agriculture news in marathi Successful pig rearing due to professional approach | Agrowon

व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी वराहपालन

संदीप नवले
मंगळवार, 19 जानेवारी 2021

पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील आर्डव येथील तुषार व नीलेश या शेडगे बंधूंनी वराहपालनातून अर्थकारण उंचावले आहे. एक व्यवसाय म्हणून त्याकडे दृष्टिकोन ठेवून त्यानुसार व्यवस्थापन करून दहा वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले.  
 

पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील आर्डव येथील तुषार व नीलेश या शेडगे बंधूंनी वराहपालनातून अर्थकारण उंचावले आहे. एक व्यवसाय म्हणून त्याकडे दृष्टिकोन ठेवून त्यानुसार व्यवस्थापन करून दहा वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले. वर्षाला सुमारे २५ लाख रुपयांपर्यंत विक्रीची मजल मारली आहे.

पुणे जिल्ह्यात मावळ तालुका हा पावसाचा प्रदेश आहे. येथील आर्डव हे पूर्ण भात पिकावर आधारित गाव आहे. गावातील तुषार व नीलेश या शेडगे बंधूंची पाच एकर शेती आहे. भात, ऊस तसेच काही भाजीपालावर्गीय पिके ते घेतात. सुमारे दहा वर्षांपासून त्यांनी वराहपालनात स्वतःची ओळख तयार केली आहे. तुषार पूर्णवेळ शेती व्यवसाय करतात. तर नीलेश कनिष्ठ महाविद्यालयातील लेक्चररची नोकरी सांभाळून शेती पाहतात. सुटीच्या दिवशी ते वराहपालनात काम करतात.

वराहपालनास सुरुवात
अर्थकारण उंचावण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय असावा या हेतूने शेडगे यांनी शोध सुरू केला. यू-ट्यूबवर त्यांनी अनेक व्हिडिओ पाहिले. त्यातून गावाजवळ एकजण वराहपालन करीत असल्याची माहिती मिळाली. वराहांचे संगोपन, त्याची बाजारपेठ, अर्थकारण तपासले. पूर्ण विचारांती २०११ मध्ये वराहपालनात पाऊल ठेवले. गावाजवळ एका वराहपालकाकडून अमेरिकन यॉर्कशायर ब्रीड आणले. सुरुवात १४ माद्या व ४० पिलांपासून झाली.

व्यवसायातील बाबी

 • शेडगे सांगतात सुरुवातीला काहीच अनुभव नसल्याने नुकसान झाले. मात्र हळूहळू त्यात शिकत गेलो. तंत्र आत्मसात करण्यास सुरुवात केली. ‘यॉर्कशायर’ जात भारतात अधिक प्रमाणात वापरण्यात येते. त्यात पांढरा रंग व त्यावर थोडे काळे ठिपके पाहण्यास मिळतात. ही जात मिश्र प्रजननासाठी उपयुक्‍त आहे.
 • सुरुवातीला ८० बाय ३० फूट आकाराचे शेड उभारले. त्यामध्ये लहान- मोठी धरून सुमारे १२० जनावरे मावू शकतात. टप्प्याटप्प्याने दोन शेड्‍स बांधली. आता चौथ्या शेडचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. यात १२० बाय ४० फूट व १०० बाय ३० फूट अशीही शेड्‍स आहेत.
 • शेडची पिंजरा स्वरूपात बांधणी. प्रत्येक पिंजऱ्यात दोन जनावरे ठेवण्यात येतात.
 • शेडच्या अवतीभोवती वर्षभर हिरवळ राहील याची खबरदारी घेतात. याचे कारण म्हणजे शेडमध्ये उन्हाच्या झळा थेट पोहोचत नाहीत. शेडमधील वातावरण, आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते.
 • झळांपासून वाचविण्यासाठी उन्हाळ्यात शेडवर पाणी फवारतात. आच्छादन टाकतात.
 • अशा छोट्या बाबींचे काटेकोर नियोजन केल्याने पालन यशस्वी होते. काही प्रमाणात जनावरांची मरतुकही होते.

खाद्याचे योग्य नियोजन

 • खाद्य म्हणून मका, सोयाबीन तसेच मिनरल मिक्श्‍चरचा वापर होतो.
 • सोबतच भाजीपाला वर्गीय पिके उदा. पालक, मेथी, चुका शेतात पिकवून खाऊ घालतात. यामुळे जनावरांना पोषणमूल्ये मिळण्यास मदत होते. मकाही पिकवतात.
 • परदेशी जातीच्या वराहांचे पालन करताना स्वच्छतेवर जोर दिला जातो.
 • शेडमध्ये सिमेंट क्राँक्रीट व फरशी यांचा वापर केला आहे. जनावरांना उन्हाळ्यात दिवसातून चार वेळा पाण्याने धुतले जाते. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.
 • हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेडमध्ये प्रकाशाची (लाइट) व्यवस्था केली आहे.

