शेतकऱ्यांसाठी केबिनचा दरवाजा कायम उघडा ठेवणारे कडूपाटील निवृत्त

साखर आयुक्तांनी निवृत्तीच्या दिवशी केले १२ तास काम
साखर आयुक्तांनी निवृत्तीच्या दिवशी केले १२ तास काम

पुणे: राज्याच्या बेशिस्त साखर आयुक्तालयाला वर्षाभरापुरते की होईना वठणीवर आणणारे साखर आयुक्त संभाजी कडूपाटील निवृत्त झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी केबिनचा दरवाजा कायम उघडा ठेवणारे कडूपाटील यांनी शेवटच्या दिवशीदेखील बारा तास काम केले. शेतकऱ्यांशीही चर्चा केली. सहकार खात्याच्या कर्मचाऱ्यांचा भरणा असलेले साखर आयुक्तालय शेतकरीभिमुख नव्हते. वर्षानुवर्षे लालफितीच्या कारभारात असलेल्या आयुक्तालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा आला की हमखास तोडफोड व्हायची. विद्यमान सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी एक वर्षापूर्वी आयुक्तपदी संभाजी कडूपाटील यांच्याकडे आयुक्तालय सोपवून कारभारात सुसूत्रता आणली. त्यांनी पदाची सूत्रे हाती घेताच कामचुकार कर्मचाऱ्यांची पळापळ झाली.  "राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या सध्याच्या टीममध्ये रोज सकाळी नऊ वाजता हजर राहून कर्मचाऱ्यांची बैठक घेणे, कालच्या कामचा आढावा घेणे तसेच जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना सामोरे जाणे अशी कामकाजाची पद्धत ठेवलेले कडूपाटील हे एकमेव अधिकारी समजले जात होते. तुकाराम मुंडे यांच्याप्रमाणे कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली नाही. तथापि, भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचाऱ्यांना केबिनमध्ये येण्यास बंदी घातली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. जमाबंदी आयुक्त म्हणून श्री. कडूपाटील यांनीच प्रथम ऑनलाइन सातबारा प्रकल्पाला चालना दिली. पुणे मुख्यालयातील जमाबंदी आणि महसूल खात्यातील कामचुकार अधिकारी हा प्रकल्प पुढे नेणार नसल्याचे लक्षात येताच पुण्याबाहेरील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्ती कडूपाटील यांनीच केली होती. श्री. जगतापदेखील आता परिश्रमपूर्वक या प्रकल्पाला पुढे नेत आहेत. श्री. कडूपाटील यांनी केंद्र किंवा राज्याशी पत्रव्यवहार करताना कारखानदारांच्या हिताची भूमिका घेतली. मात्र, गैरव्यवहार दिसलेल्या आणि एफआरपी थकविणाऱ्यांना कारखान्यांच्या त्यांनी जेरीस आणले होते. "साखर आयुक्तालयासमोर शेतकऱ्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, असे काम करा. कामचुकारांनी माझ्या केबिनमध्ये पाय ठेवू नये," अशी तंबी दिल्याने त्यांच्या टेबलवर एकही फाईल ''पेंडिंग'' राहिली नाही. मंत्रि समिती, ऊसदर नियंत्रण मंडळ, केंद्रीय साखर आयुक्तालय राज्यातील सहकारी साखर कारखाने यांच्याशी वारंवार होणाऱ्या चर्चेत साखर आयुक्त म्हणून श्री. कडूपाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. निवृत्तीच्या दिवशी सकाळी आठ वाजेपासून त्यांनी कामाला सुरवात केली. कारखानदार, शेतकरी यांच्या भेटीगाठी आणि दिवसभर कामदेखील केले.  साखर आयुक्तालय शेतकऱ्यांचे झाले  श्री. कडूपाटील यांना निरोप देण्यासाठी साखर आयुक्तालयातील सर्व कर्मचारी एकत्र जमले होते. "सहकार विभागातील कर्मचाऱ्यांनी असा आयुक्त पाहिला नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात प्रत्येक प्रामाणिक कर्मचाऱ्याला आनंद वाटत होता. शिस्त व नियोजनामुळे त्यांच्याच काळात साखर आयुक्तालय हे शेतकऱ्यांना आपलेसे बनले होते, अशा शब्दात सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कडूपाटील यांच्या कामाचे कौतुक केले. "निवृत्तीनंतरही मी शेतकऱ्यांसाठी २४ तास खुला आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि तुमचेही घेईन. गाव आणि शेतकऱ्यांना आपण विसरू नये, असे भावनिक उद्गगार श्री. कडूपाटील यांनी कर्मचाऱ्यांशी बोलताना काढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com