Agriculture news in Marathi Sugar exports will be profitable this year | Agrowon

साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीर

राजकुमार चौगुले
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

आंतरराष्ट्रीय बाजारात असणारे दर, राज्य बॅंकेकडून साखरेवर मिळणारे तारण कर्ज, त्यावरील होणारे व्याज याचा हिशोब केल्यास कारखान्यांना सध्याच्या दराने निर्यात फायदेशीर ठरू शकते असा अंदाज साखर निर्यातदार सूत्रांचा आहे.

कोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत क्विंटलला ८५० ते ९०० रुपयांपर्यंत दर वाढला आहे. यामुळे राज्यातील कारखान्यांना निर्यात अनुदान योजनेचा आधार न घेताही यंदाच्या हंगामात तयार होणारी साखर निर्यात करणे शक्‍य होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात असणारे दर, राज्य बॅंकेकडून साखरेवर मिळणारे तारण कर्ज, त्यावरील होणारे व्याज याचा हिशोब केल्यास कारखान्यांना सध्याच्या दराने निर्यात फायदेशीर ठरू शकते असा अंदाज साखर निर्यातदार सूत्रांचा आहे.

पण अनुदान मिळाल्याशिवाय निर्यात करायची नाही ही कारखान्यांची मानसिकता असल्याने निर्यातीला वाव असूनही साखर कारखाने निर्यात करत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. याचा फटका साखर उद्योगाला बसत आहे.

फक्त ब्राझीलमधून साखरेची आवक
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेची चणचण आहे. यंदा ब्राझीलने साखर उत्पादन वाढविल्याने फक्त तेथूनच निर्यात होत आहे. प्रत्येक वर्षी साखरेचे उत्पादन जादा असणाऱ्या थायलंडमध्ये दुष्काळामुळे यंदा साखर उत्पादनात घट झाली आहे. यामुळे तेथील साखर बाजारात आली नाही. फक्त ब्राझीलमधूनच साखर येत असल्याने साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारपेठेत अनेक देश भारतीय साखरेच्या प्रतिक्षेत आहेत. पण निर्यात धोरण केंद्राने जाहीर न केल्याने कारखाने निर्यात करार करण्यास तयार नाहीत. परिणामी दर असूनही भारतातून निर्यात होत नसल्याची स्थिती आहे.

नवी साखर निर्यात करणे शक्‍य
देशात गेल्या वर्षीची ११७ लाख, तर महाराष्ट्रात ६० लाख टनांपर्यंत साखर शिल्लक आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत नवीन साखरेला मागणी आहे. यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादित होणाऱ्या साखरेला क्विंटलला २७५० ते २७८० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो. ही रक्कम थेट मिळू शकत असल्याने साखर कारखानदारांना फायदेशीर होवू शकते. शिल्लक साखर देशांतर्गत बाजारात विकून येत्या हंगामात तयार होणारी साखर तातडीने निर्यात केल्यास शिल्लक साखरेचा बोजा बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो असा अंदाज निर्यातदारांचा आहे.

राज्याला असा होऊ शकतो फायदा
राज्यातही यंदा शंभर लाख टनांपर्यंत साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील साखर कारखाने उत्पादित साखरेवर तारण कर्ज बॅंकाकडून घेतात. साखरेचे मूल्यांकन करून त्याच्या ९० टक्के पर्यंत बँक साखरेला उचल देते. ३१०० रुपये दर गृहीत धरल्यास मार्जिन वजा जाता २७०० रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. वर्षभर साखर राहिली तर क्विंटलला अडीचशे ते तीनशे रुपये व्याजाचा भुर्दंड बसू शकतो. तयार होणारी हीच साखर थेट निर्यात केल्यास बॅंकापेक्षा ती फायदेशीर ठरु शकते असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. सध्या साखर विक्रीचा किमान दर ३१०० रुपये असला, तरी मागणी नसल्याने काही कारखाने ३०५० रुपयालाही देशांतर्गत बाजारात साखर विकत आहेत. यामुळे कारखानदारी अडचणीत येत आहे. शिल्लक साखरेचा दबाव व निर्यात धोरण जाहीर होत नसल्याने साखरेची राष्ट्रीय बाजारातील खरेदीला जोमाने होत नसल्याची सध्याची स्थिती आहे. सध्या दिवाळीचा काळ असल्याने काहीसा उठाव होण्याची शक्‍यता असली तरी ही मागणी काही काळापुरतीच राहील असा अंदाज साखर व्यापाऱ्यांचा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात नव्या साखरेस क्विंटलला २७५० रुपयांपर्यंत दर आहेत. याचा फायदा कारखान्यांनी घ्यायला हवा. बॅंकाचे कर्ज व त्यांचे व्याज याचा हिशेब केल्यास अनुदानाशिवाय निर्यातही दिलासादायक ठरू शकते. केंद्राने निर्यात अनुदान योजना जाहीर केल्यास कारखान्यांच्या दृष्टीने समाधानकारक बाब ठरेल व भारतातून ६० लाख टनांपेक्षा जास्त साखर निर्यात होऊ शकेल, पण केंद्राकडून तशा हालचाली दिसत नाहीत. यंदाच्या हंगामात तयार होणारी साखर थेट निर्यात केल्यास ती रक्कम कारखान्यांना तातडीने मिळू शकेल व उत्पादकांची देणीही भागू शकतील.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार


इतर अॅग्रोमनी
अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घटवॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा...
जागतिक मका उत्पादनात घट वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
दराचे संरक्षण देणाऱ्या योजना राबवाव्यात पुणे ः ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी...
‘बासमती’ची तांदळाचा तुटवडाकोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या...
सोयाबीन बाजारात तेजीचेच संकेतपुणे ः शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन...
तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍...कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन...
कापसाच्या दरात सुधाराची चिन्हेपुणे ः ‘सीसीआयने’ कापसाला हमीभावापेक्षा  ३००...
केंद्रीय अर्थसंकल्पातून होणार सवलतींची...नवी दिल्ली ः कोरोनाच्या संसर्गामुळे...
मालविक्रीसाठी ३५ शेतकरी कंपन्या एकाच...शेतकऱ्यांना ‘शेतीमाल पिकवता येतो, मात्र विकता येत...
हंगामाच्या प्रारंभीच कोलम, आंबेमोहोर...कोल्हापूर: देशातील तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे....
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ...कोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना...
सुताच्या दरात मोठी वाढजळगाव ः जगभरातील प्रमुख आयातदारांकडून सुताची मोठी...
कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : गेल्या काही दिवसांत देशात वाढणारी...
हमीभावाने १८ टक्के अधिक धान्य खरेदी :...नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दराचा...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पंधरा...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...