स्वतः राबणे ठरले महत्त्वाचे
शेडगे बंधूंनी वराहपालनात पाऊल टाकले तेव्हा सुरुवातीला काही लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत व्यवसायात चिकाटी व सातत्य राखले. जसजसा काळ लोटला तसतसा समाजाचा दृष्टिकोन बदलत गेला. आज हेच वराहपालन शेतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देत असल्याचे शेडगे बंधू ठामपणे सांगतात. आम्ही दोघे भाऊ स्वतः राबतो. शेडची स्वच्छता, जनावरांना धुणे, त्यांचा आहार, आरोग्यविषयक समस्या असल्यास औषधोपचार, लसीकरण आदी कामे स्वतःच करतो. कुठलाही मजूर ठेवलेला नाही. शेतातच शेड असल्याने शेतीतील दैनंदिन कामे करून या व्यवसायाकडे लक्ष देता येते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग
विक्री व्यवस्था सर्वांत महत्त्वाची होती. त्यामुळे ‘सोशल मीडिया व ऑनलाइन पद्धतीतील विविध प्रकारांचा आधार घेऊन वराहपालनाचे ‘प्रमोशन’ करण्यास सुरुवात केली. त्यातून व्यापाऱ्यांचा संपर्क वाढण्यास मदत झाली. आज मुंबई येथील मोठ्या व्यापाऱ्याला तसेच पुणे येथेही वराह पुरवण्यात येतात. नीलेश सांगतात की मटणासासाठी तसेच पिले घेऊन जाण्याच्या उद्देशानेही खरेदी होते.

विक्री, दर, अर्थकारण

 • सध्या १४० मादी व ४० पिले अशा संख्या
 • वर्षाला अंदाजे ५०० पिलांपर्यंत विक्री
 • विक्रीवेळचे वजन- ८० ते १०० किलो
 • अलीकडील वर्षातील दर- ९५ ते ११० रु. प्रति किलो
 • नगावरही मादीची विक्री- १५,००० रुपये प्रति नग, वजन ८० ते १०० किलो
 • दोन ते अडीच महिन्यांचे पिलू- ३५०० ते ४००० हजार रुपये दर

अर्थकारण
वराहांची पैदास जलद होते. त्यामुळे विक्रीस ती लवकर उपलब्धही होतात. वार्षिक विक्री २५ लाख रुपयांपर्यंत होते. यातील नफ्याचे प्रमाण तुमचे व्यवस्थापन, खाद्यावरील खर्च, शेड, मजुरी यावर बदलते. शेड उभारणीवर सर्वाधिक खर्च होतो. सध्याच्या क्षमतेसाठी किमान २० ते २५ लाख रुपयांचे भांडवल आवश्‍यक आहे. हॉटेलमधील ‘वेस्ट फूड’ दिले तर नफ्यात वाढ होते. विकतचे व्यावसायिक खाद्य दिल्यास नफा कमी होतो.

प्रतिक्रिया
वराहांना बाराही महिने मागणी आहे. व्यवसायाला अद्याप म्हणावी तशी प्रतिष्ठा नाही. त्यामुळेच तिकडे वळण्याचे प्रमाण कमी आहे. संकोच न बाळगता व्यावसायिक दृष्टिकोनातून पालन केल्यास
ते फायदेशीर ठरू शकते.

- तुषार व नीलेश शेडगे बंधू

संपर्क- तुषार शेडगे- ९६८९८९७३९३
नीलेश शेडगे - ९६८९६०७०७०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेती, पूरक व प्रक्रियेतून आर्थिक सक्षमतापालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यातील...
कापूस खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध सावनेर...‘ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हयात...
नगदी पिकांच्या जोडीला काकडी, टोमॅटोचे...नागठाणे (ता. जि. सातारा) येथील विक्रम साळुंखे...
बायोस्टिम्युलंट्‍स’- कायद्याच्या कक्षेत...बिगर नोंदणीकृत किंवा ढोबळमानाने ‘पीजीआर’ अशी ओळख...
शेतीमध्ये बदलली पीक पद्धतीमादणी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील संदीप...
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
पूरक व्यवसायांतून ‘नंदाई’ ने उभारले...साधारण अठरा वर्षांपूर्वी भावाने रक्षाबंधनाला शेळी...
शेतीचे शास्त्र अभ्यासून आदर्श बीजोत्पादनसवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद मदनराव देशमुख या...
विषाणूजन्य रोग अन् ‘कीडमुक्त क्षेत्रा’...मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर...
पुन्हा जोडतोय शेतीशीपुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'...
देवरूख भागात फुलली स्ट्रॉबेरीमहाबळेश्‍वरसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात...
मांस उत्पादनांची ‘ऑनलाइन’ विक्रीकोरोना संकटाच्या कालावधीत अनेकांच्या नोकरीवर गदा...
साठे यांचे लोकप्रिय पेढेयवतमाळ जिल्ह्यातील लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील...
जलसमृद्धीतून मिळवली संपन्नता नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) गावाने...
फळबाग शेतीतून गवसला शाश्‍वत उत्पन्नाचा...कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब...