उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग

नाचणीच्या उत्पादकतेवाढीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शेतकऱ्यांना आम्ही निविष्ठा दिल्यानंतर त्यांनी योग्य व्यवस्थापन केल्याने उन्हाळी नाचणी ही नवी संकल्पना यशस्वी झाली. - पराग परीट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, पन्हाळा
Nachni
Nachni

कोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी उत्पादन घेण्याचा प्रयोग पन्हाळा तालुक्‍यातील अठरा शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्‍यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी नाचणीचे एकरी तब्बल सोळा ते अठरा क्विंटल उत्पादन घेऊन उन्हाळी हंगामात नाचणी येऊ शकते हे दाखवून दिले आहे. ‘आत्मा’च्या माध्यमातून हा प्रयोग साकारला आहे. राज्याचे नाचणीचे प्रतिएकरी सरासरी उत्पादन दहा क्विंटलच्या आसपास असताना उन्हाळी हंगामात सोळा ते अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याने उत्पादनवाढीचा हा प्रयोग राज्याला दिशा देणारा ठरला आहे.  जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड या तालुक्‍यांमध्ये नाचणी पूर्वापार घेतली जाते. वरकस डोंगर उतारावर अत्यल्प मशागतीचा वापर, घरचे बियाणे आणि निव्वळ पावसाच्या पाण्यावर ही नाचणी सरासरी एकरी चार ते सहा क्विंटल उत्पादन देते. पण ‘आत्मा’च्या पुढाकाराने उन्हाळी हंगामातही नाचणी चांगली येऊ शकते याचा प्रयोग म्हणून गेल्या वर्षी नाचणीची लागवड करण्यात आली. पन्हाळा तालुक्‍यातील किसरूळ, बाजारभोगाव, काऊरवाडी, काळजवडे, पिसात्री, हरपवडे या गावांमधील अठरा शेतकऱ्यांना एकूण पंधरा एकर क्षेत्रावर उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनासाठी प्रशिक्षण देण्यात आले आणि प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी फुले नाचणी वाणाचे बियाणे, तणनाशक, बुरशीनाशके, कीटकनाशक, युरिया डीएपी ब्रिकेट्‌स या निविष्ठा उपलब्ध करून देण्यात आल्या. उत्पादक जमिनीचा वापर, बियाणे बदल, रोपवाटिकेत रोपे तयार करून घेऊन योग्य ते अंतर ठेवून रोप लागण, काही प्रमाणात रासायनिक खतांचा वापर यासारखी लहान लहान तंत्रे आत्मसात केल्याने शेतकऱ्यांना हे यश मिळाले. 

यंदा दोनशे एकरांवर लागवड होणार  पन्हाळा तालुक्‍यातच दीडशेपेक्षा जास्त शेतकरी साधारणपणे शंभर एकरांवर यंदा उन्हाळी नाचणीचे उत्पादन घेणार आहेत. यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून फुले नाचणीचे बियाणे खरेदी केले आहे. हा प्रयोग घेताना गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांना गुलाबी खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव निदर्शनास आला. त्याच्या प्रतिबंधासाठी उपाय करून यंदाही नाचणीचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यंदा काही तांत्रिक त्रुटीमुळे बियाणे तयार करण्यात अपयश आले. पण येत्या काळात बियाणे तयार करण्याबाबतही प्राधान्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.   तज्ज्ञांचे वर्षभर मार्गदर्शन  पहिल्यांदाच होत असलेल्या या नव्या प्रयोगासाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, शेंडापार्क, कोल्हापूर येथील नाचणी पैदासकार डॉ. सुनील कराड, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ, सेवानिवृत्त कीटकशास्त्र विभाग प्रमुख  डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सुरुवातीच्या काळात नाचणी उत्पादकांना मार्गदर्शन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट यांनी प्रात्यक्षिकाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्‍वजीत पाटील, कृषी सहायक व्ही. आर. गायकवाड, सुनीता कुंभार, दीपाली सावंत तसेच कृषिभूषण सर्जेराव पाटील, मिलिंद पाटील, चेतन मोहिते यांनीही सहकार्य केले.  प्रतिक्रिया ‘आत्मा’च्या तालुक्‍याच्या अधिकाऱ्यांनी आग्रह धरल्याने मी धाडसाने पहिल्यांदाच उन्हाळ्यात नाचणी केली होती. योग्य व्यवस्थापनामुळे मला एकरात साडेअठरा क्विंटल नाचणी झाली. सहा टन नाचणीचा ओला सकस चारा पण मिळाला. आता हुरूप वाढलाय. यंदा दीड एकरावर उन्हाळी नाचणी करतोय.  - गणपती पाटील, किसरूळ, ता. पन्हाळा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com