चार एकरचे शेततळे 
होनसळ परिसरात पाण्याचा मोठा स्त्रोत नाही. शिवाजीरावांची शेती पाऊस व तीन विहिरींवरच अवलंबून आहे. पाऊस अत्यंत कमी होत असल्याने सातत्याने पाणीटंचाई उदभवते. त्यावर उपाय म्हणून २०१५ मध्ये चार एकरांत शेततळे तयार केले. त्याची क्षमता सात कोटी लिटर आहे. उन्हाळ्यात ५० एकरांसाठी त्यातील पाणी पुरते. शेताजवळून ओढा गेला आहे. शेतात तीन खड्डे व बंधारा करून पाणी अडवले आहे. ते पाईपलाईन व पंपाद्वारे शेततळ्यात घेतले जाते. स्वखर्चाने खोली-रूंदीकरण केले आहे.

सबसरफेस ठिबकचा वापर
पूर्णपणे ५० एकरांत सबसरफेस ठिबकचा वापर केला आहे. या भागात पाण्याची टंचाई असल्याने बाष्पीभवन टाळण्यासाठी व पाण्यात बचत होण्यासाठी हे तंत्र उपयोगाला आणले आहे. यात बोदावर ठिबकच्या पूर्वीच्या इनलाईन आहेत. मात्र सबसरफेसची लाईन दोन्ही झाडांच्या ओळीतील मधल्या भागात सुमारे नऊ इंच जमिनीत टाकली आहे. त्यातून प्रति ड्रिपर प्रति तास सव्वाअकराशे मिली पाणी दिले जाते. झाडाच्या मुळ्या बुडाच्या परिघात किमान ४ ते ५ फुटापर्यंत पसरलेल्या असतात. साहजिकच सबसरफेसमुळे थेट जमिनीतून दोन्ही बाजूच्या झाडांच्या मुळांना पाणी उपलब्ध होते. शिवाय पाण्यातील ऑक्सीजनही त्यांना मिळतो. झाड सशक्त होते. पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते.

सबसरफेस तंत्राचे झाले फायदे

 • पूर्वी नेहमीच्या ठिबकद्वारे प्रतिदिन दहा हजार लिटर पाणी बागेला दिले जायचे. सबसरफेसमुळे हे प्रमाण तीन हजार लिटर पर्यंत खाली आले. त्यातून ६० ते ७० टक्के पाण्याची तसेच वेळेची आणि विजेची बचत झाली.
 • बोदाजवळील लॅटरलमधून एनपीके (मुख्य अन्नद्रव्ये) तर सबसरफेस लाईनमधून सूक्ष्मअन्नद्रव्ये दिली जातात.
 • ऑटोमेशन यंत्रणा बसवली असल्याने संगणकीय प्रणालीद्वारे मोजून मापून पाणी व खते दिली जातात.

ड्रेनेज लाईन
पन्नास एकरांत ठिबकच्या नळ्या धुण्यासाठी प्रत्येक पाईपमध्ये पाणी सोडून ते धुणे शक्य नाही. त्यामुळे बागेच्या चारही बाजूंनी एन्डकॅपला (शेवटच्या टोकाला) दोन इंच स्वतंत्र पाईपलाईन्स. त्याद्वारे ड्रेनेज लाईन. स्वतंत्र व्हॉल्व्ह, कॉक आहे. त्यामुळे कमी वेळेत नळ्या स्वच्छ होतात.

गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ
एकूण व्यवस्थापन, सबसरफेस तंत्राचा वापर यातून यंदा उत्पादनात एकरी दोन ते अडीच टन वाढ झाल्याचे शिवाजीराव सांगतात, द्राक्षातील गर, आकार, रंग आणि चवीतही फरक पडला. दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षांचे एकरी १२ टनांपर्यंत तर स्थानिक द्राक्षांचे १५ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. चीन, श्रीलंकेत त्यांची द्राक्षे कंपनीमार्फत जातात. किलोला ८७ ते ७७ रूपये दर यापूर्वी मिळाला आहे. यंदा कोरोनामुळे निर्यातीत अडथळे आले. मात्र दिल्ली, कोलकता, सिलिगुडी, हरयाणा बाजारात द्राक्षे पाठविली. किलोस २५ ते ३० रुपये दर मिळाला.

संपर्क- शिवाजी पवार- ९४२२६४९३०७, ८७८८६४९३७८


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...