सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'

साखर आयुक्तालयाचा सतत पाठपुरावा आणि साखर कारखान्यांच्या समन्वयाच्या भूमिकेतून राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत एफआरपीपोटी आतापर्यंत १९ हजार ५०० कोटी रुपये जमा करण्यात यश आलेले आहे. देय एफआरपीच्या ८८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा झाली आहे. उर्वरित रक्कम मिळवून देण्यासाठी आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'

पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्यात साखर आयुक्तालयाने यंदा दणकेबाज पाठपुरावा केला आहे. आतापर्यंत १९ हजार ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा करण्यास भाग पाडले गेले असून, एफआरपी थकविणाऱ्या ७० कारखान्यांवर आरआरसी (महसुली वसुली प्रमाणपत्र)  कारवाई केली आहे. “१९५ कारखान्यांनी यंदा ९५२ लाख टन उसाचे गाळप केले. राज्यात कुठेही ऊस शिल्लक राहिला नाही. गाळपाच्या शेवटच्या टप्प्यात ‘विघ्नहर’ कारखान्याने ६ मे रोजी बॉयलर बंद करून हंगामाचा शेवट केला आहे. एफआरपीपोटी यंदा शेतकऱ्यांना २२ हजार १७२ कोटी रुपये अदा करण्याची जबाबदारी कारखान्यांवर होती. त्यापैकी ८८ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यांत वर्ग झाली आहे,” असे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. राज्यात ५१ कारखान्यांनी यंदा १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. ८० ते ९९ टक्के एफआरपी देण्यात जवळपास ८५ कारखान्यांना यश आले. ६० ते ७९ टक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ३६ आहे.  “एफआरपी वाटपातील घडामोडी बघता अजून १२ टक्के एफआरपी थकीत दिसते आहे. ही रक्कम अंदाजे दोन हजार ९४२ कोटी रुपयांच्या आसपास आहे. थकीत एफआरपी मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व स्तरांवरून प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अजून किमान पाच टक्के रक्कम येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांत वर्ग होण्याची शक्यता वाटते. त्यानंतर मात्र थकीत एफआरपी ५-७ टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला. दरम्यान, एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना यंदा कारवाईच्या कक्षेत यंदा झपाट्याने आणले गेले आहे. त्यामुळे आरआरसी (महसुली वसुली प्रमाणपत्र) केलेल्या कारखान्यांची संख्या महिनाभरात ४५ वरून ७० वर आली आहे.  आरआरसी कारवाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांना साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून एफआरपी वसुलीचा अधिकार मिळतो. या माध्यमातून किमान दोन हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांची एकूण संख्या १४४ आहे. त्यापैकी २३ कारखान्यांनी ६० टक्क्यांच्या वर एफआरपी थकविली आहे. “एफआरपी मिळवून देण्यासाठी याच २३ कारखान्यांकडे प्रशासनाला जास्त पाठपुरावा करावा लागेल,” असे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com