कोरोना विषाणूने केला साखर निर्यातीचा ‘बेरंग’

कोरोनाने साखर उद्योगालाही प्रभावित केले आहे. साखर उद्योगासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या साखर निर्यातीला यामुळे मोठे अडथळे निर्माण होत आहेत. या रोगामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या गोंधळाचा फटका साखर उद्योगाला निश्‍चितपणे बसत आहे. बाजार स्थिर नसल्याने येत्या काही दिवसांत व्यापार सुरळीत न झाल्यास साखर निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण बनणार आहे — प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ
sugar
sugar

कोल्हापूर ः कोरोना विषाणूचा दणका साखर निर्यातीला बसला आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच उच्चतम पातळीवर आलेले आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर झपाट्याने खाली आले आहेत. बहुतांशी देशांनी व्यापाऱ्यांवर मर्यादा आणल्याने हजारो टन साखर विविध बंदरांवर पडून आहे. या साखरेचे भवितव्य सध्या निश्‍चित नसल्याने साखर निर्यातीचा आनंद हा औटघटकेचा ठरण्याची भीती साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. याचा परिणाम निर्यातीचे उद्दिष्ट रखडण्यावरही होणार आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात साखर कमी असल्याने भारतीय साखरेला मागणी वाढत होती. केंद्राने कारखान्यांना साठ लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ३८ लाख टन साखरेचे करार झाले आहेत. यापैकी २२ लाख टन साखर निर्यात झाली आहे. उर्वरित १६ लाख टन साखर मात्र मध्येच अडकली आहे. ज्यावेळी चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्या वेळी चीन वगळता इतर देशांचे व्यापार सुरू होते.  परंतु जसा रोग पसरत गेला, तशा अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या. याचा फटका साखरेलाही बसला. देशातील बहुतांशी कारखान्यांनी दरात तेजी येत असल्याने साखर बंदरापर्यंत पोचविण्यासाठी द्रुतगतीने हालचाली केल्या. परंतु इतर देशांकडून व्यापार बंद होत असल्याने देशातून साखर परदेशाकडे जाणे अशक्‍य बनले आहे. अनेक देशांनी पुढील किमान महिनाभर तरी व्यवहार बंद ठेवण्याबाबत हालचाली सुरु केल्याने आता उद्दिष्टाएवढी साखर निर्यात करण्याचे आव्हान उभे ठाकल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.  दर घसरल्याने चिंता वाढली  कच्च्या साखरेचे दर २४ फेब्रुवारीला १५ सेंट इतके होते. आता हेच दर १२ मार्चला १२ सेंटपर्यंत घसरले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून दर वाढत होते. परंतु २४ फेब्रुवारीनंतर पंधरा दिवसाच्या कालावधीत तीन सेंटनी घसरण साखर उद्योगाला चिंतित करत आहे. यातच आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरातही घसरण होत आहे. यामुळे इथेनॉल करण्यासाठी कारखाने प्राधान्य देणार नाहीत अशी परिस्थिती आहे. एप्रिलपासून ब्राझीलचा साखर हंगाम सुरू होणार आहे. ब्राझीलही यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त साखर उत्पादन करेल अशी शक्‍यता आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. याचा एकत्रित परिणाम साखरेचे दर घसरण्यावर होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कारखान्यांच्या जादा साखर निर्यात करण्याच्या अपेक्षांना सुरुंग लागण्याचीच शक्‍यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com