पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साखर निर्यात अशक्‍य

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साखर निर्यात अशक्‍य
पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साखर निर्यात अशक्‍य

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्याने जगभरात साखर उद्योगाची अवस्था बिकट झाली आहे. कोणत्याही देशाकडून मागणी व दर नसल्याने निर्यात रखडलेलीच आहे. जूनपासून देशातील महत्त्वाची बंदरे पावसाळ्यामुळे बंद राहणार असल्याने पंधरा दिवसांत कारखान्यांनी हालचाली केल्या, तरच थोड्या प्रमाणात तरी साखर निर्यात होईल; अन्यथा निर्यात अशक्‍य असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. इतर देशांनीही वाढते साखर उत्पादन पाहता लवचिकतेचे धोरण अवलंबल्याने इतर देशांकडूनही साखरेची मागणी कमी राहण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी कायम केंद्राने वीस लाख टन साखर निर्यात करण्याचा कोटा कारखान्यांना दिला असला, तरी अद्यापही कारखान्यांही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. हा निर्णय जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी अद्यापही कारखान्यांनी निर्यातीसाठी फारसे प्रयत्न सुरू केले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारातही क्विंटलला २१०० रुपये दर मिळत आहे. देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा तो ५०० ते ६०० रुपयांनी कमी आहे. केंद्राने सक्ती केली असली, तरी तोट्यातील साखर निर्यात करण्यास फारसे कुणी तयार नसल्याचे उद्योगातून सांगण्यात आले. काही कारखान्यांनी साखर निर्यात करण्याबाबतच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या पलीकडे कुठेही प्रत्यक्षात निर्यातीला सुरवात झालेली नाही.

पावसाळा आव्हान ठरणार आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दर नसल्याने केंद्राने सक्ती करूनही कारखानदारांनी  निर्यातीचा विचार केला नाही. जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यास देशातील सर्वच प्रमुख बंदरे बंद होतात. यामुळे कारखानदारांच्या हातामध्ये फक्त पंधरा दिवसच उरले आहेत. या पंधरा दिवसांत साखर निर्यात झाली नाही, तर पावसाळा होईपर्यंत कारखान्यांना काहीच करता येणार नाही, अशी स्थिती आहे. निर्यात न झाल्यास याचा दबाव पुन्हा पुढील हंगामावर होऊन उद्योगापुढील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. 

देशांतर्गत बाजारातही मागणी नाही देशांतर्गत बाजारात अजूनही साखरेला म्हणावी तशी मागणी नसल्याने कारखानदारांची अस्वस्थता कायम आहे. देशात विविध बाजारपेठांमध्ये साखरेचे दर २५०० ते २७०० रुपयांच्या दरम्यान आहे. या दरांमध्ये साखरेची विक्री जेवढी अपेक्षित आहे. तितकी होत नसल्याने कारखानदारांची चिंता कायम आहे.  दिल्ली, कानपूर, रायपूर,  मुंबई,  रांची, कोलकता, गुवाहटी, हैदराबाद, चेन्नई  आदी महत्त्वाच्या बाजारपेठांमध्येही साखरेला फारसा उठाव नसल्याने दरात वाढ नसल्याचे साखर उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले. 

कच्ची साखर निर्यातीचा विचार शक्‍य कारखान्यांनी तातडीने हालचाली केल्या नाहीत, तर पुढील हंगाम सुरू होण्याअगोदर कोट्यानुसारची साखर निर्यात करणे अशक्‍य बनले आहे. यामुळे पुढील वर्षी हंगाम सुरू केल्यानंतर कच्ची साखर निर्यात करण्याबाबतच कारखान्यांना विचार करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. पक्की साखर निर्यात न झाल्यास कारखाने कच्च्या साखरेच्या निर्यातीस प्राधान्य देऊन तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. 

थायलंडचा निर्यात घटविण्याचा विचार साखरेच्या निर्यातीत ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडनेही साखरेच्या बाजारातील मंदी पाहता कच्च्या साखरेची निर्यात ५ लाख टनांनी घटविण्याचा विचार सुरू केला आहे. साखरेचे दर किती काळ पडलेले राहतील, याचा अंदाज नसल्याने तोट्यात साखरेची विक्री करण्यापेक्षा निर्यातच कमी करण्याचे थायलंडच्या साखर उद्योगाने ठरविले आहे.  थायलंडच्या ऊस आणि साखर बोर्डाने पहिल्या टप्प्यात हा निर्णय घेतला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com