पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड 

महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे.
Sugar beet cultivation on fifty acres
Sugar beet cultivation on fifty acres

कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. केवळ चर्चाच न करता महापूर ओसरल्यावर त्यांनी कार्यक्षेत्रातील ४१ गावांमध्ये सुमारे ५० एकरावर शुगर बीटची लागवड केली आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शुगर बीट घेतले आहे. त्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर मिळणार आहे. कारखान्याच्या ५६ सभासदांच्या शेतीवर शुगर बीटची लागवड झाली आहे. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असून, शुगर बीटचे गाळप मार्चच्या मध्याला करण्यात येणार आहे. चार महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराने ऊस शेतीला मोठा फटका बसला. नुकतीच लागवड झालेली ऊसशेती पाण्याखाली गेल्याने ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पूर येत असल्याने शेतीचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कारखान्याने दोन महिन्यांपूर्वी तज्ज्ञांच्या उपस्थितीत पीक बदलाबाबत एक चर्चासत्र घेतले होते. यातून शुगर बीट लागवडीचा पर्याय पुढे आला. कारखान्याने फक्त कागदावरच ही योजना न आणता तातडीने प्रत्यक्षात अमलात आणली. कारखान्याच्या तज्ज्ञांनी याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. तांत्रिक साह्य केले.  पूर येऊन गेलेल्या जमिनीत सप्टेंबर महिन्यात शुगर बीटच्या लागवडी केल्या. यासाठी प्रयोगशील शेतकरी आणि विविध प्रकारच्या जमिनी निवडल्या. यामध्ये क्षारपड, काळी व माळरानाच्या जमिनीचाही समावेश आहे. हा प्रयोग करताना ठिबक सिंचन व पाटपाणी हे दोन्ही पर्याय शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. हे पीक नवीनच असल्याने प्रत्येक पातळीवर कारखान्याच्या ऊस विकास विभागाबरोबरच माती परीक्षण प्रयोगशाळेचे तज्ज्ञ शेतकऱ्याला दररोजचे मार्गदर्शन करत आहेत. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील ही पीकवाढीचा आढावा प्रत्यक्षात शेतीला भेट देऊन घेत आहेत. अडचणींबाबत प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी बोलून आवश्यक त्या औषध फवारणीविषयी मार्गदर्शन सुरू आहे. 

...असा होईल फायदा  पावसाळ्यामध्ये महापूर आला आणि घेतलेले पीक महापुरात गेले, तर शुगर बीट हा पर्याय म्हणून पुढे येणार आहे. पुरातील खराब झालेले पीक काढून सप्टेंबरमध्ये शुगर बीटची लागवड केल्यास ते मार्चपर्यंत काढणीसाठी येईल. कारखान्याकडून शुगर बीट घेणार याची शाश्‍वत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरणार आहे. ऊस हंगाम संपते वेळी मार्चपर्यंत हे पीक काढणीसाठी येईल. केवळ पाच महिन्यांत हे पीक येणार असल्याने वाया गेलेला कालावधी या पिकाच्या माध्यमातून भरून घेता येणार आहे. पाच महिन्यांत बिटाचे उत्पादन हेक्‍टरी ८० टनांपर्यंत येऊ शकते. व्यवस्थापन खर्च ही उसापेक्षा चाळीस टक्क्यांपर्यंत कमी येऊ शकतो. बीट काढल्यानंतर शेतकरी अन्य उन्हाळी पिके ही घेऊ शकतात. 

प्रतिक्रिया 

गेल्या काही वर्षांपासून पुराच्या नुकसानीने शिरोळ तालुक्यातील शेतकरी नाउमेद झाला आहे. त्याला पर्याय देण्यासाठी आम्ही हे पीक निवडले. सद्यःस्थितीत पिकाची वाढ अतिशय चांगली झाली आहे. हे आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. शेतकऱ्यांबरोबर कारखान्याचे कर्मचारी यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. सध्या सर्वच प्लॉटचे नियमित निरीक्षण करून आम्ही तांत्रिक अभ्यास करत आहोत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास विशेष करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना खूप मोठा आश्‍वासक पर्याय मिळेल. हंगामाच्या शेवटी आम्ही यंदा उत्पादन होणारे सर्व शुगर बीट गाळप करणार आहोत. 

-गणपतराव पाटील, अध्यक्ष,  श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com